Sanjay Raut says he is worried because Fadnavis is caretaker cm | Sarkarnama

फडणवीस 'काळजीवाहू' आहेत, त्याचीच आम्हाला काळजी : संजय राऊत 

सरकारनामा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

..

मुंबई  : विधानसभेची मुदत संपली. परंपरेनुसार फडणवीसांनी राजीनामा सादर केला आहे. त्यांना काळजीवाहू म्हणून काम पहावे लागेल. आम्हाला त्याचीच काळजी आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. 

श्री. राऊत म्हणाले, मी आणि शरद पवारांनी सोबत बसूनच देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण पत्रकार परिषद ऐकली आहे. फडणवीस म्हणतात, 50 : 50 टक्के बाबत कमिटमेंट झालेली नव्हती. पण मुख्यमंत्रीपदासह सर्व पदांबाबत 50 : 50 टक्के वाटपाची कमिटमेंट झालेली होती, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. नितीन गडकरी हे त्या चर्चेतच नव्हते. त्यांना याबाबत काही माहिती नाही. 

आपण निकालानंतर पहिल्या दिवशीपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी चर्चा करीत आहात असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले,  भाजपवाले 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या नंतर कोणाकोणाशी चर्चा करीत होते याचा इतिहास तपासून पहावे लागेल. मोदी आणि शहांवर टीका करणाऱ्या पक्षांच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून भाजप बसले आहे, सत्तेतही भागीदार झाले आहे.

श्री. राऊत पुढे म्हणाले, आम्ही गेल्या पंधरा दिवसात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविषयी कोणतेही अपशब्द वापरलेले नाहीत. कोणतीही टीका केलेली नाही. आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. 

आम्ही ठरवले तर सरकार बनवू शकतो आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीही बनवू शकतो, असेही श्री. राऊत म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख