sanjay kakde shelar | Sarkarnama

संजय काकडे, आशिष शेलार यांना मोठ्या जबाबदारीची शक्‍यता

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबईपासून जवळ असलेल्या उल्हासनगर महापालिकेत मोठा पक्ष म्हणून भाजपला प्रस्थापित करण्यात यश आले आहे. ओमी कलानी यांच्यासोबत युती केल्यामुळे भाजपविरोधात प्रचार करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली होती. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी यांनी भाजपला सर्वाधिक जागा जिंकून देण्यासाठी मेहनत घेतली होती. डोंबिवलीचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर भविष्यात ठाणे जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी मोठी जबाबदारी सोपविण्यात येवू शकते. भाजपच्या सरकारमधली मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीमुळे वाढली आहे. 

मुंबई : मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे पुण्यातील खासदार संजय काकडे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविली जाण्याची शक्‍यता भाजपच्या सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या यशात मोठा वाटा असला तरी, स्थानिक पातळीवर यश मिळवून देण्यासाठी काम करणारे त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी गिरीश महाजन, सुभाष देशमुख, रणजित पाटील, विजय देशमुख, रवींद्र चव्हाण यांची पत वाढली आहे. 
शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेने प्रतिष्ठेची केलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत 227 पैकी 84 पर्बत मजल मारता आली तर भाजपने 82 जागा मिळवून शिवसेनेची बरोबरी साधण्यास यश मिळाले आहे. 

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि खासदार किरीट सोमय्या हे बिन्नीचे शिलेदार म्हणून शिवसेनेला प्रचारात खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होते. 2012 मध्ये भाजपच्या 31 जागा असताना, पाच वर्षांनंतर त्याच महापालिकेत भाजपची संख्या मोठ्या पटीमध्ये वाढल्याने आशिष शेलार यांचे भाजपतील वजनही वाढल्याचे बोलले जाते. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. भाजपतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे हे यश आहे. भाजप हा विचारधारा असलेला पक्ष आहे. त्यामुळे यापुढे पक्ष जी जबाबदारी देईन ती समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली आहे 

मुंबईपासून जवळ असलेल्या उल्हासनगर महापालिकेत मोठा पक्ष म्हणून भाजपला प्रस्थापित करण्यात यश आले आहे. ओमी कलानी यांच्यासोबत युती केल्यामुळे भाजपविरोधात प्रचार करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली होती. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी यांनी भाजपला सर्वाधिक जागा जिंकून देण्यासाठी मेहनत घेतली होती. डोंबिवलीचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर भविष्यात ठाणे जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी मोठी जबाबदारी सोपविण्यात येवू शकते. 

निकालाच्या आदल्या दिवशी पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आली नाही तर राजकारणातून निवृत्त होईन, असे उघडपणे सांगणाऱ्या भाजपचे खासदार संजय काकडे यांना भाजपमध्ये पुढे सुगीचे दिवस असल्याची चर्चा आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रस्थापित राष्ट्रवादीला धक्का देण्याचे काम करणाऱ्या भाजप आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि आझम पानसरे या त्रिकुटाचे नाव भाजपच्या वर्तुळातही चर्चिले जात आहे. नाशिक महापालिकेत कोणत्याही स्थानिक नेत्यांचा करिष्मा नसताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेवून विकास करणार हे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाशिक महापालिकेची जबाबदारी असली तरीही मुख्यमंत्र्यांचा प्रभाव मतदारांवर राहिल्याचे बोलले जाते. 
पक्षाने एखाद्या व्यक्तीकडे जबाबदारी दिली असली तरी, पक्षाला यश मिळण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळाले, या निकषावर नेत्याचे वजन वाढले असे म्हणणे उचित ठरत नाही. मुंबई महापालिकेत भाजपला चांगले यश मिळाले याचा नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यांना अभिमान वाटत असतो, असे मत नाशिक महापालिकेतील भाजपचे शहर अध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी व्यक्त केले. 

अमरावती महापालिकेत गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि डॉ. सुनील देशमुख याची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली असून, अकोला महापालिकेत भाजपला यश मिळवून देण्यास राज्यमंत्री रणजित पाटील आणि आमदार चैनरुप संचेती यांनी खूप मेहनत घेतल्याचे समजते. तर , सोलापूर महापालिकेत मिळालेल्या यशामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री विजय देशमुख यांचे वजन वाढले आहे. 
भाजपला जनतेची साथ - सहस्रबुद्धे 
महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्या त्या स्थानिक नागरी सुविधा आणि प्रश्‍न सोडविण्यासाठी भर दिला होता. महापालिकेमध्ये संघटनात्मक जबाबदारी म्हणून एक ते दोन नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. सांडपाण्याच्या प्रश्‍नासह अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी चांगला गुणात्मक विकास घडवून आणण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द दिला होता. तसेच मेट्रोसारख्या विविध विकास प्रकल्पाची कामे सुरू असून, दर्जात्मक सुधारणा करण्याबाबत भाजपने दिलेल्या विश्‍वासाला जनतेने साथ दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केलेले कामही कौतुकास्पद आहे असे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख