Sanjay Derkar May Face Problems to Get Ticket in Vani Constituency | Sarkarnama

वणीमध्ये संजय देरकरांना 'सतरा' चा खतरा ? 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 जुलै 2019

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ भाजपमुक्त करण्याचा विडा खासदार बाळू धानोरकर यांनी उचलला. चंद्रपूरनजिकच्या वणी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून 17 जण इच्छुक आहेत. संजय देरकर यांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात धानोरकर आहेत. देरकरांनीही त्यांच्यासमवेत दिल्ली, मुंबईच्या वाऱ्या केल्या. इच्छुक 17 जणांमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार वामनराव कासावारसुद्धा आहेत आणि देरकरांच्या उमेदवारीला विरोध म्हणुनच 17 जणांची उमेदवारी दाखल करण्यात आली.

नागपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ भाजपमुक्त करण्याचा विडा खासदार बाळू धानोरकर यांनी उचलला. चंद्रपूरनजिकच्या वणी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून 17 जण इच्छुक आहेत. संजय देरकर यांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात धानोरकर आहेत. देरकरांनीही त्यांच्यासमवेत दिल्ली, मुंबईच्या वाऱ्या केल्या. इच्छुक 17 जणांमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार वामनराव कासावारसुद्धा आहेत आणि देरकरांच्या उमेदवारीला विरोध म्हणुनच 17 जणांची उमेदवारी दाखल करण्यात आली. अशा परीस्थितीत देरकरांना या 'सतरा'चा खतरा होणार असल्याची चर्चा सुरु झाली. पण उमेदवारीचा तिढा अधिकच वाढल्यास पक्षश्रेष्ठींकडून ऐन वेळेवर अनपेक्षीतपणे एखादा नवीन चेहरा समोर केला जाण्याची शक्‍यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. 

वामनराव कासावार विधानसभा निवडणुकांच्या आखाड्यात अनुभवी मानले जातात. चार वेळा ते आमदार राहीले आहेत. सहकार क्षेत्रावरही त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे उमेदवार निवडीच्या प्रक्रीयेत त्यांच्या मताला महत्व राहणार आहे. पण कासावार आणि टीमसोबत खासदार धानोरकरांचे ट्युनिंग नसल्याचे बघावयास मिळते. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते देविदास काळे यांनी इंटकचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या दिवशी खासदार धानोरकर वणीत आले, पण या कार्यक्रमाला पाठ दाखवित त्यांनी थेट देरकरांच्या उपोषण कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 

त्यामुळे 'टीम 17' चा विरोध अधिकच वाढल्याचे सांगण्यात येते. देरकरांनी कॉंग्रेसमध्ये यावे, पण विधानसभेचे उमेदवार म्हणून नव्हे तर कार्यकर्त्याप्रमाणे प्रवेश घ्यावा, असे कासावारांनी यापूर्वीच सांगितले होते. पण देरकरांनी तसे केले नाही आणि विधानसभेची निवडणूक आर-पारची लढाई केली असल्याचे दिसते. उमेदवारीसाठी थेट श्रेष्ठींकडे मागणी केली आहे आणि खासदार धानोरकर त्यांच्यासाठी जोर लावून आहेत. जिल्हा परीषद सर्कलनिहाय बैठकांचा धडाकाही त्यांनी सुरु केल्याची माहीती आहे. उमेदवारी मिळाल्यावर 'टीम 17'चा विरोध कमी होईल, असे त्यांना वाटते. पण राजकीय विश्‍लेषकांचे मत मात्र वेगळेच आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणे निश्‍चित मानले जात असले तरी या आघाडीत इतर कोणते मित्रपक्ष सहभागी होतील, यावरही उमेदवाराची निवड अवलंबून राहणार आहे. 

गेल्या 57 वर्षात विधानसभेच्या 12 निवडणुका झाल्या. आठ वेळा कॉंग्रेस, एक वेळ अपक्ष, एक कम्युनिस्ट, एक शिवसेना आणि एक वेळा भाजपचा उमेदवार निवडून आला. कॉंग्रेसवगळता एकाही पक्षाचा उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही. त्यामुळे यावेळी याच इतिहासाची पुनरावृत्ती होईल का, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख