शिवसेनेची मुलूखमैदानी तोफ : `रोखठोक' राऊत

शिवसेनेची मुलूखमैदानी तोफ : `रोखठोक' राऊत

मुंबई : राज्यातील सत्तापेचात भारतीय जनता पक्षाला जर तोडीस तोड उत्तर कुणी दिले असेल आणि शिवसेनेच्या बाजुने जर खंबीरपणे बाजू मांडली असेल तर ती म्हणजे शिवसेनेचे खासदार आणि "सामना'चे संपादक संजय राऊत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राऊत हेच शिवसेनेच्यावतीने वोलतील असे स्पष्ट केले. त्यातच राऊत यांची ताकद स्पष्ट झाली. 

शिवसेनेच्या आजपर्यतच्या राज्यसभेच्या खासदारांमध्ये इतकी धडाकेबाज कामगिरी आजपर्यंत कुणीही केलेली नाही. दरबारी राजकारणात आणि दिल्लीच्या राजकारणातील विविध खेळ्यांना एकटे संजय राऊत पुरून उरले आहेत. भाजपबरोबरच्या सत्तास्थापनेच्या लढाईत शिवसेनेच्यावतीने एकहाती किल्ला लढवत भाजपमधल्या चाणक्‍यांना नेमकी झुंज देत त्यांनी आपण एकमेवाद्वितीय असल्याचे सिद्ध केले. 

अर्थात संजय राऊत यांचे यश हे आजचे नाही. अनेक प्रश्‍नांवर थेट भूमिका घेत ते आजपर्यंत विविध प्रश्‍नांना भिडले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असतानाही त्यांनी संजय दत्त प्रकरणी थेट बाळासाहेबांपेक्षा "सामना' मधून वेगळी भूमिका मांडली होती. "सामना' म्हणजे शिवसेना आणि संजय राऊत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे चित्र गेल्या अनेक वर्षापासून संजय राऊत यांनी आपल्या कार्यकारी संपादकपदाच्या माध्यमातून उभे केले आहे. 

अगदी तरूणपणात वर्षी "सामना' चे कार्यकारी संपादक झालेल्या संजय राऊत यांची सध्या राज्यसभेतल्या खासदारकीची तिसरी टर्म सुरू आहे. याआधी शिवसेनेकडून विद्याधर गोखले, नारायण आठवले हे संपादक लोकसभेवर खासदार झाले होते. संजय निरुपम, भारतकुमार राऊत आणि प्रीतीश नंदी हे तीन खासदार राज्यसभेवर गेले मात्र राऊत यांच्यासारखी धुव्वांधार बॅटिंग आजतागायत कुणीही करू शकलेले नाही. 

आज भाजपच्या अनेक नेत्यांना संजय राऊत यांच्या बिनतोड टिकेला नेमके उत्तर देता येत नाही आणि त्याचा मुद्देसुद प्रतिवादही करता येत नाही. आपल्या "रोखठोक' सदराप्रमाणे राऊत यांनी गेले चौदा दिवस भाजपबरोबर जे एकहाती आपले वाक्‌युद्ध सुरू ठेवले आहे त्याला तोड नाही. शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदावरच्या दाव्यावर ठाम राहून त्यांनी सतत पक्षाची बाजू तर मांडलीच पणराजकीय नेत्यांशीही संपर्क साधून दरबारी राजकारणात शिवसेनेला सतत अग्रभागी ठेवले. 

आज शिवसेनेच्या आमदारांच्या मनात पक्षाची भूमिका नेमकेपणाने रुजवण्यात व शिवसेनेचा दावा कसा योग्य आहे ते पटवून देण्यात राऊत यांची आक्रमक भाषा आणि त्यांची शैली उद्धव ठाकरे यांना उपयोगी ठरली आहे. भाजप आणि शिवसेनेमधला हा मुख्यमंत्रीपदाचा संघर्ष निर्णयक टप्प्यावर नेण्यात संजय राऊत यांचा वाटा मोठा होता हीच या संघर्षातील " सच्चाई ' आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com