सरकारनामा बुलेटिन

सरकारनामा बुलेटिन

पुण्यात भाजपचे विमान 
जमिनीवर येण्याचा धोका 

महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुण्यात भाजपचे कमळ जोमाने फुलणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. "प्राब' या संस्थेने हे सर्वेक्षण केले होते आणि ते वृत्तपत्रांत प्रसिद्धही झाले होते. पुणेकरांची सर्वाधिक पसंती भाजपला असून भाजप 72 जागांवर विजय मिळविणार असल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. आता तिकिट वाटपानंतर एक सॅंपल सर्व्हे या संस्थेने घेतला आहे. तो सोशल मिडियात फिरतो आहे. निवडणुकीची खरी दंगल सुरू झाल्यानंतर तिकिट वाटपात भाजपात गोंधळ झाला. सक्षम उमेदवार डावलून कमजोर उमेदवार दिले गेले. गुंडांचा पक्ष म्हणून पक्षाची हेटाळणी झाली. अशा साऱ्या पार्श्‍वभूमीवर भाजपला पुण्यात केवळ 52 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यात भाजपसाठी सध्यासारखी सर्वाधिक अनुकूल स्थिती या पूर्वी केव्हाच नव्हती. तरीही भाजप सत्तेच्या आसपास जाऊ शकत नसेल तर तो मोठा धक्का ठरू शकेल. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे यांच्यासह सीएमसाठीही हा अंदाज धसका घ्यावा असा आहे. 

नागपुरातही भाजपला अडसर 
मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या रेट्यामुळे नागपुरात प्रचंड विकामकामे होत आहे. नागपूर महापालिकेत गेल्या 10 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. विकास कामांच्या धडाक्‍याने नागपुरात पुन्हा कमळच फुलेल, असा निवडणूकपूर्व अहवाल भाजपला मिळाला होता. या अहवालानुसार भाजपला शंभरवर जागा मिळाले, असे म्हटले होते. मात्र उमेदवारांच्या तिकीट वाटपावरून वादंग झाले. भाजपात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. संघाच्या स्वयंसेवकांनीही आदेश पाळण्यास नकार दिला. यामुळे निवडणुकीचे सारे गणित फिस्कटले. भाजपने केलेल्या नव्या अहवालाने भाजपची धावसंख्या 60 येऊन ठेपली आहे. या अहवालाने भाजपच्या नेत्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभांची आठवण झाली आहे. नागपुरात अद्याप दोघांच्या जाहीर सभा झाल्या नाहीत. या सभांशिवाय 75 चा बहुमताचा आकडा गाठणे भाजपच्या नेत्यांना कठीण वाटू लागले आहे. 

सोन्याच्या ताटावरून केळीच्या पानावर.... 
उस्मानबादेत प्रचारसभा संपल्यानंतर कॉंग्रेसचे नेते सोन्याच्या ताटात जेवताना दिसले. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांवर भाजपने सडकून टीका केली होती. सोनेरी ताटात जेवण्याची ही कॉंग्रेसची संस्कृती असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला होता. या टिकेनंतर कॉंग्रेस नेते सावध झाले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या दोघांची सरसम (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील सभा झाल्यानंतर त्यांनी एका कॉंग्रेस कार्यकर्त्याच्या घरी केळीच्या पानावर जेवण केले. अशोकरावांच्या गाडीत केळीच्या पानांचा एक गाठोडेच सोबत ठेवलेले असते, असे म्हणतात. 

नागपूरातील कॉंग्रेस नेते कधी सुधारणार? 
नागपुरातील कॉंग्रेसमधील मतभेद मिटण्याची कोणतीही शक्‍यता दिसत नाही. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांच्या गटाला झुकते माफ न मिळाल्याने दोघेही तेथील कॉंग्रेसचे जहाज बुडविण्याच्या तयारीला लागले आहेत. नितीन राऊत यांनी उत्तर नागपुरातील प्रभागात केवळ आपल्या मर्जीतील कॉंग्रेस उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता सतीश चतुर्वेदी यांनी एक पाऊल पुढे टाकत अपक्ष उमेदवारांचा प्रचारात आघाडी घेतली आहे. कॉंग्रेस उमेदवारांना त्यांनी साहजिकच वाऱ्यावर सोडले आहे. 

राजू शेट्टींचा चंद्रकांत पाटलांना दणका 
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधील नाराजांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना त्यांचे महायुतीतील घटक पक्षांकडे दुर्लक्ष होत गेले. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी व राष्ट्रवादीच्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने गट यांच्यात विळ्याभोपळ्याचे नाते असताना चंद्रकांतदादांनी माने गटाला जवळ केले. स्वाभिमानीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसवर अधिक राग असल्यामुळे त्यांना ही आघाडी रूचली नाही. माजी मंत्री विनय कोरेंच्या बाबतीत तसेच झाले. स्वाभिमानीच्या प्रभाव क्षेत्रात अन्य घटकांशी आघाडी करताना पाटील यांनी स्वाभिमानीच्या नेत्यांना विश्‍वासात घेतले नाही, हा त्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे भाजपसोबतची युती शेट्टींनी धुडकावून लावली. त्याचा फटका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना बसण्याची चिन्हे आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com