Sanjay Raut takes Cautious stand on Congress Lead Meeting | Sarkarnama

काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीबाबत संजय राऊतांची सावध भूमिका

दीपा कदम
मंगळवार, 14 जानेवारी 2020

महाराष्ट्राने सीएए बाबत ठोस भूमिका घेतली नसल्याने शिवसेनेच्या भूमिकेविषयी कॉंग्रेसला विश्‍वास वाटत नसल्याने शिवसेनेला विरोधकांच्या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले अशी चर्चा आहे

मुंबई  : महाविकास आघाडीसाठी कॉंग्रेस आणि शिवसेनेने हातमिळवणी केली असली तरी शिवसेनेच्या धर्मनिरपेक्ष भूमिकांविषयी कॉंग्रेसला अद्यापही पुरेशी खात्री वाटत नाही. कॉंग्रेसने नागरिकत्व संशोधन विधेयकाबाबत सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा आमंत्रित केले असले तरी शिवसेनेच्या भूमिकेविषयी कॉंग्रेसला अंदाज येत नसल्याने विरोधकांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीपासून शिवसेनेला दूर ठेवण्यात आले. शिवसेनेनेही याविषयी सावध भूमिका घेत या बैठकीबाबत गैरसमज झाल्याची सारवासारव शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केली आहे.

महाविकास आघाडी स्थापन करण्यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून शिवसेना बाहेर पडली. केंद्र सरकारमध्ये असलेल्या कॅबिनेट मंत्रीपदाचाही शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांनी राजिनामा दिला. मात्र सीएएचे विधेयक लोकसभेत मंजूर करताना शिवसेनेने पाठिंबा दिला. तर राज्यसभेत मतदानात भाग न घेता सभात्याग केला. शिवाय कॉंग्रेसप्रणीत सर्व राज्ये, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांनी सीएए कायद्याची त्यांच्या राज्यात अंमलबजावणी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र महाराष्ट्राने अद्याप याबाबत ठोस भूमिका घेतली नसल्यानेही शिवसेनेच्या भूमिकेविषयी कॉंग्रेसला विश्‍वास वाटत नसल्यानेही शिवसेनेला या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले आहे. केंद्रात विरोधी पक्षात शिवसेना असली तरी अद्याप शिवसेनेला संयुक्‍त पुरागामी आघाडीत घेण्याविषयी आघाडीमध्ये एकमत झालेले नाही.

याबाबत संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना सांगितले, राज्यात हा कायदा जबरदस्तीनं लादला जाणार नाही अशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. या कायद्याबाबत काही त्रुटी आहेत त्या दूर व्हायला पाहिजेत अशी मागणीही त्यांनी करत शिवसेनेची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले. तसेच देशात सर्वत्र या कायद्याला विरोध होत आहे. या कायद्याने हिंदु मुसलमान अशी विभागणी करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला यश आलेले नाही. राज्यात सर्व जाती धर्माचे लोक असतात. जिथे भाजपची राज्य आहेत तिथे सर्वात हिंसक आंदोलने होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख