SARKANAMA EXCLUSIVE अंकिता हर्षवर्धन पाटील यांचा पत्ता कट : काॅंग्रेसनेच दिला धक्का!

SARKANAMA EXCLUSIVE अंकिता हर्षवर्धन पाटील यांचा पत्ता कट : काॅंग्रेसनेच दिला धक्का!

पुणे : राजकारणात कोण कोणाला कधी धक्का देईल, याचा नेम नाही. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि पक्षाचे पुणे जिल्ह्याचे कारभारी हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्याच पक्षातून धक्का मिळेल, असे त्यांना कधीच वाटले नसते. पण नाट्यपूर्ण घडामोडींत त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांचा पत्ता पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतून कापण्यात आला.

पुणे जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्या म्हणून अंकिता नुकत्याच निवडून आल्या. स्थायी समितीच्या सर्वांत तरुण सदस्य म्हणून त्यांची आज निवड होणार होती. हर्षवर्धन यांच्या मातोश्री या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्या होत्या. त्यांच्या निधनानंतर अंकिता या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. त्यामुळे स्थायी समितीत अंकिता यांचीच निवड करण्याचे ठरले होते. मात्र हर्षवर्धन यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेची माशी शिंकली आणि अंकिता यांचा पत्ता कापण्यात आला.

जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी अंकिता पाटील यांच्याऐवजी दत्ता झुरुंगे यांची स्थायी समितीवर निवड करावी, असे पत्र पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांना दिले. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत झुरुंगे यांची निवड होणार आहे. झुरुंगे हे कृषी समितीचे सदस्य आहेत. एका सदस्याला एकाच समितीवर जाता येते. त्यामुळे झुरुंगे यांचा कृषी समितीचा राजीनामा घेत तो तातडीने मंजूर करण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनीही झुरुंगे यांचा राजीनामा मंजूर झाल्याचे सांगितले. 

अंकिता यांचा पत्ता कापण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पुढे आले आहे.  हर्षवर्धन यांची कोंडी करण्याचे प्रयत्न त्यातून सुरू असल्याचे दिसून आले आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील हे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून उभेच राहणार आहेत. ती जागा त्यांच्यासाठी सोडण्यास राष्ट्रवादी तयार नसल्याचेही या घडामोडींतून दिसून येते आहे. काॅंग्रेसनेचे त्यांना धक्का दिल्याने हर्षवर्धन यांना भाजपचा रस्ता धरावा लागेल, अशी चिन्हे आहेत. याबाबत जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधूनही तो झाला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com