sanjay nirupam opposes allaince with raj thackrey | Sarkarnama

राज ठाकरेंना महाआघाडीत घेण्यास संजय निरुपम यांचा कडवा विरोध

उर्मिला देठे
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

मनसेला सोबत घेतल्यास पक्षाला उत्तर भारतीयांच्या मतांचा जोरदार फटका बसू शकतो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद ते मुंबई असा प्रवास विमानातून एकत्र केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेले काही दिवस राज ठाकरे पवारांच्या माध्यमातून काँग्रेस -राष्ट्रवादी महाआघाडीत येणार असल्याच्या चर्चा आहेत. या दृष्टीकोनातून या विमानप्रवासाकडे पाहिले जात आहे. मात्र काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा त्यांना जोरदार विरोध आहे.

राज ठाकरे गेल्या काही दिवासांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मनसेच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रीत केल्याचे पाहायला मिळाले. आहे. शेवटच्या कार्यकर्त्याशी पक्षाची बांधीलकी जोडली जावी, यासाठी दौऱ्यात राज ठाकरेंचे बदललेले स्वरूप दिसून आले. दौरा आटोपून राज ठाकरेंनी औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने येण्यासाठी विमान प्रवासाचा मार्ग स्वीकारला. मात्र, नेमके याच वेळी शरद पवार देखील त्याच विमानात होते . त्यामुळे हा योगायोग कसा जुळून आला? की जुळवून आणला गेला? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यासोबतच या विमान प्रवासामध्ये शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात नक्की कोणती चर्चा झाली? याविषयीही अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.

निवडणुकांसाठी मनसेला महाआघाडीत सहभागी करून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. तसा प्रस्ताव दोन्ही पक्षांच्या मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत ठेवण्यातही आला होता. मात्र, या प्रस्तावाला काँग्रेसकडून आणि विशेषत: संजय निरुपम यांच्याकडून जोरदार विरोध करण्यात आला. मनसेला सोबत घेतल्यास पक्षाला उत्तर भारतीयांच्या मतांचा जोरदार फटका बसू शकतो, असा दावा संजय निरूपम यांनी केला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख