satara circuit house issue | Sarkarnama

संदीप पाटलांनी मध्यस्ती केली नसती तर मोठा अनर्थ घडला असता!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 जून 2019

आज शासकिय विश्रामगृहात घडलेल्या त्या घटनेच्या आठवणीला उजाळा मिळाला आहे. 

सातारा : लोकसभा निवडणुकीपूर्वी साताऱ्यातील शासकिय विश्रामगृहात सभापती रामराजे नाईक निंबाळकर थांबले होते. त्यावेळी उदयनराजे विश्रामगृहात आले आणि संतप्त होत त्यांना बघतोच, फाडतोच असे म्हणत आतमध्ये आले. मात्र, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी उदयनराजेंना अडविले व शांत केले. अन्यथा अनर्थ घडला असता. 

आज मुंबईत शरद पवारांसोबत झालेल्या दोघांतील समेटाच्या बैठकीतून उदयनराजे संतप्त होऊन बाहेर आले. त्यांनी मिडियाशी बोलताना मी त्यांच्या वयाचा आदर करतो, दुसरे कोणी असते तर त्यांची जीभच हासडली असती, अशा शब्दांत आपला राग व्यक्त केला. यातून उदयनराजेंचा रामराजेंवर किती राग आहे, हे स्पष्ट होते. आज शासकिय विश्रामगृहात घडलेल्या त्या घटनेच्या आठवणीला उजाळा मिळाला आहे. 

रामराजे व उदयनराजे यांच्यातील हा वाद सुरू झाला तो खंडाळ्यातील सोना अलाईन्स कंपनीतील कामगार संघटनेतून. या कंपनीत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून कर्मचारी पुरविले जात होते. या कंपनीत उदयनराजेंनी हस्तक्षेप केला होता. तसेच कंपनीच्या मालकाला तथाकथित खंडणी मागितल्या प्रकरणी उदयनराजे व त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल झाला होता. या सर्व प्रकाराला रामराजे नाईक निंबाळकर हेच जबाबदार असल्याचे धरून त्यांच्यात वादाला सुरवात झाली. 

हा वाद पुढे इतका विकोपाला गेला की उदयनराजे एकेदिवशी फलटणला गेले तेथील शासकिय विश्रामगृहात जाऊन त्यांनी रामराजेंना चॅलेंज केले होते. त्यानंतर सातत्याने दोघेही एकमेकांवर आरोप करत होते. या वादातूनच पुढे लोकसभेला साताऱ्यातून उदयनराजेंना तिकिट देऊ नये, हा मुद्दा पुढे आला. त्यासाठी बारामती येथे जाऊन रामराजेंसह राष्ट्रवादीच्या प्रमुख आमदारांनी शरद पवार यांनी उदयनराजेंना तिकिट देऊ नये, असे सांगितले होते. याच दरम्यान, उदयनराजेंच्या समर्थकांच्या ताब्यातील आनेवाडी टोलनाका काढून घेऊन तो आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या समर्थकांना देण्याचा प्रयत्न झाला. यावरून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंत वाद पेटला. आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या सुरूची बंगल्यावर उदयनराजे व त्यांचे समर्थक चालून गेले होते. यानंतर या दोन चुलत बंधूत वाद सुरू झाला. रामराजे, शिवेंद्रसिंहराजे विरूध्द उदयनराजे असे वादाचे स्वरूप होते.  

याच दरम्यान, रामराजे नाईक निंबाळकर हे साताऱ्यातील शासकिय विश्रामगृहात थांबले होते. दुपारची वेळ होती. याच वेळी उदयनराजे विश्रामगृहात येण्यास निघाले. याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना मिळताच ते उदयनराजेंच्या आधी विश्रामगृहात पोहोचले. त्यांनी रामराजे थांबलेल्या कक्षात जाऊन थांबले व उदयनराजे विश्रामगृहात येताच पुन्हा बाहेर आले. त्यावेळी उदयनराजे संतप्त होते विश्रामगृहात आले. त्यांना बघतोच.. फाडतोच...असे म्हणत आतमध्ये आले. त्यावेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांना बाहेरच्या दरवाजाजवळच अडविले आणि रामराजेंच्या कक्षाकडे जाण्यापासून रोखले. त्यानंतर उदयनराजे दुसऱ्या बाजूला असलेल्या कक्षाकडे चालत गेले. त्यावेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांची समजूत काढत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना विश्रामगृहातून जाण्यास सांगितले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

आज शरद पवारांसोबत मुंबईतील राष्ट्रवादी भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर झालेल्या उदयनराजे व रामराजेंच्यातील समेटाच्या बैठकीतही उदयनराजे संतप्त झाले होते. ते बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर आले. त्यांनी संतप्त अवस्थेतच रामराजेंच्या विरोधात आपली भुमिका मांडली. मी त्यांच्या वयाचा आदर करतो. दुसरे कोणीअसते तर त्याची जीभच हासडली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे उदयनराजेंना रामराजेंविषयी किती राग आहे, हे दिसून आले. तसेच शासकिय विश्रामगृहात त्यावेळी झालेल्या घटनेला आजच्या घटनेने उजाळा मिळाला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख