राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची विदर्भाची धुरा संग्राम गावंडेंवर !

संग्राम यांनी सुद्धा युवासंघटन अधिक मजबूत करीत जिल्ह्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुलाबराव राष्ट्रवादीत गेल्यावर संग्राम गावंडे यांनी युवासेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. त्यानंतर त्यांच्याकडे पक्षाकडून कोणती महत्वपूर्ण जबाबदारी दिली जाते, याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची विदर्भाची धुरा संग्राम गावंडेंवर !

अकोला : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भाचा गड सर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. विदर्भात पक्षाचे युवा संघटन अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या विदर्भ समन्वयक पदाची जबाबदारी संग्राम गुलाबराव गावंडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 
लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही या घाडमोडीमध्ये मागे नसून नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याची रणनीती पक्ष नेतृत्वाकडून करण्यात येत आहे. विदर्भात शिवसेनेचे "ढाण्या वाघ' समजले जाणारे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी महापालिका निवडणुकीआधी सेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. 

पश्‍चिम विदर्भात शिवसेना रुजविण्यात गुलाबरावांचा सिंहाचा वाटा असून त्यांची वकृत्व शैली आणि मराठी बाण्यामुळे युवावर्गात ते लोकप्रिय ठरले आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संग्राम यांनी सुद्धा युवासंघटन अधिक मजबूत करीत जिल्ह्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुलाबराव राष्ट्रवादीत गेल्यावर संग्राम गावंडे यांनी युवासेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. त्यानंतर त्यांच्याकडे पक्षाकडून कोणती महत्वपूर्ण जबाबदारी दिली जाते, याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. 

पक्षाने त्यांच्यातील युवा संघटनाचे कौशल्य हेरत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या विदर्भ समन्वयक पदाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, डॉक्‍टर सेलचे प्रमुख डॉ. नरेंद्र काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 

या यादीत राज्यातील पदाधिकाऱ्यांचा समावेश असून विदर्भातून केवळ तीनच युवकांना स्थान देण्यात आले आहे. त्यामध्ये अकोल्यातून संग्राम गावंडे, वाशिमचे अनंत काळे आणि अमरावतीचे रूपेश मेश्राम यांचा समावेश आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादीने विदर्भातील युवाशक्तीला प्राधान्य देत पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिल्याने राष्ट्रवादीत युवाशक्तीची ताकद वाढणार असल्याची चर्चा इथल्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com