sanjay rathod`s statement raises eye brows in sena | Sarkarnama

फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार : संजय राठोडांच्या वक्तव्याने शिवसेनेला धक्का

अतुल मेहेरे
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री भाजपचा बनणार की शिवसेनेचा यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांत कलगीतुरा रंगलेला असताना सेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. 

नागपूर : आगामी मुख्यमंत्री भाजपचा की शिवसेनेचा, यावरुन दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून दावा करण्याची एकही संधी सोडली जात नाही. अशातच महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा येथील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे मत जाहीरपणे व्यक्त केले.

त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा झडू लागल्या असून विविध प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. कॅबिनेट मंत्रीपदाची आशा बाळगून असलेल्या राठोड यांनी दारव्ह्याच्या स्टेटमेंटमधून सेनेच्या शीर्षस्थ नेत्यांना इशारा तर नाही ना दिला, अशी एक शंका राजकीय विश्‍लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. 

यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यातील शीतयुद्ध लोकसभा निवडणुकीनंतर "शीतयुद्ध' राहिलेलेच नाही. राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद न दिल्यामुळे ते नाराज आहेत. त्यातही गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांना तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मनोहररावांचे चिरंजीव इंद्रनिल यांनी शिवसेना प्रवेशाची घोषणाही केली होती.

त्यामुळे सेनेत आपले खच्चीकरण केले जात असल्याची राठोड यांची भावना झाली असण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजपर्यंतच्या यात्रेत एकाही शिवसेना नेत्याने जाहीर सभा घेतली नाही आणि राठोड यांनी हिरीरीने पुढाकार घेऊन जाहीर सभा आयोजित केली. एवढेच नव्हे तर "देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील', असे वक्तव्यही व्यासपीठावरुन केले. यावेळी विविध विकास कामांसाठी भरपूर निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांची मुक्त कंठाने प्रशंसाही त्यांनी केली.

या कृतीतून श्रेष्ठींना ईशारा देऊन पुढच्या कॅबिनेटची तर तयारी ते करत नसावे, अशी एक शंका व्यक्त होत आहे. तर मुख्यमंत्र्यांशी सलगी साधून राठोड भाजप प्रवेशाची तर तयारी करत नसावे, असे एक ना अनेक प्रश्‍न राठोड यांच्या दारव्हा येथील सभेनंतर उपस्थित केले जात आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी "सरकारनामा'ने संजय राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख