सांगलीत ये तो होना ही था!  

विशाल आणि गोपीचंद या दोघांच्या मतांची बेरीज पाहिली तर भाजपपेक्षा ती जास्त होते आहे, याचे भानही भाजपला येथे ठेवावे लागेल !
सांगलीत ये तो होना ही था!  

सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरवातीला वन-वे असल्याची चर्चा होती. कॉंग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथे कॉंग्रेसचे आव्हान लढाईपूर्वीच संपुष्टात आले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील यांनी ऐनवेळी बॅटिंगला उतरले. या सामन्यात गोपीचंद पडळकरांनी वंचित आघाडीच्या संघाकडून अनपेक्षित फलंदाजी करून भाजपची वजाबाकी मर्यादित राहिली. अर्थात संपूर्ण राज्यात कॉंग्रेस आणि मित्रपक्षांचे पानीपत होत असताना सांगलीतला निकाल हा काही धक्‍कादायक मुळीच नाही !  

मुळात कोणे ऐकाकाळी सांगली हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला. हा आता पूर्ण इतिहास झाला. मोदी लाटेचे अपत्य अशी संजय पाटलांवर टीका व्हायची. यावेळी भूखंड माफीयापासून त्यांची खासदार म्हणून लायकी नाही, असे अनेक आरोप करीत त्यांना घेरण्याचा प्रयत्नही झाला. मात्र त्यांनी दीड लाखाचे मताधिक्‍य घेत स्वत:ची "लायकी' सिद्ध केली आणि विरोधकांना आरसा दाखवला. भाजपमधील नाराजीचा मोठा बाऊ केला जात होता. मात्र भाजपच्या सर्वच नेत्यांनी तो आरोप मतपेटीतून खोडून काढला आहे. नाराजी निवडणुकी आधी मिटवण्यात भाजपला यश आले तर कॉंग्रेसमधील पारंपरिक गटबाजी निवडणुकीत उफाळून आली. हा दोन्ही पक्षांतील फरक राहिला. भले भाजप पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेसच्या नेत्यांनीच भरून ओसंडत असला तरी संघ शिस्त पाळण्यात तूर्त तरी त्यांना यश आले आहे. 

दिल्लीच्या निवडणुकीची चर्चा मात्र गल्लीच्या प्रश्‍नावर रंगली. विकासाच्या मुद्द्यांवर किंवा देशाच्या प्रश्‍नावर चर्चा न होता व्यक्‍तिगत निंदा नालस्तीवर प्रचाराची दिशा भरकटली. संजय पाटील यांनी आरोपांना प्रत्युत्तर देण्याचे टाळत वाद टाळले. या निवडणुकीत मोदी लाट आहे किंवा नाही यावरही किस पाडला गेला, मात्र ती सुप्तपणे होती हेही आता मान्य करावे लागेल. मतदारांनी दाखवलेला भरवसा संजय पाटील आणि मोदी या दोघांवरील आहे. 

या निवडणुकीत विकासाचा मुद्दा फारसा चर्चेत आला नसला तरी पाच वर्षांतील भाजपची कामगिरी आधीच्या प्रत्येक पाच वर्षांच्या तुलनेत काकणभर सरसच होती हेही मान्य करावे लागेल. यातला श्रेयवादाचा भाग सोडून दिला तरी सिंचन, जिल्ह्यातील नवे महामार्ग, रेल्वे या सेक्‍टरमध्ये झालेली कामे दाखवण्या इतपत नक्की उठावदार झाली होती. ड्रायपोर्टसारख्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पाच्या घोषणेमुळेही दुष्काळी भागाच्या अपेक्षा आता आणखी उंचावल्या आहेत. दुष्काळ हा मुद्दा होता, पण तो तितका प्रभावी ठरला नाही कारण दुष्काळ सुसह्य ठरावा असे काम सिंचनाच्या क्षेत्रात झाले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात एरवी उमटणारा हा रोष मतपेटीतून उफाळला नाही. ऊस आणि कारखानदारीचे प्रश्‍न होते, पण कारखानदार दोन्हीकडे होते. शिवाय या विरोधात लढणारे राजू शेट्टींच कारखानदारांच्या कळपात जाऊन लढत होते. त्यामुळे हा मुद्दा या निवडणुकीत पूर्ण निकालात निघाला होता. 

भाजप गेल्या पाच वर्षांत सतत जिंकत असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादी मात्र दिवसेंदिवस क्षीण होत गेली आहे. ती भाजपच्या कर्तृत्वापेक्षाही त्यांच्यातील गटबाजी आणि बेकीमुळे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका अशी सर्वत्र कॉंग्रेस हद्दपार होत असताना ती सावरण्यासाठी रस्त्यावर येण्याची नैतिक ताकदच दोन्ही कॉंग्रेस गमावून बसल्या आहेत. 2014 नंतर 2019 ची कोणती तयारी दोन्ही कॉंग्रेसने केली, ते दूर उमेदवारही निवडणुकीच्या तोंडावर ठरवणे अशक्‍य झाले. उमेदवारीचा चेंडू झाला आणि दादा आणि कदम घराणे तो एकमेकाकडे टोलवत राहिले. अखेर लढायला कोणी नाही म्हणून एका रात्रीत ही जागा दुसऱ्या पक्षाला कॉंग्रेसच्या धुरीणांनी बहाल केली. मग स्थानिक नेत्यांना जाग आली अखेर येथील दादांचा गड राखण्यासाठी विशाल पाटील बॅट घेऊन उतरले, पण त्यांच्याबाबत कॉंग्रेसमध्येच एकवाक्‍यता होती का, हा देखील सवाल आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गेल्या निवडणुकीला पतंगराव कदम, मदन पाटील, आर. आर. पाटील ही अनुभवी व लोकांचा बेस असलेली नेते मंडळी होती त्यांची कमतरता भरून काढण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. यापुढे आंदोलने केवळ फोटोसाठी आणि फेसबुकसाठी करून चालणार नाहीत तर जनतेसोबत करावी लागतील हा देखील या निकालाचा संदेश आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या संघर्ष-एल्गार यात्रा कार्यकर्त्यांना कार्यक्रम देऊ शकल्या नाहीत. या निवडणुकीतील जयंत पाटील यांचा फॅक्‍टर महत्त्वाचा होता. महापालिकाक्षेत्रात जयंतरावांची ताकद आहे. पण येथे देखील भाजपनेच आघाडी घेतली हे आता स्पष्ट झाले आहे. दुसरा फॅक्‍टर होता कॉंग्रेसचे आमदार विश्‍वजित कदम यांना मानणारे कार्यकर्ते विशाल यांचे काम करणार काय? याबाबतही कॉंग्रेसला आता शोध घ्यावा लागेल. खरे तर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र त्यांनी केलेल्या विलंबात त्यांच्यातील इच्छाशक्ती दिसून आली होती. राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनीही वसंतदादांची सांगली वाऱ्यावर सोडणे पसंत केले. वंचित आघाडीचा अंदाजही स्वाभिमानीला आला नाही. स्वाभिमानीकडून येथे कोणाला उतरावायचे याबाबत राजू शेट्टीही संभ्रमात राहिले. 

वंचित आघाडीने येथे घेतलेली मते लक्षवेधी आहेत. भाजपला धनगर समाजाची नाराजी भोवणार असा एक तर्क होता तो काही प्रमाणात खराही होता. पण गेल्यावेळचे संजय पाटलांचे सव्वादोन लाखांचे लिडच विक्रमी होते. त्यात किती घट एवढाच काय तो मुद्दा होता. अर्थात गेल्यावेळी दुरंगी लढत होती. यावेळी तिरंगी होऊनही संजय पाटलांनी दीड लाखांचे मताधिक्‍य घेणे अपेक्षेपेक्षा अधिकच आहे. अर्थात विशाल आणि गोपीचंद या दोघांच्या मतांची बेरीज पाहिली तर भाजपपेक्षा ती जास्त होते आहे, याचे भानही भाजपला येथे ठेवावे लागेल ! मात्र या आकडेवारीला आता विजयाच्या क्षणी फारसा अर्थ नाही. कारण विजय तो विजयच असतो. शिवाय पराभवातून धडा घेऊन पुढे जाण्याचा मार्ग विशाल यांना तुडवावा लागेल. ही त्यांची पहिलीच मोठी निवडणूक होती त्यातून झालेली नेटवर्कची बांधणी हिच त्यांच्यासाठी जमेची बाजू असेल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com