राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न....पण राऊतांनी वेगळेच सांगितले!

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीनही पक्षांच्या सत्तावाटपात कोणाला काय मिळणार, याची उत्सुकता शेवटपर्यंत राहणा असल्याची चिन्हे आहेत.
sanjay raut not ready for ncp cm post
sanjay raut not ready for ncp cm post

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याविषयी आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. ही चर्चा योग्य नसून त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

शिवसेना आणि दोन्ही काॅंग्रेसच्या जागावाटपात मुख्यमंत्रिपद हे अडीच वर्षांसाठी राहणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यात पहिली अडीच वर्षे शिवसेनेकडे आणि नंतरची अडीच वर्षे राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे असणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यात तथ्य नसल्याचे राऊत यांनी आज दिल्लीतील आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची काल बैठक झाली. या बैठकीत काय झालं, त्याबाबत मी बोलणार नाही. त्यांनी काही निर्णय घेतल्याचं मला समजलं. त्यावेळी माझ्याशी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांनी फोनवरुन चर्चा केली, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. मी शरद पवारांना भेटणार आहे, पण सोनिया गांधींना इतक्यात भेटण्याचं प्रयोजन नसल्याचेही राऊतांनी स्पष्ट केले.

मुंबईत तिन्ही पक्षांची म्हणजे महासेनाआघाडीची बैठक होणार आहे. डिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात मजबूत सरकार स्थानापन्न झालेलं दिसेल. एक डिसेंबरच्या आधी मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल, असंही संजय राऊत म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्म एकत्र घेऊन राज्याची स्थापना केली. शिवसेनेला कोणीही धर्मनिरपेक्षात शिकवू नये, असाही दावा त्यांनी केला. न्यायालयात धर्माच्या पुस्तकाऐवजी संविधानावर हात ठेवून शपथ घ्या, असं सांगणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देशातील पहिले नेते, असं सांगत संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेबाबत स्पष्टीकरण केले. 

राज्यातील सत्तास्थापनेबाबत तीनही पक्ष काय चर्चा सुरू आहे, यावर गुपित बाळगून असताना काॅंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अचानाकपणे हे गुपित फोडले. मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म ही शिवसेनेकडे असू शकते, असे सांगून त्यांनी पहिली अनाहूतपणे घोषणा केली. सर्व वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या आधारे मग बातम्या चालविल्या. शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या तीनही पक्षांच्या सरकार स्थापनेबाबत अनेक बैठका सुरू आहेत. सर्व माहिती या सूत्रांच्या आधारे येत आहेत. आघाडीची किंवा सत्तावाटपाची कोणतीही माहिती अधिकृतरित्या सामोरी आलेली नाही. चर्चा कशाच्या मुद्यांवर सुरू आहे, हे अनेक नेते खोदून विचारूनही सांगत नाहीत. सरकार स्थापन होणार की नाही, यावर दोन्ही काॅंग्रेसचे नेते काहीच बोलत नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com