कोरोनात पुण्यातील मृतांचा आकडा वाढल्याचा पहिला प्रशासकीय `बळी!` - sassoon dean Chandanwale transferred due high deaths of corona in Pune | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनात पुण्यातील मृतांचा आकडा वाढल्याचा पहिला प्रशासकीय `बळी!`

उमेश घोंगडे
गुरुवार, 16 एप्रिल 2020

दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या मृतांचा आकडा वाढत चालल्याने डॉ. चंदनवाले यांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे : ससूनमधील कोरोनाग्रस्त मृतांच्या वाढत्या संख्येचे खापर फोडत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची आज सायंकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली. मुंबईत सहसंचालक वैद्यकीय शिक्षण या पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे होता. या पदावर त्यांची आता पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना विषाणूची लागण पुण्यात वाढत आहे. या साथीने पुण्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या स्थितीत डॉ. चंदनवाले यांच्या बदलीने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सूसूनचे अधिष्ठाता म्हणून डॉ. चंदनवाले यांनी दीर्घकाळ काम केले आहे. गेल्यावर्षी त्यांची मुंबईत बदली करण्यात आली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी पुन्हा त्यांची ससूनच्या अधिष्ठाता म्हणून बदली करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविकण्यात आला होता. त्या पदावर आता पुन्हा त्यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. ससून हे पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रमुख सरकारी रूग्णालय आहे. कोरोनाचे रूग्ण पुण्यात नायडू या महापालिकेच्या रूग्णालयात तसेच ससून रूग्णालयात ठेवण्यात येतात. कोरोनाचे बहुतांश रूग्ण हे ससूनमध्ये प्रामुख्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यासाठी आणण्यात येतात. त्यामुळे साहजिकच ससूमधील मृतांचा आकडा वाढलेला दिसतो. पुण्यात आज चार कोरोनाग्रस्त रूगणांचा मृत्यू झाला. पुण्यात झालेल्या मृत्यूमध्ये बहुतांश मृत्यू ससूनमध्ये दाखल झालेल्या रूग्णांचे आहेत.

दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या मृतांचा आकडा वाढत चालल्याने डॉ. चंदनवाले यांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुळात डॉ. चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीने परिस्थितीत काय फरक पडणार आहे का ? असा प्रश्‍न विचारण्यात येऊ लागला आहे. ससूनमध्ये पायाभूत सुविधांची वाणवा आहे. डॉ. चंदनवाले यांच्या बदलीने त्यात काही सुधारणा होणार आहे का ? हा खरा प्रश्‍न आहे. पीपीई किटपासून वेन्टिलेटर पर्यंत आणि कर्मचाऱ्यांपासून इतर पायाभूत सुविधांच्या समस्यांचा डोंगर ससूनसमोर आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या निधीची गरज आहे आणि तेही यापूर्वीच व्हायला हवे होते. आता आणीबाणीच्या काळात अधिष्ठात्यांची बदली करून परिस्थितीत काय बदल होणार आहे, असा प्रश्‍न सूसनमधील कर्मचारीच विचारू लागले आहेत.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे व्यवस्थापन व समन्वयाचा संपूर्ण प्रशासकीय अधिकार विभागीय आय़ुक्त डॉ.  म्हैसेकर यांना देण्यात आला आहे. महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. डॉ. म्हैसेकर यांच्याकडे प्रशासकीय आणि अधिष्ठात्यांकडे आर्थिक अधिकार असतील, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख