प्रचारात जुन्या म्हणींचा नव्याने प्रत्यय 

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठीच्या प्रचार आज संपला. गेले 15 दिवस राज्यात रणधुमाळी सुरू होती. या प्रचारामुळे मराठी भाषेचे जुने वैभव खुले केले.
प्रचारात जुन्या म्हणींचा नव्याने प्रत्यय 

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठीच्या प्रचार आज संपला. गेले 15 दिवस राज्यात रणधुमाळी सुरू होती. या प्रचारामुळे मराठी भाषेचे जुने वैभव खुले केले. सर्वांना चकीत केले ते शरद पवार यांनी. फडणवीस हे अपघाताने आणि नशिबाने झालेले मुख्यमंत्री आहेत, हे सांगण्यासाठी त्यांनी "आंधळ्याचा हात ....वर' या म्हणीचा वापर केला. त्यांनी म्हणीतील "तो' शब्द उच्चारला नाही. पवार यांच्यासारख्याने या अश्‍लिल आणि रूचिहिन म्हणीचा केलेला वापर खटकण्यासारखाच. फडणवीसांनी शिवसेनेसकट इतर विरोधकांच्या घोषणा म्हणजे "लबाडाघारचं आवतणं' सांगितलं. तसे भाजपच्या घोषणा म्हणजे "बोलाचा भात आणि बोलाची कढी' नसल्याचं स्पष्ट केलं. अजित पवार यांनी "चार दिवस सासूचे, चार दिवस सूनेचे' या म्हणीचा आधार घेत, भाजप सरकार ताम्रपट घेऊन सत्तेवर आले नसल्याच जोरात सांगितले. उद्धव ठाकरे यांनी "बूच लावणे' हा वाक्‍प्रचार थेट पीएम आणी सीएमसाठी वापरला. "गाजर दाखविणे,' हा वाक्‍प्रचारही भाजपच्या खोट्या आश्‍वासनांबद्दल वापरण्यात आला. 

नेत्यांच्या माहीत नसलेल्या बाबीही उघड 
उद्धव ठाकरे यांच्या सात कंपन्या असून, एका कंपनीत तर छगन भुजबळ यांच्याशी पार्टनरशिप असल्याची नवीन आणि धक्कादायक माहिती प्रचाराच्या निमित्ताने कळाली. उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीचाही हिशोब लावण्याचे काम सुरू झाले. तसेच आदित्य ठाकरे यांचा रूफ टॉफ पार्टी कल्चरशी जवळचा संबध असल्याच्या बाबी भाजप नेते आशिष शेलार यांनी कानावर घातल्या. "मंत्रिपदे मिळाल्याने मुख्यमंत्र्यांसह काही जणांना मुंबईची माहिती झाली. नाहीतर अनेकांना मुंबई तरी माहीत होती का, अशी टीका युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली. यामुळे भाजप नेत्यांचे भौगोलिक ज्ञान उघड झाले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी माजी सहकारमंत्री व कॉंग्रेस नेते भाजपमध्ये येण्यास आतुर होते, याचा गौप्यस्फोट केला. हे गुपित फोडून त्यांनी कॉंग्रेसवर उपकार केले. शिवसेना ही केवळ "लेना बॅंक' असल्याचे सीएमनी उघड करून सांगितले. राज ठाकरे हे उत्तम नकलाकार असल्याचे सीएमनी कौतुक केले. तरीही राज यांनी सीएमची नक्कल करण्याचे टाळले. "पारदर्शक कारभार' आणि "मंत्र्यांचे राजीनामे' हे दोन शब्द प्रचार काळात सर्वाधिक उच्चारले गेले. नोटाबंदीमुळे भाजप सोडून इतर पक्षांना निधीची टंचाई भासत असल्याचे धक्कादायक विधान पवार यांनी केले. राष्ट्रवादीला निधीची टंचाई भासू शकते, ही देखील नवीन बाब उघडकीस आली. 

"सोशल मिडियात' गाजरं फेमस 
ही निवडणूक सोशल मिडियावर देखील गाजली. त्यातल्या त्यात "गाजरा'ने भाव खाल्ला. भाजपच्या खोट्या प्रचाराचे गाजर हे प्रतिक बनले. शिवसेनेच्या विरोधात "मंत्र्यांचे राजीनामे' हा टिंगलीचा विषय ठरला. भाजपची पारदर्शक कारभाराची मागणीची खिल्ली आणि कौतुक दोन्ही झाले. मुख्यमंत्री विधानसभेत भाषण करताना "अध्यक्ष महोदय,' हा शब्द वारंवार वापरतात. या शब्दावरूनही मुख्यमंत्र्यांना धुण्यात आले. "पारदर्शक कारभार' हा शब्द सोशल मिडियात इतका गुळगुळीत झाला की त्याचा ट्रेंडच तयार झाला. मुख्यमंत्री भाषणात किती वेळा पाणी पितात, हे देखील नेटकऱ्यांनी मोजले. शिवसेना आणि भाजपमध्येच इतके सोशल मिडिया वॉर रंगले की दोन्ही कॉंग्रेसची कोणी यात दखलही घेईना. 

मुख्यमंत्र्यांच्या फसलेल्या 
सभेला जबाबदार कोण? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील शनिवारची दुपारी दोनची सभा पूर्णपणे फसली. 150 -200 ही श्रोते नसल्याने सीएमना सभास्थानी येऊनही भाषण न करताच पुण्यातून परतावे लागले. भाजपच्या प्रचाराने गाठलेला कळस या फसलेल्या सभेमुळे क्षणार्धात आदळला. पालकमंत्री गिरीश बापट यांनी "कम्युनिकेशन गॅप'मुळे सभेला गर्दी नसल्याचे सांगितले. तसेच चूक झाल्याचेही मान्य केले. एकाच वेळी अनेक नेते असतील तर नियोजन कसे फसते, हे पुण्यातील भाजपच्या कारभारामुळे दिसून आले. दुपारची सभा घेण्याचे धाडस यापुढे कोणताही नेता करणार नाही, एवढा संदेश यातून गेला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com