...आणि तरुण संतोष दानवेंना मिळाल्या लग्नासाठी शुभेच्छा ! - santosh danave | Politics Marathi News - Sarkarnama

...आणि तरुण संतोष दानवेंना मिळाल्या लग्नासाठी शुभेच्छा !

तुषार पाटील
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

"ये भोकरदन चुनाव क्षेत्र के विधायक है... असे म्हणाताच क्‍या, ये विधायक है, इनकी उमर से तो लगता नही' असे म्हणत निवा जैन यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. गप्पांच्या ओघात भोकरदनला मी उपविभागीय अधिकारी असतांना आम्ही दोघेही बॅचलर होतो अशी माहिती लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी निवा यांना दिली. तेवढ्यात "आपकी भी शादी जल्दी हो जाए इसके लिए मै आपको शुभकामनाए देती हू' अशा शब्दात निवा जैन यांनी संतोष दानवेंना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.

भोकरदन : एखादी व्यक्ती स्वतःला व्यायामाने अगदी फीट ठेवत अशेल तर त्याचे नेमके वय कळत नाही त्याचबरोबर ती व्यक्ती आपल्या पदाचा बडेजाव न करता साधेपणा राखत असेल तर त्याच्याकडे पाहण्याच्या नजरा बदलतात. त्याच्या वेगळेपणाची दखल घेतली जाते, मित्रत्वाच्या नात्याने काही सल्ले - शुभेच्छाही पटकन दिल्या जातात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे पुत्र व भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांच्याबाबतीत ही गोष्ट नुकतीच घडली. स्वभावातील साधेपणा, वय वर्ष 31 आणि कुठलाही बडेजाव नसल्यामुळे ते आमदार आहेत असे कुणाला वाटतच नाही. आपल्या जवळच्या मित्राच्या लग्नाला ते गेले आणि तिथे त्यांची ओळख करून दिल्यावर वधुने त्यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सीईओ लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या विवाहास ते उपस्थित राहिले त्यांची ओळख करून दिल्यावर त्यांच्या नवपरिणीत पत्नी निवा जैन यांनी संतोष दानवे यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित सर्वानांच हसू आवरले नाही. संतोष दानवे यांचे आधीच लग्न झाले आहे हे कळल्यावर जैन यांनी देखील तुमच्याकडे पाहून वाटत नाही असे म्हणत आश्‍चर्य व्यक्त केले. 

लक्ष्मीनारायण मिश्रा हे भोकरदनमध्ये 2014 ते 17 च्या दरम्यान उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. वाळूमाफिया व अवैधधंदे करणाऱ्यांच्या त्यांनी चांगल्याच मुसक्‍या आवळल्या होत्या. या शिवाय 2014 मध्ये झालेली विधानसभा व लोकसभा निवडणुका देखील त्यांच्या काळात झाली. राजकारणी व सर्व सामान्यांना समान वागणूक दिल्यामुळे तालुक्‍यात त्यांचे अनेक चाहते होते. भोकरदनमध्ये काम करत असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांच्याशी मिश्रा यांची मैत्री झाली. समवयस्क आणि तेव्हा बॅचलर असलेल्या संतोष दानवे यांच्यांशी त्यांची चांगली गट्टी जमली होती. एरवी प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांच्यात मित्रत्वाचे संबंध फारसे तयार होत नाहीत, झालेच तर ते औपचारिक असतात. इथे मात्र दोघेही जवळचे मित्र झाले. 

आयएएस झाल्यानंतर महाराष्ट्र केडरमधून मिश्रा यांची रत्नागिरी येथे सीईओ म्हणून नियुक्ती झाली. रत्नागिरीत रूजू झाल्यानंतर 10 ऑक्‍टोबर रोजी त्यांचा विवाह (आयपीएस) दिल्लीच्या पोलीस अधिक्षक निवा जैन यांच्याशी झाला. भोकरदनमध्ये तीन वर्ष घालवल्यामुळे दानवे कुटुंबाशी मिश्रा यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. याच स्नेहातून मिश्रा यांनी दानवे कुटुंबाला लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आमंत्रित केले. रावसाहेब दानवे यांना लग्न समारंभाला उपस्थित राहणे शक्‍य झाले नसले तरी संतोष दानवे यांनी मात्र आर्वजून हजेरी लावली. 

ये विधायक है... 
संतोष दानवे आपल्या निवडक मित्रांसोबत स्वागत सोहळ्याला उपस्थित राहिले. राजकारण्यांमागे असती तशी कुठलीही गर्दी नाही, की पेहराव नाही. साध्या वेषात आलेल्या संतोष दानवे यांना पाहून लक्ष्मीनारायण मिश्रा पुढे सरसावले आणि त्यांना अलिंगन देऊन त्यांचे स्वागत केले. नवविवाहितांना पुष्पगुच्छ दिल्यानंतर अर्थात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तत्पुर्वी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संतोष दानवे यांची पत्नीशी ओळख करून दिली. 

"ये भोकरदन चुनाव क्षेत्र के विधायक है... असे म्हणाताच क्‍या, ये विधायक है, इनकी उमर से तो लगता नही' असे म्हणत निवा जैन यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. गप्पांच्या ओघात भोकरदनला मी उपविभागीय अधिकारी असतांना आम्ही दोघेही बॅचलर होतो अशी माहिती लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी निवा यांना दिली. तेवढ्यात "आपकी भी शादी जल्दी हो जाए इसके लिए मै आपको शुभकामनाए देती हू' अशा शब्दात निवा जैन यांनी संतोष दानवेंना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. तेव्हा मात्र मिश्रा यांच्यासह दानवे यांच्या सोबत आलेले त्यांचे मित्र देखील हसू लागले. यावर आणखी सस्पेन्स नको म्हणून लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी "संतोषजी की शादी हो चुकी है' असे सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख