संजय तुला आशीर्वादाची काय गरज ?

संजय तुला आशीर्वादाची काय गरज ?

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिसस्पर्श झाला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील मुलाला आमदार होता आलं. मला आजही आठवते पहिल्यांदा जेव्हा मी विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी मातोश्रीवर बाळासाहेबांकडे गेलो, तेव्हा अनेक दिग्गज उमेदवारीसाठी रांगा लावून उभे होते. त्या नावांच्या तुलनेत मी अगदीच किरकोळ होतो. परंतु शिवसेनेसारख्या संघटनेत अनेक वर्ष काम करत असताना बाळासाहेबांचा लाभलेला सहवास, त्यांनी केलेल्या कामाची घेतलेली दखल याचा अनुभव मला त्यावेळी आला. 

बाळासाहेब आपल्या खोलीत बसलेले होते, उमेदवारी मागणाऱ्यांची गर्दी होती. तेवढ्यात मी साहेबां समोर जाऊन उभा राहिलो. साहेबांनी नेहमीप्रमाणे " काय संजय कसा काय आलास' अशी विचारणा केली, तेव्हा मी म्हणालो, साहेब विधानसभा लढवण्याची इच्छा आहे. "मग काय अडचण आहे, ' असा प्रतिप्रश्न साहेबांनीच मला केला. "साहेब तुमचा आशीर्वाद पाहिजे तेव्हा, संजय तुला आशीर्वादाची काय गरज ? माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे, जा कामाला लाग' अशा शब्दात बाळासाहेबांनी अवघ्या काही मिनिटातच मला विधानसभेची उमेदवारी दिली. 

माझ्यासाठी हा आश्‍चर्याचा धक्का होता, परंतु इतर राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी देताना जी फूटपट्टी लावली जाते, ज्यामध्ये किती खर्च करू शकेल, हा पहिला प्रश्न विचारला जातो. बाळासाहेबांकडे मात्र अशा प्रश्नाला धारा नव्हता. पक्षातील काम आणि निष्ठा या जोरावरच माझ्यासारख्या असंख्य फाटक्‍या गरीब, पायात चप्पल नसलेल्या सामान्य शिवसैनिकांना बाळासाहेबांनी आमदार खासदार केले. मला जर राजकारणात आणि तुमच्या आयुष्यात तुमचे गुरु कोण असा प्रश्न विचारला तर मी माझे वडील आणि बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव घेईन. बाळासाहेबानी तेव्हा संधी दिली नसती तर मी तीनवेळा आमदार होऊ शकलो नसतो. बाळासाहेब जेव्हा खूप आजारी होते तेव्हा ते फारसे कुणाला भेटत नव्हते. अगदी महत्त्वाच्या आणि मोजक्‍या लोकांना ते वेळ द्यायचे. एकदा चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे आणि मकरंद अनासपुरे त्यांच्या एका चित्रपटाच्या निमित्ताने माझ्याकडे आले होते. बाळासाहेबांची भेट घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मी त्यावेळचे बाळासाहेबांचे सहाय्यक रविंद्र म्हात्रे यांना फोन करून वेळ मागितली. आजारपण आणि कमी लोकांना भेटण्याच्या साहेबांच्या नियमामुळे मला वेळ मिळेल का नाही अशी शंका होती. परंतु साहेबांनी मला वेळ दिला. दुसऱ्या दिवशी आम्ही तिघेही मातोश्रीवर बाळासाहेबांकडे गेलो. साहेबांनी आम्हाला तब्बल अडीच तासांचा वेळ दिला. यादरम्यान त्यांनी अनेक आठवणी आणि किस्से सांगितले. बाळासाहेबांच्या आजारपणाच्या काळात मला लाभलेला हा सर्वात मोठा सहवास होता. 

(शब्दांकन : जगदीश पानसरे )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com