विशाल  पाटील- विश्‍वजित कदम संजयकाकांचे आव्हान कसे पेलणार?

खासदार संजय पाटील यांनाही यानिमित्ताने नव्या पिढीचे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्षलागले आहे.
विशाल  पाटील- विश्‍वजित कदम संजयकाकांचे आव्हान कसे पेलणार?

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंग भरु लागला आहे.  सोमवारनंतर तर प्रचाराचा धुरळा आणखी जोरात उडणार आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर ही निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरत आहे. आर. आर. पाटील,  मदन पाटील आणि पतंगराव कदम यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक विशाल पाटील आणि विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारी आहे.  

पाच वर्षांपुर्वीच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सांगली मतदार संघाचा निकाल आश्‍चर्यकारक लागला. इतिहासात प्रथमच कॉंग्रेसला ही जागा गमवावी  लागली. त्यानंतर नियतीनेही जिल्ह्याला धक्के दिले. विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभरातच आर. आर. पाटील आणि मदन पाटील हे दोन मोठे नेते स्वर्गवासी झाले. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना हा मोठा धक्का होता. त्यानंतर तीनच वर्षांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम आणि काही महिन्यांपुर्वीच शिवाजीराव देशमुख यांचेही निधन झाले आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. अचानक नेतृत्वाच्या जाण्याने युवापिढीवर जबाबदारी येवून पडली आहे. 

वसंतदादा, राजारामबापू यांच्या काळातील या कार्यकर्त्यांची आणि नंतर  जिल्ह्याचे नेतृत्व समर्थपणे सांभाळलेल्या या नेत्यांची झालेली 'एक्‍झिट'  कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्का देणारी होती. अनेक  निवडणुकीत या तिघांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीची जिल्ह्यात सत्ता राखत  राज्यातही सांगलीचा दबदबा ठेवला होता. त्यामुळेच त्यांची पोकळी आज आघाडीच्या कार्यकर्त्यांना निश्‍चित जाणवत असणार. त्यांच्या गैरहजेरीत होणारी ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत कॉंग्रेस  आघाडीचे उमेदवार आणि वसंतदादांचे नातू विशाल पाटील तसेच पतंगराव कदम यांचे पुत्र आमदार विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.  

पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्‍वजित कदम हे  बिनविरोध आमदार झाले. त्यामुळे त्यांच्याही प्रत्यक्ष नेतृत्वाचा कस  लागला नव्हता. शिवाय विशाल पाटील यांनीही प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात  प्रथमच उडी घेतली आहे. हे दोघेही संजय पाटील यांचे आव्हान कसे स्वीकारतात याची उत्सुकता आहे. 
आर. आर. पाटील यांच्यासारख्या कसदार नेतृत्वाला दोन वेळा विधानसभा निवडणुकीत घाम फोडल्याने संजय पाटील यांची राज्यभरात ओळख बनली होती.  त्यावर कॉंग्रेसचा लोकसभेचा बालेकिल्ला प्रथमच भाजपला मिळवून देणारे  उमेदवार म्हणूनही त्यांची राज्याला ओळख झाली. मात्र आता त्यांच्या समोरही या दोन युवा नेत्यांचे आव्हान असणार आहे.

विश्‍वजित कदम हे बिनविरोध आमदार झाल्याने त्यांनाही आपल्या कडेगाव-पलूस  मतदार संघातील आपल्या ताकदीचा अंदाज तेव्हा आला नव्हता. मात्र आता विशाल पाटील यांचा प्रचार करताना त्यांना आपल्या ताकदीचाही अंदाज येणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात पतंगराव कदम यांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच  प्रत्यक्ष निवडणूक असल्याने देशमुख-कदम घराण्यात कोण वरचढ आहे ते स्पष्ट होईल. यानिमित्ताने विश्‍वजित यांनाही आपल्या नेतृत्वाचा अंदाज येईल.

आर. आर. पाटील यांचा पाठिंबा नेहमीच दादा घराण्याला राहिला होता. तर मदन  पाटील हे या घराण्याची ताकद होते. या दोघांच्या पश्‍चातही ही पहिलीच  निवडणूक आहे. त्यामुळे माजी मंत्री प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांना  घराण्याची ताकद अबाधित असल्याचे दाखवून द्यावे लागेल. त्याचबरोबर या घराण्याचे नवे नेतृत्व नव्या मतदारांनी किती स्वीकारले आहे तेही या निवडणुकीतून दिसून येईल. विशाल पाटील आणि विश्‍वजित कदम या दोन वारसदारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याबरोबरच संजय पाटील गेल्या निवडणुकीतील आपली ताकद  अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणेही औत्सुक्‍याचे आहे. शिवाय भाजपपासून दूर गेलेले युवा नेते गोपीचंद पडळकर यांनीही निवडणुकीचे रान  आपल्या आक्रमक वक्तृत्वाने तापवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही निवडणूक अनेक बाजूंनी लक्षवेधी ठरत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com