sangli politics analysis
sangli politics analysis

सांगलीत राष्ट्रवादीला पुन्हा सुगीचे दिवस

सत्ता म्हणजे उगवत्या सूर्याला सलाम... भाजपचे भरभराटीचे दिवस सध्या तरी संपलेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये सर्वांत मोठी मेघा भरती सांगली जिल्ह्यातूनच झाली आणि तिचे लोण अन्यत्र पसरले. पण राज्याच्या राजकारणातील सत्तेच्या नव्या त्रिकोणामुळे सांगली जिल्ह्यात आता राष्ट्रवादीला पुन्हा सुगीचे दिवस येऊ लागले आहेत, पण सत्तेत असूनही कॉंग्रेसचे ग्रह मात्र वक्रीच दिसत आहेत. त्यांच्याकडे अजूनही वजाबाकी सुरू आहे. एकूणच सांगली जिल्ह्याचे राजकारण पुन्हा कात टाकताना दिसते आहे. निमित्त आहे ते विट्याच्या पाटलांनंतर आता सांगलीचे पाटीलदेखील 'राष्ट्रवादी पुन्हा...' असे म्हणू लागले आहेत.

राज्यातील नव्या सत्ताकेंद्राचे जादूगार राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्याने राष्ट्रवादीला पुन्हा नवा बहर येत असल्याचे संकेत आहेत. त्यांच्या या दौऱ्याचे निमित्त होते कॉंग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे, पण यामध्ये सर्वाधिक फुटेज खाल्ले ते राष्ट्रवादीनेच ! कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दिग्गज नेतेही या सोहळ्यास होतेच, पण या कार्यक्रमात शरद पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीत सांगलीत कॉंग्रेस एकदम काठावर हारली. ते एकजूट नसल्यानेच, या मर्मावर बोट ठेवले आणि वसंतदादा घराण्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यामुळे व्यासपीठावर सन्नाटा पसरला. पण या कार्यक्रमानंतर सांगलीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काहींनी हात राखून काम केले काय, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. 

याबाबत नंतर पत्रकारांनी थोरातांना छेडले असता त्यांनी 'मी पाहुणा मला काय विचारताय असलं' असं सांगून हात झटकले आहेत. थोरात हे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, हे विसरलेले दिसतात. सांगलीच्या अंतर्गत गटबाजीवर बोलणे थोरातांनी टाळले, पण कोंबडे झाकले तरी उगावायचे थांबत नाही ! या कार्यक्रमानंतर अर्ध्या तासातच कॉंग्रेसचे एकेकाळचे आमदार सदाशिवराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सदाशिवरावांकडे राज्यात ज्यांची सत्ता त्यांची सोबत करण्याची कला आहे. पण कॉंग्रेस सत्तेत असताना त्यांना राष्ट्रवादी जवळची का वाटली याचा विचारही पक्षनेतृत्वाने करायला हवा. खानापूरचे राजकारण असो की, सांगलीचे कॉंग्रेस. त्या-त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांना आधार देण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी फार सजग असल्याचे दिसत नाही. सदाशिवराव कॉंग्रेसवर नाराज होते. ते मध्यंतरी भाजपकडेही निघाले होते, पण या सगळ्या प्रक्रियेत पक्षातील वरिष्ठांनी कधीच त्यांच्या नाराजीची दखल घेतली नाही. शेवटी जयंतरावांनी दोघांच्या गरजा ओळखून सदाशिवरावांना आपल्याकडे घेत बाबर व राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या जाण्यामुळे खानापूर-आटपाडीतील शून्य झालेली राष्ट्रवादी स्पेस भरून काढली. तेथे पक्षात जिवंतपणा आणला. आता जयंतरावांचा पुढचा कार्यक्रम सांगली आणि मग पाठोपाठ कवठेमहांकाळ-मिरज वगैरे असू शकतो. 

सांगली महापालिका क्षेत्रात दिवंगत नेते मदन पाटील यांचाच वट होता. ते असेपर्यंत राष्ट्रवादी येथे काही करू शकली नाही. जयंत पाटील यांनी भाजप आणि काही पक्षांना सोबत घेऊन महाआघाडीचा प्रयोग करून मदन पाटील यांना सत्तेपासून दूर केले, पण ते फक्‍त पाच वर्षांसाठीच! पण त्यामुळे राष्ट्रवादी येथे पर्याय म्हणून कधीच उभी राहू शकली नाही. मदन पाटील यांच्या बंडानंतर शून्य झालेल्या राष्ट्रवादीला आता महापालिका क्षेत्रात पुन्हा नंबर वन व्हायचे आहे. मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील यांना त्यांनी पक्षात येण्यासाठी पायघड्या घातल्या आहेत. खरे तर राजकारणात कधीच कोणी एकमेकाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याचा अनुभव पुन्हा एकदा येत आहे. कारण मदन पाटील आणि जयंत पाटील या दोन नेत्यांतील ज्यानी दुश्‍मनी सर्वांनी पाहिली आहे. किंबहुना दादा-बापू या दोन गटातील संघर्षावर एककाळ जिल्ह्याचे राजकारण फिरत होते. पण मदन पाटील आणि जयंतरावांचे सूत पुन्हा जमले होते. अशातच मदन पाटील कालवश झाले आणि या दोघांची जुळणारी मैत्री अधुरी राहिली. पण कॉंग्रेसमध्ये सध्या जयश्री पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीत सांगलीतून उमेदवार म्हणून त्या इच्छुक होत्या. मदन पाटील यांच्या वारसदार म्हणून त्यांच्या उमेदवारीचा विचार होईल, असे वाटत होते. मात्र यावेळी दुसऱ्यांदा वसंतदादा घराण्याबाहेर कॉंग्रेसने उमेदवारी दिली आणि पृथ्वीराज पाटील हा नवा फ्रेश चेहरा मैदानात आला. नाराज न होता पृथ्वीराज यांच्या उमेदवारीचे स्वागत जयश्री पाटील यांनी केले होते. विशाल पाटील यांनीदेखील पृथ्वीराज यांच्यासाठी प्रचारात भाग घेतला होता. एकूणच वसंतदादा घराण्याला डावलले तरी निवडणुकीत त्यांचा सहभाग होता. पण पृथ्वीराज पाटील हे भाजपसमोर दुबळे ठरतील, असे वाटत असतानाच त्यांनी दिलेली टक्‍कर आणि बलाढ्य असलेल्या भाजपला फोडलेला घाम पाहून अनेकांच्या भुवया वर गेल्या. अवघ्या आठ हजारांनी पृथ्वीराज हारले. हा पराभव कॉंग्रेस कार्यकर्त्यांना खूपच चटका लावणारा होता. शहरात कॉंग्रेसचे वीस नगरसेवक आहेत. असे असताना ज्या भागातून कॉंग्रेसला मते पडणे आवश्‍यक होते तेथून मिळाली नाहीत, असा तर्क मांडण्यात येतो. 

एकूणच कॉंग्रेसमध्ये पराभवानंतर धुसफुस सुरूच असते, मात्र ही खदखद थेट शरद पवार यांनीच व्यक्‍त केली आणि नव्या वादाला तोंड फुटले असले तरी हे एक निमित्त आहे. जयश्री पाटील यांनी महापालिका निवडणुकीत पक्ष टिकवला आहे. त्या वसंतदादा घरण्यातीलच आहेत, त्यामुळे एक काळ या घराण्याच्या हातीच येथील सर्व सत्ता केंद्रे होती. एकेक केंद्रे निसटत गेली. आता जयश्री पाटील यांना कॉंग्रेसकडून भविष्यात संधी देण्याबाबत कोणतीच पक्षात चर्चा नाही. राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्या घराण्याशी त्यांचे नातेसंबंधही आहेत. तो देखील राजकीय आधार त्यांना आहे, मात्र जयंत पाटील यांनी त्यांना राष्ट्रवादीची ऑफर दिली असल्याने भविष्यात विधान परिषदेवर किंवा अन्य राजकीय पदावर त्यांचे पुनर्वसन केले जाऊ शकते. कॉंग्रेसमध्ये ही आशा राहिली नसल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलले तर पुन्हा एकदा सांगली शहरात कॉंग्रेस नाममात्र होऊ शकते. याशिवाय मधल्या काळात भाजपमधून राष्ट्रवादीत अनेक जण गेले आहेत, त्यांनाही राज्यातील सत्ता पाच वर्षे टिकेल अशी खात्री वाटू लागली तर त्यांची घर वापसी होण्याचेही संकेत मिळत आहेत. 
 

जयश्रीताईंनी का नाराज? 

विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना भेटायला मदन पाटील समर्थक गेले होते. तेथे थोरात हे जयश्री पाटील यांना उद्देशून म्हणाले की,"तुम्ही पृथ्वीराज पाटील यांना पाठिंबा द्यायला वेळ लावला. चार दिवस घेतले. त्यामुळे कॉंग्रेस येथे काठावर हारली.'' त्यांच्या या विधानाने मदनभाऊ समर्थकांनी त्याच बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ती नाराजी पृथ्वीराज पाटील यांनी प्रदेशकडे असा अहवाल पाठवलाच कसा, याबद्दलची होती. मदनभाऊ समर्थकांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीराज यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर दोन तासांतच जयश्रीताईंनी त्याचे स्वागत केले. आम्ही काम केले नसते तर निवडणूक एवढी चुरशीची झालीच नसती. त्या नाराजीमुळे जयश्रीताईंनी गुलाबराव पाटील रौप्यमहोत्सव कार्यक्रमात जाणे टाळले असल्याची चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com