अनिल राठोडांच्या गडासमोरच संग्राम जगतापांनी भगवा उंचावला...ढोल वाजविला

अनिल राठोडांच्या गडासमोरच संग्राम जगतापांनी भगवा उंचावला...ढोल वाजविला

नगर ः विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या चितळे रोडवरील कार्यालयाजवळ गणेश विसर्जन मिरवणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी भगवा पंचा गळ्यात टाकून भगवा झेंडा उडविला. त्यानिमित्ताने आमदार जगताप लवकरच शिवसेनेत जाणार, अशा शक्यतेचे संकेत आज गणरायाच्या साक्षीने लोकांना मिळाले.

आमदार जगताप शिवसेनेत गेल्यास ते विधानसभेची उमेदवारी घेतील. अर्थातच राठोड यांना उमेदवारी मिळू शकणार नाही, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राठोड यांच्या गोटात अस्वस्थता आहे.

जगताप यांनी शिवसेनेत येऊच नये, यासाठी राठोड यांचा गट देव पाण्यात ठेवून आहे. असे असताना आज गणेश विसर्जन मिरवणूक चितळे रोड येथे आली असता आमदार जगताप यांनी तेथे उपस्थित राहून हाती ढोल वाजविला. तसेच गळ्यात भगवे उपरणे टाकून भगवा झेंडा नाचविला. चितळे रोडवर राठोड यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाजवळच हा घडलेला प्रसंग कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून साजरा केला.

भाजप-शिवसेनेच्या युतीमध्ये नगरची जागा शिवसेनेला असते. तथापि, ती भाजपला मिळावी, यासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी वरिष्ठ पातळीवर जोरदार मागणी केली आहे. उद्या मुख्यमंत्री नगरला आल्यानंतर याबाबतचे निवेदन पुन्हा देण्यात येणार आहे. ही जागा लढविण्यास गांधी उत्सुक असून, ती भाजपला मिळाल्यास ते दावेदार होतील.

अर्थात जागा बदलल्यास विधानसभेतून राठोड यांचा पत्ता कट होण्याचा धोका आहे. हे मोठे संकट घोंगावत असताना ही जागा शिवसेनेलाच राहिल्यास राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ते पक्ष बदलतील म्हणजेच उमेदवारी घेऊनच शिवसेनेत प्रवेश करतील. त्यामुळे शिवसेनेला जागा राहिली तरी अडचण होणार आहे. त्यामुळे राठोड यांच्यापुढे दुहेरी संकट उभे राहिले आहे. असे वातावरण असताना जगताप यांनी राठोड यांच्याच कार्यालयाजवळ भगवा नाचविल्याने आणि भगवा पंचा गळ्यात घालून मिरवणुकीत सहभाग घेतल्याने जानकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com