sangli jayant patil birthday | Sarkarnama

धक्‍के बसत आहेत, तरीही जयंतराव 'कम बॅक' करतील? 

जयसिंग कुंभार 
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

सहा टर्म विधानसभेत आमदार म्हणून कार्यरत असलेले जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुत्सदी अभ्यासू राजकारणी म्हणून परिचित आहेत. जनता पक्षाचे राज्यात नेतृत्व करणाऱ्या राजारामबापू पाटील यांचा समर्थ राजकीय वारसा त्यांनी दोन पाऊले पुढेच नेला आहे. विरोधकांचा कार्यक्रम करण्यात माहीर असलेल्या जयंतरावांचाच "कार्यक्रम' करण्यासाठी त्यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात फासे टाकले जात आहेत. जिल्ह्यातील एक एक सत्ताकेंद्र राष्ट्रवादीच्या हातातून निसटत असताना जयंतरावांसमोर अनेक पदरी आव्हाने आहेत. हा कठीण कालखंड ते कसा पार करतात यासाठी नजीकची चाचणी परिक्षा येत्या जुलैमध्ये आहे. सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची ही निवडणूक त्यांच्यासाठी कम बॅकची एक संधी असेल. ती ते कशी साधतात, याकडे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या राजकीय वर्तमानावर टाकलेली एक नजर.. 

1999 मध्ये राज्यात सत्तांतरानंतर महाराष्ट्रात कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे पहिले सरकार मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यानंतर सत्तेत आले. अर्थमंत्रीपदाची धुरा जयंत पाटील यांच्याकडे आली. त्यानंतर सलग नऊ वर्षे त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. युती शासनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला अशी टीका करीत कॉंग्रेस आघाडीने मांडलेल्या या अर्थसंकल्पानंतर मंत्री पाटील यांनी राज्याच्या तिजोरीत आता खुळखुळाट झाला आहे अशी स्थिती येईपर्यंत अर्थमंत्रालयाची धुरा वाहिली. त्यांनी काही काळ ग्रामविकास व गृहमंत्रालयाची जबाबदारी सांभाळली तरी राज्यस्तरावर त्यांची एक कुशल अर्थमंत्री अशीच ओळख राहिली. 

आघाडीच्या संपुर्ण कालखंडात जयंत पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर पुर्ण पकड मिळवली. जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद, महापालिकांसह जिल्ह्यातील बहुतेक सत्ताकेंद्रावर त्यांनी राष्ट्रवादीची झेंडा लावला. राज्यस्तरावर आर. आर. पाटील यांनी पक्षात पहिले स्थान प्राप्त करताना जयंत पाटील यांचा पक्षांतर्गत निवडणुकीत पराभव केला होता. मात्र या दोघांमध्ये पक्षीय पातळीवर सुप्त अंतर्गत संघर्ष राहिला तरी या दोघांनीही कधी तो टोकदार होणार नाही याची दोन्ही बाजूने दक्षता घेतली. जवळपास पंधरा वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालखंडात जयंत पाटील यांनी जिल्ह्यावर आणि राज्यात एक आपली अभ्यासू, मुत्सदी नेता अशी प्रतिमा तयार करण्यात यश मिळवले. नेते शरद पवार यांचा विश्‍वास मिळवला. 

आज राष्ट्रवादीतील ते आघाडीचे नेते आहेत. राज्यभर मोदी लाटेत राष्ट्रवादी वाहून जात असतानाही जयंतरावांनी त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघात मजबूत विजय मिळवत आपले वर्चस्व सिध्द केले. मात्र विधानसभेनंतर राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार सत्तेत आले आणि जयंत पाटील यांच्या सुमारे पंचवीस वर्षाच्या मतदारसंघातील मजबूत राजकीय बस्तानाला धक्के बसू लागले. 

तब्बल तीस वर्षे त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असलेल्या इस्लामपूर नगरपालिकेत सत्तांत्तर झाले. त्यांचेच कार्यकर्ते असलेल्या निशिकांत पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी सर्वपक्षीय आघाडीच्या झेंड्याखाली बंड केले आणि विजय मिळवला. निशिकांत पाटील यांनी इस्लामपूरच्या राजकारणातील मुरब्बी आणि जयंतरावांचे निष्ठावान ज्येष्ठ कार्यकर्ते विजय पाटील यांचा पराभव केला. नानासाहेब महाडीक, आमदार शिवाजीराव नाईक, खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, विक्रम पाटील, शिवसेनेचे आनंदराव पाटील अशा जयंतरावांच्या पारंपरिक विरोधकांनी मोट बांधून इस्लामपूरचा विजय मिळवला. 

