'सदाभाऊ' दीडआणा, फुटाणा...मग एवढी गर्दी कशाला? 

जिल्हा परिषद भाजपने राष्ट्रवादीकडून सहजपणे आपल्या ताब्यात घेतली. आगामी काळात हे सर्व विषय आव्हान बनून जयंतरावांपुढे आहेत. त्यांना ते चिल्लर वाटत असले, तरी सध्या दीडआण्याचे दिवस संपले आहेत.
'सदाभाऊ' दीडआणा, फुटाणा...मग एवढी गर्दी कशाला? 

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत दिग्गज नेत्यांनी दोन दिवस सांगलीत तळ ठोकून "निद्रिस्त' कार्यकर्त्यांना जागे केले. या हल्लाबोल यात्रेचे खरे लक्ष्य अर्थातच भाजप सरकार असले तरी सारा हल्ला सदाभाऊ आणि संजयकाका या दोघांवर झाला. जयंतरावांना सदाभाऊ दीडआणा एवढे चिल्लर वाटतात, दिलीप पाटलांनी त्यांना चिल्लर म्हणजे फुटाणा करून टाकले. यातून सभेत टाळ्या आणि हशा मिळून सर्वांची करमणूक झाली, मात्र राष्ट्रवादीपुढे आगामी काळ आव्हानांचा आहे. महापालिका आणि पाठोपाठ येणाऱ्या दोन महानिवडणुका म्हणजे आणा-दीडआणा आणि फुटाणा-शेंगदाण्याएवढ्या सोप्या नाहीत. 

एकूण राज्यातच राष्ट्रवादीची पिछेहाट झालीच, मात्र एखादा धष्टपुष्ट गडी एकमद खंगावा, तशी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे. तीन आमदार, त्यापैकी दोन मंत्री, जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा बॅंकेसह विविध बलाढ्य सहकारी संस्था ताब्यात ठेवून जिल्ह्यात नंबर वनचा पक्ष जयंतराव आणि दिवंगत आबांनी मिळून केला होता. त्यापैकी आता या पक्षाच्या हातात एक जिल्हा बॅंकेचे साम्राज्य आणि काही कारखाने सोडले तर फार काही नाही. जयंतराव जिल्ह्यावर वर्चस्व होतं आणि राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून सुध्दा त्यांच्याकडे चाहते पाहतात, त्यांना आपल्या होम पिजवरची सत्ताही टीकवता आली नाही. 

ते ज्या सदाभाऊंचा "दीड आणा' असा उल्लेख करतात, त्यांना सदाभाऊ आणि निशिकांत पाटलांसारख्या नवख्या कार्यकर्त्यांनी इस्लामपुरात दिलेले आव्हान "चिल्लर' म्हणता येण्यासारखे नाही. कारण तहयात असलेल्या पालिकेच्या सत्तेचा बुरुज ढासळला आहे. जयंतरावांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार इस्लामपूरकरांनी पाडावा, हे कशाचे द्योतक आहे? आज त्याच ठिकाणी सदाभाऊंसारख्या चिल्लराला आपली ताकद दाखवून देण्यासाठी जयंतरावांना खास तयारी करावी लागली का? कारण जिल्ह्यातील सर्वात मोठी सभा इस्लामपुरातच झाली. सांगली, मिरज, आटपाडी, जतचा प्रतिसाद तसा बरा होता, मात्र इस्लामपूरची गर्दी शक्तीप्रदर्शन म्हणावे अशीच होती. त्यामुळे चिल्लर असलेल्या सदाभाऊंसाठी एवढी गर्दी का जमवावी लागते, असा सवालही सहजपणे इस्लामपूरकरांच्या मनात येतो. 

जयंतरावांना विरोधकांनी इस्लामपुरातच बंधीस्त करण्याचा डाव आखला आहे. जयंतराव काही तालुक्‍याचे आणि मतदार संघ लिमिटेड नेते नाहीत. सलग नऊ वर्षे राज्याचे अर्थमंत्री, एकूण 15 वर्षे कॅबिनेट मंत्रीपदाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांचा संबंध जिल्ह्यावर प्रभाव हवाच होता. तो पक्षालाही अपेक्षित आहे, मात्र आर. आर. आबांच्या पश्‍चात त्यांचा तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघ पोरका झाला आहे. तासगावांत सातत्याने राष्ट्रवादीवर भाजप कार्यकर्त्यांचे हल्ले होत आहेत. दस्तुरखुद्द अजितदादा जे म्हणाले की, ""माजी गृहमंत्र्यांच्या पत्नीवर उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.'' आता ही वेळ नेमकी कोणामुळे आली म्हणायचे? राष्ट्रवादीचे येथील तारणहार सर्वस्वी जयंतराव तासगावकडे किती लक्ष देतात? ते असताना संजयकाकांसारख्या नेत्याची राष्ट्रवादीवर हल्ला करण्याची हिम्मत होतेच कशी? असे अनेक सवाल उपस्थित होतात. मग असे म्हणायचे काय की, जयंतरावांना भाजप नेत्यांनी इस्लामपूरात बंदीस्त करून ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ते अन्यत्र कोठेही लक्ष घालू शकत नाहीत. 

तसे पाहिले तर दिवंगत नेते मदनभाऊंच्या पोलादी पकडीतून सांगली महापालिकावर कब्जा मिळवणाऱ्या जयंतरावांचे जिल्ह्यावर पूर्ण वर्चस्व होते, आजही काही प्रमाणात आहे. मात्र सांगली, मिरजेत दोन्ही आमदार भाजपचे आहेत. उद्या विधानसभेला या जागा कॉंग्रेसच्या वाट्याच्या आहेत. कडेगाव-पलूसमधून सारी राष्ट्रवादीच भाजपमध्ये आहे (अपवाद फक्‍त अरुण लाड यांचा) शिराळा जयंतरावांचे कट्टर दुश्‍मन शिवाजीराव नाईकांनी आपल्याकडे घेतला आहे. आटपाडीत राजेंद्रअण्णा, अमरसिंह भाजपवासी झाल्याने राष्ट्रवादी लंगडी झाली आहे. मग जिल्ह्यात राष्ट्रवादी आहे कोठे? थोडीपार तासगावात आणि वाळव्यात.... अशा परिस्थितीत राष्ट्रवादीपुढे जिल्ह्यात पुन्हा आपले स्थान निर्माण करण्याचे आव्हान जयंतरावांच्या खाद्यांवर आहे. 

या आव्हानाचा सामना करताना जयंतराव आजकाल विधानसभेत खूप आक्रमक झाल्याचे दिसतात. हल्लाबोल यात्रेतूनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ले चढविले आहेत. पण हे करताना थेट राष्ट्रवादीवर शारिरिक हल्ला करणाऱ्या खासदार संजयकाका पाटील यांच्याबाबत फारसे आक्रमक का दिसले नाहीत, सांगलीच्या मैदानात आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्याबद्दल चकार शब्द का काढला नाही, असे अनेक सवाल जनतेच्या मनात उमटतात. 

एकूणच राष्ट्रवादीच्या हल्लाबोलमुळे कार्यकर्ते रिचार्ज झाले. अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या घणाघाती भाषणांनी कार्यकत्यांना नवा जोश आला आहे. पण दिग्गज नेते आले आणि गेले, जाता जाता येथील गटबाजीसह नेतृत्व बदलाचे जे काही प्रश्‍न आहेत ते योग्यवेळी मार्गी लावू, असे ते म्हणाले. पण मुळात ज्या सांगलीत निवडणूक आहे तेथील नेतृत्वाबाबतच कार्यकर्ते समाधानी नाहीत. 

महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना अजितदादांनी भाजप येथे आर्थिक बळ वापरणार हे सूचित केले आहे. अर्थातच निवडणुकीच्या खेळात पैशाचा खेळ राष्ट्रवादीलाही नवा नाही. येथे कॉंग्रेसला बरोबर घ्यायचे की नाही? भाजप हा राष्ट्रवादीच्या ताकदीवर येथे वाढला आणि पोसला होता. तो आता स्वबळासाठी छाती फुगवेल, मात्र त्यात हवा पुन्हा राष्ट्रवादीचीच असण्याची दाट शक्‍यता आहे. अर्थात, यावेळी पडद्याआडून नव्हे तर थेट भाजप प्रवेशाचे संकेत मिळताहेत. त्यामुळे आपल्याकडे बळ कमी पडत असेल तर कॉंग्रेसशी मदत घ्यावी की न घ्यावी या साऱ्याबाबत काही एक रणनीती दोन्ही कॉंग्रेसमध्ये या घडीला तरी दिसत नाही. 

कदाचित इच्छुकांचे आऊटगोईंग रोखण्यासाठी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे पालिका निवडणुका लढवण्यावर भर देतील, असे संकेत आहेत. यामुळेच जिल्हा परिषद भाजपने राष्ट्रवादीकडून सहजपणे आपल्या ताब्यात घेतली. आगामी काळात हे सर्व विषय आव्हान बनून जयंतरावांपुढे आहेत. त्यांना ते चिल्लर वाटत असले, तरी सध्या दीडआण्याचे दिवस संपले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com