दगाफटक्‍यामुळे शिवसेना लिहून मागते का ! 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत की प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे. यांनी एखादा शब्द दिला की तो अंतिम असे. युती धर्म पाळला जात असे. पण, आजकालचा भाजप हा वाजपेयी-अडवानींचा राहिला नाही अशी भावना शिवसेनेत का निर्माण झाली. याचे उत्तर भाजपचे आजचे नेतृत्व देत नाही. जे ठरलं होतं ते "लिहून द्या' अशी म्हणण्याची वेळ शिवसेनेवर कोणी आणली याचे उत्तरही मिळाले पाहिजे.
दगाफटक्‍यामुळे शिवसेना लिहून मागते का ! 

आजकालचे राजकारण "विश्‍वास'चे राहिले नाही. निष्ठा, तत्त्व, आदर या गोष्टीला काही महत्त्व राहिलेले नाही. कोलांटउड्या, विश्वासघात, आयाराम-गयारामांना तर इतके महत्त्व आले की जणू काही तेच राजकारणातील आदर्श होऊ पाहत आहेत. एकीकडे असे चित्र असले तरी सगळेच नेते विकाऊ आणि निष्ठा बदलणारे असतात असेही काही समजण्याचे कारण नाही.

राजकीय मंडळींवर विश्वास कोणी ठेवायचा हा प्रश्‍नच सातत्याने विचारला जातो. एखाद्या नेत्याने शब्द दिला आहे आणि तो पाळला असे खूप कमी नेते पाहण्यास मिळतात. हे सर्व सांगण्याचे कारण असे की शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती असलेले पक्ष म्हणून ओळखले जातात. मात्र या दोन्ही पक्षांचा एकमेकांवर काडीमात्र विश्वास राहिलेला. 

गेल्या दहा दिवसापासून राज्यात महायुतीने सत्तेचा खेळखंडोबा चालवला आहे. या दोन्ही पक्षाला जनतेने बहुमत दिले तरी सरकार अस्तित्वात येत नाही. नैसर्गिक आपत्तीत शेतकरी देशोधडीला लागला आहे. जीवनमरणाची लढाई तो लढतो आहे. जगावं की मरावं हा त्याच्यासमोरचा प्रश्‍न.

तरीही संकटाला न डगमगता तो प्राण मुठीत घेऊन लढतो आहे. आपले नेतेमंडळी त्यांचे अश्रू पुसण्याचे किमान नाटक करीत आहे हे ही नसे थोडके. मायबाप सरकार आम्हाला मदत करेल या विश्वासावर तो आहे. सरकार आता केव्हा मदतीचा हात देईल ते पहावे लागले. असे भयावह चित्र राज्यात आहे. 

सत्ता स्थापनेचे रामायण सुरू असताना तुम्हाला सत्ता स्थापन करायची असेल तर मुख्यमंत्रिपदाबाबत "लिहून द्या' असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला सुनावले. राजकारणाची पातळी किती खालावत चालली आहे हे यावरून स्पष्ट होते. म्हणजेच एकमेकांवर अजिबात विश्वासच राहिला हे दिसून येते. दिलेला शब्द भाजप पाळत नाही.

जे ठरले होते त्याचे विस्मरण भाजपला झाले असे शिवसेनेचे मत आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर मोदी लाटेत परममित्र शिवसेनेची दोस्ती तोडली. विधानसभा निवडणुकीत दगाफटका झाला. शिवसेना एकाएकी पडली. एकटी लढली. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी (2019) भाजपला पुन्हा शिवसेनेची गरज लागली. भाजपच्या मंडळींनी मातोश्रीच्या पायरीवर नाक घासले.

संकटात जुन्या मित्राची आठवण झाली. चुकलो, यापुढे जे काही यश मिळेल त्यात निम्मा निम्मा वाटा असेल असे जाहीरपणे सांगितले होते. याचे नेमके विस्मरण का झाले ? केंद्रात पुन्हा मोदी सरकार बहुमतांनी दुसऱ्यांचा येताच "येरे माझ्या मागल्या'प्रमाणे भाजपने आपले रूप दाखविलेच. 

पन्नास -पन्नास टक्के ठरलेच नव्हते आणि मुख्यमंत्रिपदाबाबत तर काहीच ठरले नव्हते. असे बेधडक खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठासून सांगितले. त्यानंतर खऱ्या अर्थाने रामायणाला सुरवात झाली. शिवसेनेने आपली वाघनखे बाहेर काढली आणि तुम्ही सरकार बनवा. आमचा काय संबंध ? असा पवित्रा घेताच भाजपची मंडळी खडबडून जागी झाली. दिवाळी दिवशी फडणवीस पुन्हा मीच असे म्हणाल्यानंतर शिवसेनेने त्या दिवसापासूनच आजपर्यंत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार हे ठासून सांगण्यास सुरवात केली. 

संजय राऊत हे दररोज भाजपवर निशाना साधत आहेत. शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या जवळ गेल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहण्यास मिळाले. राऊत यांनी आपल्या लेखणीने आणि वाणीने भाजपवर असे ओरखडे ओढले की भाजपची मंडळी घायाळ झाली. भाजपचा प्रत्येक मुद्दा त्यांनी खोडून काढला.

आज कुठे भाजपने दोन पावलं मागे घेताना प्रस्ताव द्या, अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा करू असे सांगण्यास सुरवात केली. भाजप सत्तेसाठी पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले. त्यानंतरही कसला प्रस्ताव मागता असे सांगत जे ठरलं होतं ते लिहून द्या असे सांगत राऊत यांनी भाजपवर विश्वास दाखविला नाही. याचाच अर्थ जे ठरले होते ते विसरले जात असेल. खोट बोलले जात असेल तर विश्वास कसा ठेवायचा हाच प्रश्‍न राऊत करीत आहेत. म्हणजे विश्वासाचे राजकारण या दोन्ही पक्षात राहिले नाही. 

पूर्वी याच पक्षाचे नेते जे बोलत तेच होत असे.त्यांनी एखादा शब्द दिला की तो पाळला जात. तेच भाजपच्या मंडळीविषयी होते. पण, आजकालचा भाजप हा वाजपेयी-अडवानींची राहिला नाही अशी भावना शिवसेनेत का निर्माण झाली याचे उत्तर भाजपचे आजचे नेतृत्व देत नाही. ज्या शिवसेनेने भाजपला बोट धरून घराघरांत पोचविले त्याच शिवसेनेला गेल्या पाच वर्षात कस्पटासमान वागणूक दिली. हे काही लपून राहिले नाही. सत्तेची नशा चढलेल्या भाजपच्या काही नेत्यांनी केलेले अवमान ती निमूटपणे सहन करीत राहिली. 

भाजपवर पुन्हा विश्वास ठेवला. मित्र आपणाला विसरणार नाही असे शिवसेनेला वाटत होते. पण, तसे झाले नाही. मित्र नेहमीच दगाफटका देतो याची भीती मित्राच्या मनात आहे त्यामुळेच जे ठरलंय ते "लिहून द्या 'असे जर शिवसेना म्हणत असेल तर ते चुकीचे आहे असे कसे म्हणता येईल. याचाच अर्थ राजकारणात विश्वास राहिला नाही. यापुढे प्रत्येक पक्षात जे ठरेल ते प्रतिज्ञापत्रावर लिहून घ्यावे लागेल ? याचाच अर्थ कोणी कोणावर विश्वास ठेवायचा !  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com