पतंगराव आणि आर . आर . आबा नसल्याचं मोल चुकवावंच लागणार !

वसंतदादा पाटील यांच्यानंतर सांगली जिल्ह्याच्या राजकारणाला सन्मान आणि उंचीवर नेणाऱ्या आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम या दोन दिग्गज नेत्यांचे तीन वर्षांच्या अंतराने निधन झाले. राज्यात सत्तापरिवर्तनानंतर मंत्रीमंडळात सांगली जिल्ह्याचा म्हणून आवाजच नाही आणि भविष्यात तो दिसेल, अशी भाबडी आशा करावी, अशी स्थितीही नाही. केवळ जिल्ह्यालाच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्राला, त्यातील दुष्काळी टापूला आबा, पतंगराव नसल्याची किंमत चुकवावी लागेल.
Patangrao-Kadam-RR-patil
Patangrao-Kadam-RR-patil

डॉ. पतंगराव कदम यांच्या कवठेएकंद (ता. तासगाव) येथील एका भाषणाची व्हिडिओ क्‍लीप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यात पतंगरावांनी सांगितलेली एक गोष्ट या विषयाला अनुसरून महत्वाची वाटते, ती म्हणजे, पतंगरावांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट विचारलेला प्रश्‍न...."तुमचं पश्‍चिम महाराष्ट्राशी काय वावडं आहे?''

पतंगरावांनी केवळ विरोधक म्हणून त्यांचे कान टोचले नव्हते... ते वडीलकीच्या हक्काने बोलले होते. अनुभवाच्या जोरावर रेटून नेण्याची त्यांच्यात धमक होती आणि त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर आयुष्यभर 'गहू पेरले' असल्यानं त्यांना तो अधिकारही होता. अशी अधिकारवाणी सांगलीच्या राजकारणात या घडीला कुणाकडेच नाही, हे वास्तव आहे. 

राजकारण प्रवाही असतं... या प्रवाहात सत्ता येणार, जाणार, मुकुटाखालचे शीर बदलणार, खुर्च्यांची आदला बदल होणार, हे नैसर्गिक आहे. पण, या खळाळत्या प्रवाहात राहून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणं, त्या बळावर स्वतःचा सभोवताल बदलून टाकणं, ही किमया फार कमी लोकांना जमते. आबा आणि पतंगरावांचा समावेश अशा मोजक्‍या राजकीय किमयागारांमध्ये केला जातो.

राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. शिवसेनेसोबतचा लुटुपुटूच्या भांडणाचा संसार उर्वरीत एक-दीड वर्षे पूर्ण चालला तर 2019 च्या अखेरच्या टप्प्यात विधानसभेची निवडणूक लागेल, तेंव्हा सत्ता कायम राहिल किंवा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची आली तरी या दोन लोकांची उणीव सतत राहील. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत असताना किंवा विरोधात असतानाही आबा, पतंगराव हे राज्याची आणि या जिल्ह्याची गरज होते. 

सध्याच्या भाजप सरकारच्या काळात आबांना फार काळ विधानसभेत जाता आले नाही. निवडणुकीनंतर लगेच ते रुग्णालयात दाखल झाले आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला, मात्र सन 1995 च्या युती सरकारला आबांनी एकहाती हैराण केले होते. गेल्या साडेतीन वर्षांत अनेकदा आबांची त्या कारणासाठी आठवण काढली गेली. ती पोकळी भरून निघाली नाही, हेच खरे. राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून जयंतरावांनी बाजू सांभाळलीय, मात्र आबांच्या तलवारीची धार वेगळी होती. जयंतरावांचा राजकीय चाणाक्षपणा, मंत्री म्हणून योगदान जबरदस्त आहे, मात्र विरोधी बाकावर बसल्यानंतर त्यांच्याभोवती मर्यादांचे एक वर्तुळ आखलेले दिसते. 

त्यांच्या सोबतीला अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या तोफा धडाडत असतात, मात्र आबा नावाचं बारूद काही वेगळंच होतं, याची सतत जाणीव होत राहते. ती जितकी राज्याच्या राजकारणात होते, तितकीच किंबहुना अधिक जिल्ह्याच्या राजकारणात होत राहते. भाजपला चार आमदार, एक खासदार देणाऱ्या या जिल्ह्याला गेल्या तीन वर्षांत काय मिळालं, याचा विचार करताना त्याचा हिशेब मागणार कोण, हा प्रश्‍न पडत राहतो. सिंचन योजनांचा गुंता सुटता सुटत नाही तेंव्हा दुष्काळी भागाला आबा आठवत राहतात. कोथळे प्रकरणात कायदा-सुव्यवस्थेचा खून होतो त्यावेळी आबांची याद येतेच येते... जिल्ह्यात अस्तित्वासाठी राष्ट्रवादीला झगडावे लागते तेंव्हाही आबा नसल्याची खंत व्यक्त होते. आता निवडणुकीचे पडघम वाजत असताना आबांचा आवाज सहा गल्ल्यांच्या सांगलीत घुमणार नाही, हेही जाणवत राहते. 

आबांची ही पोकळी जाणवत असतानाच नियतीने नवा आघात केला. पतंगराव कदम यांच्या निधनाने जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. आबा आणि पतंगराव यांची राजकीय वाटचाल एकमेकांपेक्षा अतिशय वेगळ्या धाटणीची राहिली. संस्थात्मक पातळीवरील पतंगरावांचे कार्य अव्दितीय. हजारो लोकांच्या हाताला काम देणारा हा नेता शिक्षण क्षेत्रात दीपस्तंभासारखा तेजस्वी राहिला.

राजकीय संघर्ष अटळ आहेच, मात्र त्याला पुरून उरायचे असेल तर विकासाचे डोंगर उभे करावे लागतील, हे साधे सरळ गणित घेऊन त्यांची वाटचाल केली. भारती विद्यापीठाचा विस्तार असेल, सोनहिरा खोऱ्यात साखर, सूत व अन्य उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती असेल किंवा टेंभू, ताकारी सिंचन योजनांसाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करून योजनांना गती देणे असेल, पतंगरावांना हात धरणारे कुणी नाही. 

एकाच वर्षात मतदार संघात महापूर आणि दुष्काळाच्या सवलती नेण्याची किमया त्यांनी करून दाखवली होती, हे लोकांच्या प्रेमापोटी. राज्याच्या मंत्रीमंडळात पतंगरावांनी निर्णय घेतला की तो मागे घ्यायचे धाडस मुख्यमंत्रदेखील करत नव्हते. मदत व पुनवर्सन मंत्री म्हणून त्यांनी दुष्काळात घेतलेले निर्णय हजारो लोकांच्या जगण्याला बळ देणारे होते. अशा कित्येक गोष्टी अनेकदा लिहल्या आणि बोलल्या गेल्या आहेत. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या कॉंग्रेसला अवकळा आली आहे. 

दोनएक वर्षांपूर्वी माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर कॉंग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यातून सावरण्यासाठी पतंगराव कदम हे मोठे आशास्थान होते. जिल्ह्यात गलितगात्र झालेल्या कॉंग्रेसमध्ये ऊर्जा फुंकण्याचे काम त्यांनी सुरु केले होते. सांगलीत मदनभाऊंच्या घराशी सोयरीक झाल्याने इथला मार्ग सुकर झाला होता, जतमध्ये विक्रम सावंत यांच्या रुपाने त्यांनी अस्तित्वाची ठिणगी टाकली होती. विट्यातून भाजपचा रस्ता धरू पाहणाऱ्या सदाशिवराव पाटील यांना रोखून धरले होते.

मिरजेत प्रा. सिद्धार्थ जाधव यांच्या रुपाने त्यांनी अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न ठेवला होता. इस्लामपूरात बाय देण्यापेक्षा कॉंग्रेस लढलं पाहिजे, अशा विचाराने ते जितेंद्र पाटलांसारखा उमेदवार देत होते. पतंगराव हे कॉंग्रेसचे खजिनदार होते. राज्यभरातील उमेदवार त्यांच्याकडून निवडणुकीचा निधी न्यायला सांगलीत येत होते. एकेकाळी वसंतदादा राज्यातील कॉंग्रेसचे उमेदवार सांगलीत बसून ठरवायचे, पतंगराव उमेदवारांच्या हाताला बळ देत होते. 

हे दोन बडे नेते असतानाही जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही, अशी खंत व्यक्त होते, मात्र जो काही विकासरथ थाबताना दिसतोय त्याची दोन चाकं म्हणून या दोन नेत्यांचा उल्लेख करावाच लागेल. खरी अडचण आहे ती आता पुढे काय?

जयंत पाटील यांच्याकडून  शरद पवार  साहेब आणि पक्षाला  मोठ्या अपेक्षा आहेत . त्यामुळेच जयंतरावांवर   निश्‍चितपणे फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. पक्षीय भेदभाव, सीमारेषा बाजूला ठेवून विचार करताना सांगली जिल्ह्याला नव्या दिशेने नेण्याची वेळ मागे पडली आहे. आपली रेल्वे थोडी उशीरा धावतेय, तिने योग्य वेग, वेळ आणि ट्रॅक पकडायला असेल तर आता संघर्ष अटळ आहे. अशावेळी आबा आणि पतंगरावांचं नसणं अडचणीचं आणि परीक्षा पाहणारं असेल. त्यांच्या नसण्याचं मोल जिल्ह्याला द्यावं लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com