महाबळेश्वर, पाचगणीतील परदेशी नागरिकांची माहिती कळवा: जिल्हाधिकारी - satara collector appeals about foreign citizens  | Politics Marathi News - Sarkarnama

महाबळेश्वर, पाचगणीतील परदेशी नागरिकांची माहिती कळवा: जिल्हाधिकारी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 मार्च 2020

सर्व निवासी शाळा, महाविद्यालयांसाठी स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करुन पूर्ण वेळ तैनात ठेवावी. शाळा व महाविद्यालयातील स्वच्छतेबाबत व आरोग्य विषयक सुविधांबाबत वारंवार तपासणी करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.
 

सातारा: कोणताही परदेशी नागरिक शाळेत येणार असल्यास त्याबाबतची माहिती पोलिस विभाग व आरोग्य विभागास द्यावी. तसेच  महाबळेश्वर व पाचगणी येथे परदेशातून आलेले नागरिक ज्या हॉटेल व नातेवाईकांकडे मुक्कामास आहेत किंवा कसे त्यांची माहिती एकत्रित करुन जिल्हा रुग्णालयास कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

सर्व निवासी शाळा, महाविद्यालयांसाठी स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करुन पूर्ण वेळ तैनात ठेवावी. शाळा व महाविद्यालयातील स्वच्छतेबाबत व आरोग्य विषयक सुविधांबाबत वारंवार तपासणी करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.

सर्व हॉटेल, लॉज, ढाबे यामध्ये येणाऱ्या नागरिकांचे बसण्याचे टेबल, नेहमी हाताळणारे मेनूकार्ड, वॉश बेसीन, वॉश बेसीनचे नळ, शौचालय तसेच ज्या ठिकाणी नागरिकांचा हाताचा स्पर्श होऊन संसर्गजन्य रोगाचा प्रादुभाव वाढण्याची शक्‍यता आहे, या सर्व बाबी दिवसातून वारंवार निर्जुंतुकीकरण करण्यात यावे. तसेच हायवेलगत राज्याबाहेरील किंवा देशाबाहेरील येणारे प्रवासी यांची लॉजमध्ये नोंदणी रजिस्टरमध्ये नोंदणी करावी. परदेशी नागरिक अथवा कोरोना बाधित संशयीत नागरिक आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागास व पोलिस विभागास कळविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व हॉटेल चालकांना दिल्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख