sanjay bhadarge and his vidio | Sarkarnama

"घुंगरू पैजणाचं, पायात वाजतं ', परभणीच्या डुप्लिकेट संजय राऊत यांच्या व्हिडिओचा धुमाकूळ

गणेश पांडे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

......

परभणी : शिवसेनेचे फायर ब्रॅन्ड नेते खासदार संजय राऊत यांच्यांशी साधर्म्य असलेले परभणीचे लक्ष्मण भदरगे (डुप्लिकेट संजय राऊत) यांचा "घुंगरू पैंजणांच, पायात वाजतं', हे गीत आणि त्यावर त्यांनी केलेला भन्नाट डान्स सध्या राज्यभरात गाजतोय. राज्यातील सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे नाव सध्या देशभरात चर्चिले जात आहे. अशावेळी परभणीचे पोलीस कर्मचारी लक्ष्मण भदरगे यांचा हा व्हिडिओ चांगलाच भाव खात आहे. संजय राऊत यांच्यासारखीच देहबोली, केसांची रचना, डोळ्यावरचा चष्मा पाहून हा व्हिडिओ पाहणारे देखील चकित होत आहेत. 

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आपल्या आक्रमक स्वभाव आणि रोखठोक लिखाणशैलीसाठी प्रसिध्द आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर खासदार संजय राऊत खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आले. दररोजच्या पत्रकार परिषदा, राजकीय प्रतिक्रिया, पक्षाची भूमिका ठामपणे मांडणारे राऊत देशभरात चर्चेचा विषय ठरले. देशात संजय राऊत यांची प्रचंड क्रेज निर्माण झालेली असतांनाच त्यांच्या सारखेच दिसणारे परभणीतील पोलीस कर्मचारी लक्ष्मण भदरगे यांनीही अनेकांचे लक्ष आपल्याकडे केंद्रीत केले. आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या लग्नात डीजेवर ठेका धरलेल्या भदरगे यांचा व्हिडिओ परभणीतून सोशल मिडियावर व्हायरल झाला. राज्यात ठाकरे सरकार सत्तेवर येत असतांना समोर आलेल्या व्हिडिओने लोकांना संजय राऊत यांची आठवण झाली. 

सत्ता स्थापनेत संजय राऊत यांचे योगदान पाहता हा व्हिडिओ "शिवसेनाचा मुख्यमंत्री बसवलाच' अशा टॅगलाईनने परभणीतून जो सुसाट निघाला, तो अगदी काही दिवसांतच राज्यभरात पसरला. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला की अल्पावधीत त्याला लाखो लाईक मिळाल्या. अवघ्या चोवीस सेंकदाच्या या व्हिडिओने सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. पोलीस कर्मचाली असलेल्या लक्ष्मण भदरगे यांना देखील या व्हिडिओने चांगली प्रसिध्दी मिळाली. सेलू शहरातील एका लग्न समारंभात त्यांनी केलेल्या या नृत्याने त्यांना दुसरे संजय राऊत करून टाकले. लक्ष्मण भदरगे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलिस चौकीत ड्युटीवर आहेत. सोशल मिडियावरील व्हिडिओमुळे येथे येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, सर्वसामान्य तरुण, लहान मुले त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत आहेत. 

मी त्यांची बरोबरी करू शकत नाही - लक्ष्मण भदरगे 
खासदार संजय राऊत हे खूप मोठे नेते आहेत, त्यांची मी बरोबरी करू शकत नाही. केवळ योगायोगाने या व्हिडिओ मध्ये त्यांचा व माझ्या चेहऱ्यात साम्य दिसते असे लोक म्हणतात. एवढ्या मोठ्या नेत्यासोबत माझे नाव जोडले जात आहे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे लक्ष्मण भदरगे सांगतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख