सांगली झेडपी सत्ताकारणात रंगत; भाजप सदस्य व्हीप घेऊन सहलीला

जिल्हा परिषदेतील सत्ताकारणात आता रंगत आली असून, भाजपने आपल्या सदस्यांना आज सहलीला रवाना केले आहे. मात्र त्याआधी व्हीप बजावण्याची प्रक्रियाही त्यांनी पूर्ण करून कोठेही फोडाफोडी होऊ नये याची काळजी घेतली आहे.
सांगली झेडपी सत्ताकारणात रंगत; भाजप सदस्य व्हीप घेऊन सहलीला

सांगली  ः जिल्हा परिषदेतील सत्ताकारणात आता रंगत आली असून, भाजपने आपल्या सदस्यांना आज सहलीला रवाना केले आहे. मात्र त्याआधी व्हीप बजावण्याची प्रक्रियाही त्यांनी पूर्ण करून कोठेही फोडाफोडी होऊ नये याची काळजी घेतली आहे.

दरम्यान, राज्यात ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्ष गुंतले असल्याने इकडे मिनी मंत्रालयाकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ राहिलेला दिसत नाही. अर्थमंत्री जयंत पाटील ऍक्‍शन मोडमध्ये येण्याआधीच भाजपने आपले सदस्य सहलीला पाठवले आहेत. भाजप, भाजप पुरस्कृत, महाडिक समर्थकांचा सहलीत समावेश असून अजितराव घोरपडे समर्थकांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेच्या आमदार बाबर समर्थकांनी मात्र या चर्चेत आणि सहलीत सहभाग घेतलेला नाही.

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीकडून सत्तापालट करण्यासाठी अद्याप कोणत्याही ठोस हालचाली झालेल्या नाहीत. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जि. प. गटनेते शरद लाड, संजीवकुमार पाटील, कॉंग्रेसचे जितेंद्र पाटील आदींनी जिल्हा परिषदेत ठाण मांडले होते. मात्र वरिष्ठ पातळीवर जयंत पाटील कधी पुढाकार घेणार, याची प्रतीक्षा कायम आहे. त्यांनी बैठक करूया, असे अनिल बाबर यांना सांगितले आहे, मात्र ती कधी, याचा उलगडा झालेला नाही.

या घडामोडी सुरू असताना भाजपने मात्र एक पाऊल पुढे टाकत सदस्यांनी सांगलीतून कोल्हापूरला रवाना केले. तेथे चंद्रकांत पाटील यांच्याशी हितगुज होईल. ते कानमंत्र देतील आणि मग पुढे सहलीचे ठिकाण निश्‍चित होईल, असे सांगण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप देण्याचा सोहळा तोंडावर असल्याने पुरुष सदस्यांनी गोव्याला पसंती दिली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

जगताप सक्रिय झाले...
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी आमदार विलासराव जगताप पुन्हा एकदा जुळवाजुळवीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. ते आज भाजप सदस्यांना सहलीसाठी रवाना करायला स्वतः सांगलीत आले होते. त्यांनी साऱ्यांना कानमंत्र दिला. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या दोन सदस्यांना आपल्या गटात खेचण्याची धुराही त्यांनीच सांभाळल्याचे सांगण्यात आले.

रावते यांचा दौरा रद्द
शिवसेनेचे संपर्क नेते, मंत्री दिवाकर रावते उद्या (ता. 28) सांगली जिल्हा दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्यात जयंत पाटील, श्री. रावते, आमदार अनिल बाबर, आमदार विश्‍वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमन पाटील यांची चर्चा होईल, असे सांगितले जात होते. परंतु, मंत्रिमंडळ विस्ताराची गडबड सुरू असल्याने नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे, असे श्री. रावते यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com