sarkarnama bulletine | Sarkarnama

धनंजय महाडिक देशात "टॉपर' 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 मार्च 2017

संसदेत सर्वाधिक 704 प्रश्‍न विचारून कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक हे देशात "टॉप वन' ठरले असून पहिल्या दहा क्रमांकांत राज्यातील नऊ खासदारांचा समावेश आहे.

संसदेत सर्वाधिक 704 प्रश्‍न विचारून कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक हे देशात "टॉप वन' ठरले असून पहिल्या दहा क्रमांकांत राज्यातील नऊ खासदारांचा समावेश आहे. संसदेतील उपस्थिती, विचारलेले प्रश्‍न व चर्चेतील सहभाग या निकषावर पीआरएस इंडिया या संस्थेने सर्वेक्षण करून खासदारांचा लेखाजोखा जाहीर केला आहे. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार महाडिक या सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्याच नेत्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. पार्लमेंटरी रेटिंग सिस्टीम (पीआरएस) या संस्थेच्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील खासदारांचा आवाजच संसदेत जास्त घुमल्याचे आढळून आले आहे. दिल्लीत मराठी खासदारांनी चांगली चर्चा घडवून आणल्याचे "पीआरएस'च्या सर्वेक्षणावरून स्पष्ट होत आहे. सुप्रिया सुळे यांनी 703 प्रश्‍न विचारले, 29 वेळा चर्चेत सहभाग घेतला, तर त्यांची सभागृहातील उपस्थितीत तब्बल 95 टक्के आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा तिसरा क्रमांक आहे. त्या पाठोपाठ शिवसेनेचेच शिवाजीराव आढळराव पाटील यांचा क्रमांक आहे. त्यानंतर त्यांच्याच पक्षाचे आनंदराव आडसूळ, गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे. संसदेत राज्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केवळ चार खासदार आहेत; पण यापैकी तीन खासदार पहिल्या दहांमध्ये आहेत. 

उदयनराजेंची कामगिरी "शून्य' 
खासदार उदयनराजे भोसले यांनी गेल्या अडीच वर्षांत लोकसभेत एकही प्रश्‍न विचारलेला नाही, त्यांचा चर्चेतील सहभागही शून्यच असून उपस्थितीही फक्त 29 टक्के आहे. "टॉप टेन'मध्ये कॉंग्रेसच्या राजीव सातव यांचाही समावेश आहे. भाजपच्या एकमेव खासदार हीना गावीत यांचा चर्चेतील सहभाग या सर्वेक्षणातून दिसून येतो. "टॉप टेन'मध्ये उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव या एकमेव राज्याबाहेर खासदाराचा समावेश आहे. 

पुण्याची ताकद...गिरीशजी बापट, 
काकडे फ्लेक्‍सवरून गायब! 

पुणे महापालिकेच्या इतिहासात 98 जागा निवडून आणून स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा पराक्रम भाजपने केला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे या निवडणुकीची सुत्रे सुरवातीला देण्यात आली होती. मात्र ते यात कमी पडत असल्याची सहा महिन्यांपूर्वी चर्चा होती. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेचे खासदार आणि उद्योजक संजय काकडे यांना सक्रिय व्हायला सांगितले. त्यातून काकडे आणि बापट असे वादाचे चित्र निर्माण झाले होते. काकडे यांनी इतर पक्षांतील अनेक मंडळी भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या दाव्यानुसार त्यांनी स्वतः उमेदवारीसाठी शिफारस केलेले 50 जण निवडून आले आहेत. मात्र याच काकडे यांना निकालाच्या दिवशी स्वतंत्र पत्रकार परिषद घ्यायची होती. मात्र बापट यांनी तो प्रयत्न हाणून पाडल्याचे सांगण्यात येते. आता तर काकडे यांनी भाजपमध्ये आणलेल्या, तिकिट मिळवून दिलेल्या आणि विजयी झालेल्या उमेदवारांनी काकडेंचा फोटो फ्लेक्‍समध्ये लावण्याचे टाळले आहे. बापट यांच्या समर्थकांनी मात्र "पुण्याची ताकद...गिरीश बापट', असे फ्लेक्‍स लावले आहेत. 

शिरोळे यांचा बापट यांच्यावर डाव! 
पुण्यातील भाजपचे खासदार अनिल शिरोळे हे स्वच्छ प्रतिमेचे समजले जातात. आता ते पक्षाच्या धोरणानुसार पारदर्शकही होऊ लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेत पारदर्शकता येण्यासाठी तेथे लोकउपायुक्त नेमण्याची घोषणा केली. शिवसेनेच्या खाबूगिरीला आळा घालणयासाठी ही घोषणा असल्याचे बोलले गेले. शिरोळे यांनी असाच लोकउपायुक्त पुणे महापालिकेत नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. भाजपकडे सत्ता असताना पुण्यातही खाबूगिरी होण्याची भीती शिरोळे यांना वाटत असावी का? फडणवीस यांनी लोकायुक्त नेमण्याची घोषणा करून शिवसेनेला डाव टाकला असे बोलले जाते. शिरोळे यांनी बापट यांच्यावर डाव टाकला, असे म्हणावे का? 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख