सांगलीचे आयुक्त रवींद्र खेबुडकरांना  बदला ; मुख्यमंत्र्यांना महापौरांचे साकडे

महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची तातडीने बदली करावी यासाठी महापौर संगीता खोत यांच्यासह भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आज सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आयुक्तांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. त्याची गंभीर दखल फडणवीस यांनी घेतली आहे. आयुक्त बदलाबाबत मंगळवारी निर्णय होईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सांगलीचे आयुक्त रवींद्र खेबुडकरांना  बदला ; मुख्यमंत्र्यांना महापौरांचे साकडे

सांगली  : महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची तातडीने बदली करावी यासाठी महापौर संगीता खोत यांच्यासह भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आज सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आयुक्तांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. त्याची गंभीर दखल फडणवीस यांनी घेतली आहे. आयुक्त बदलाबाबत मंगळवारी निर्णय होईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक शेखर इनामदार, गजानन मगदूम, आनंदा देवमाने, नगरसेविका भारती दिगडे, सुरेश आवटी, विठ्ठल खोत, भाजपचे सरचिटणीस सुरेंद्र चौगुले आदी उपस्थित होते.

आयुक्त कामांची अडवणूक करून विकासाला खीळ घालत असल्याचा आरोप महापौर सौ. संगीता खोत तसेच भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केला. महापालिका निवडणुकीत बहुमताने भाजपने सत्ता मिळवली. शहराच्या विकासाचे जनतेला व्हिजन दाखवले आहे. त्यादृष्टीने विकासकामे होणे गरजेचे असताना दहा महिन्यांत कोणतीही कामे झालेली नाहीत. या सर्व कारभाराला आयुक्त खेबुडकर जबाबदार आहेत. भाजपच्या सदस्यांची कामे करत नाही. वादग्रस्त नगरोत्थान योजनेची बिले काढण्यास महासभेने मनाई केली असतानाही बेकायदा बिले काढली जात आहेत. विकास कामांच्या फाईल्स अडवल्या जात आहेत. महापालिकेत सर्वच विभागांत अनागोंदी कारभार सुरू असून, शहराचे वाटोळे केले आहे अशी तक्रार गटनेते युवराज बावडेकर, नगरसेविका भारती दिगडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर केली.

नगरोत्थान योजनेंतर्गत 100 कोटी रुपयांचा विशेष विकासनिधी मंजूर झाला असताना त्याची निविदा प्रक्रिया खेबुडकर यांनी लांबवल्यामुळे ती आचारसंहितेत अडकली. ही कामे अजून मार्गी लागलेली नाहीत. अमृत, ड्रेनेज, शेरीनाला, झोपडपट्टी पुनर्वसन ही कामेही रखडली आहेत. याला मंत्री खाडे आणि आमदार गाडगीळ यांनीही दुजोरा दिला. सर्वांनी खेबुडकर यांची 9 जून रोजी तीन वर्षे नियुक्तीची मुदत संपली आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ येथून बदली करावी, असा आग्रह धरला. सर्वांच्या तक्रारीनुसार फडणवीस यांनी तसा शेरा मारून पत्र नगरविकास सचिवांना पाठविले. तसेच दूरध्वनीवरून खेबुडकर यांच्या तत्काळ बदलीचे आदेशही दिल्याचे बावडेकर यांनी सांगितले. त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब होईल, असे ते म्हणाले.

आयुक्तपदी कापडणीस?
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खेबुडकर यांच्या जागी मिरजेचे तत्कालीन उपायुक्त व नागपूर मनपाचे उपायुक्त नितीन कापडणीस यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. त्यांना शहराची चांगली माहिती आहे. ते आयुक्‍तपदी आल्यास विकासकामे गतीने होतील, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. त्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कापडणीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे बावडेकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com