संजय शिरसाट यांनी भाजप बंडखोराचा चाळीस हजार मतांनी पराभव

शिंदे यांचा शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी तब्बल 40054 मतांनी दणदणीत पराभव केला.
sanjay sirsat
sanjay sirsat

औरंगाबाद: शहरातील पश्‍चिमची जागा शिवसेनेसाठी अवघड आहे, इथे अटीतटीची लढत होईल, शिरसाट पराभूत होतील अशा चर्चांना कालपर्यंत उधाण आले होते. शिवसेनेच्या नेत्यांनी देखील इथे काटे की टक्कर होईल पण विजय आमचाच असे सांगितले होते.

संजय शिरसाट यांनी पश्‍चिमध्ये नुसता विजय मिळवला नाहीतर, विक्रमी विजय मिळवत हॅट्रीक साधली. ज्या भाजप बंडखोर राजू शिंदे यांच्यामुळे शिरसाट यांच्या विजयाबद्दल शंका उपस्थित केल्या जात होत्या, त्या शिंदे यांचा शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी तब्बल 40054 मतांनी दणदणीत पराभव केला.

पश्‍चिम मतदारसंघात शिवसेनेचे संजय शिरसाट पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. ती त्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. संजय शिरसाट यांना 83099 तर अपक्ष राजू शिंदे यांना 43045 मते मिळाली. एमआयएमचे अरूण बोर्डे 39211 मत घेऊन तिसऱ्या क्रमाकांवर तर वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाट 25500 मतांसह चौथ्या स्थानवर राहिले.

औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महायुतीच्या उमेदवाराचे मताधिक्‍य कमी होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र शिवसेना-भाजप महायुतीचा पारंपरिक मतदार महायुतीसोबत असल्याचे यावेळी दिसून आले. वंचित-एमआयएम स्वतंत्र लढल्याचा फायदा देखील संजय शिरसाट यांना झाल्याचे त्यांना मिळालेल्या मताधिक्‍यावरून स्पष्ट होते. राजू शिंदे स्वःताची हवा निर्माण करण्यात यशस्वी झाले होते, पण निकालानंतर ती हवाच होती हे सिध्द झाले आहे.

काही लोकांनी माझ्या विरुद्ध प्रचार केला- संजय शिरसाट

मतदारांनी मला भरघोस मतांनी विजयी केले त्यांचा मी मनापासून आभारी आहे. अनेक जणांचा माझ्या विजयामध्ये वाटा आहे. गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकास कामांची जनतेने मला पावती दिली आहे. या विजयामुळे माझी निश्‍चितच जबाबदारी वाढली असल्याची प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. भाजपच्या काही लोकांनी माझ्या विरोधात प्रचार केल्याची खंत देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com