सागंली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा हा देखील जयंतरावांसाठीच धक्काच होता. गेली दोन वर्षे जयंतरावांना राजकीय धक्के बसत आहेत. त्यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीचा विचार करता सध्याचा कालखंड अधिक बिकट आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी त्यांच्यासमोर राजकीय आव्हान निर्माण करण्यासाठी मोठी जुळवाजुळव सुरु केली आहे. मुळात जयंतरावांच्या मतदारसंघात मात्तबर नेत्यांची कधीच वानवा नाही. माजी मंत्री अण्णा डांगे, माजी आमदार विलासराव शिंदे, हुतात्मा उद्योगसमुहाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडीक अशा मात्तबरांना त्यांनी योग्यवेळी आपल्यासोबत घेत आपले स्थान कायम ठेवले आहे. खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांना लक्ष्य करीत नामोहरम केले तरी यावेळचे आव्हान मात्र त्यांच्यासाठी अधिक बिकट आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या तीन वर्षात इस्लामपूरला दौरे करीत जयंतविरोधकांना ताकद दिली आहे. त्याचवेळी विधानसभेत आणि राज्यात दोन्ही कॉंग्रेसने काढलेल्या आक्रोश यात्रेत जयंतरावांनी सरकारला सातत्याने लक्ष्य केले आहे. गेल्या पंचवीस वर्षात जयंतरावांनी जिल्ह्यात भाजपला कॉंग्रेसला खिंडीत गाठण्यासाठी सतत सोयिस्कर वापर केला आहे. सांगलीत वसंतदादा घराण्याला शह देण्यासाठी आधीच्या जनता दलाचे आणि नंतर भाजपचे झालेल्या संभाजी पवार यांना सतत बळ दिले. जिल्ह्यातील भाजपची ओळख सातत्याने जेजेपी (जयंत जनता पार्टी) अशी ओळख राहिली. मात्र मोदी लाटेनंतर सारेच चित्र पालटले आहे. जयंतरावांच्या इशाऱ्यावर हलणाऱ्या भाजपमध्येच आता नेत्यांची गर्दी झाली आहे. त्यामुळे कधी काळी जयंतरावांचे नेतृत्व मानून काम करणाऱ्या खासदार संजय पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधीच आपली भूमिका जाहीर करताना आता "नो जेजेपी... ओन्ली बीजेपी' असा नारा दिला आणि प्रत्यक्षातही आणला. 

बदललेल्या वाऱ्याची चाहूल ओळखून जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांकडे आघाडीसाठी आटापिटा केला मात्र एवढ्या प्रदिर्घ काळापासून सतत राजकीय शह देणाऱ्या जयंतरावांना शह द्यायची हीच वेळ आहे असा समज करवून घेत कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी जयंतरावांचे नाक कापण्याच्या प्रयत्नात स्वतःचेही नाक कापून घेतले. कॉंग्रेस नेत्यांनी जयंतरावांना त्यावेळी हातात दिला असता तर त्यांनी जिल्ह्यात भाजपचा अश्‍वमेध नक्की रोखला असता. तेवढे राजकीय चातुर्य त्यांच्याकडे नक्की आहे. मात्र राजकारणात जर तरला काही अर्थ नसतो. जयंतराव राजकीय दृष्ट्य कठीन कालखंडातून जात आहेत खरेच मात्र राजकारण कसे बदलायचे याचा पक्का होमवर्क असलेला हा नेता त्यावरही मात करेल असा राजकीय जाणकारांना विश्‍वास वाटतो. 

आगामी सांगली महापालिका निवडणुका जयंत पाटील यांच्यासाठी आव्हानात्मकच आहेत. सुमारे 23 नगरसेवकांचे बळ असलेल्या राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी भाजपमधून फासे फेकले जात आहेत. त्याचवेळी जयंतरावांनी कॉंग्रेससोबत आघाडीचे स्पष्ट संकेत देत भाजपला शिंगावर घ्यायची तयारी केली आहे. महापालिकेचे मैदान त्यांच्यासाठी जिल्ह्याच्या राजकारणात कम बॅकची मोठी संधी असेल. ही संधी ते कशी घेतात हे येत्या जुलैमध्ये स्पष्ट होईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख