Sanjay Raut Nashik Meeting | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

....तर मंत्री दालनाबाहेर पडू शकणार नाहीत - संजय राऊत

संपत देवगिरे
शनिवार, 10 जून 2017

सामान्यांचा लढा, आंदोलन आणि संघर्ष ही शिवसेनेची ओळख आहे. शिवसैनिक रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याच्याकडे दगड असतोच. ते शिवसेना कार्यकर्त्यांचे 'लायसन्स' आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत असलो तरी सामान्यांसाठी लढतच राहू. त्यात खंड पडणार नाही. - संजय राऊत

दगड हेच शिवसैनिकांचे 'लायसन्स'

नाशिक - 'शेतकरी आंदोलनाबाबत मुख्यमंत्री मखलाशी करीत आहेत. मात्र, सर्व अंगलट आल्याने ते आता चिंताग्रस्त झाले असून त्यांनी राज्यातील आपले दौरे रद्द केले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडावी.' असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे झालेल्या मेळाव्यात केले.

शिव संपर्क मोहिमेंतर्गत आज येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, ''सामान्यांचा लढा, आंदोलन आणि संघर्ष ही शिवसेनेची ओळख आहे. शिवसैनिक रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याच्याकडे दगड असतोच. ते शिवसेना कार्यकर्त्यांचे 'लायसन्स' आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत असलो तरी सामान्यांसाठी लढतच राहू. त्यात खंड पडणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे कुठे पद होते. लढा हेच त्यांचे बळ होते. उध्दव ठाकरेही तेच करीत आहेत. त्यामुळे सत्ता त्यांच्या पायावर लोळण घेते. ही शिवसेनेची ताकद आहे.''

ते पुढे म्हणाले, ''सत्तेत राहून विरोधाची भूमिका का घेता असे भाजप विचारते. त्यांना आमचे सांगण आहे की विरोधी पक्षात असतांना तुम्ही काय बोललात हे विसरु नका. विरोधी पक्षात असताना सरसकट कर्जमाफी ही भूमिका होती. आज पदावर येताच त्यात बदल कसा होऊ शकतो? आता गरजुंची कर्जमाफी म्हणत आहात. गरजु कोण हे तुम्ही कसे ठरवणार?''

''शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री असतांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हंटर घेऊनच असत. 'मी जनतेला ही आश्‍वासने दिली आहेत. त्याची पूर्तता करा.' हा त्यांचा आदेश असे. त्यात कधी बदल झाला नाही. जनतेने भाजपला कशासाठी सत्ता दिली हे विसरु नका. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवता येत नसतील तर भाजपने सत्ता सोडावी. शिवसेना सत्तेत राहून प्रश्‍न सोडवेल,''असेही राऊत म्हणाले.

शेतकरी आत्महत्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षात असतांना काय बोलत होते? असा प्रश्न विचारून राऊत म्हणले, ''प्रत्येक सभेत ते अश्रु ढाळायचे. चार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यामुळे सरकार पापी आहे. हे पापी सरकार उखडून टाका असे ते सांगायचे. त्यांच्या सर्व भाषणांचे व्हिडीओ जनतेने पुन्हा ऐकावे. आता राज्यात काय घडते आहे, तीन वर्षात साडे चार हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकारही पापीच आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख