सांगली जिल्हा : भाजपची घोडदौड रोखणे हेच आघाडीसमोरचे आव्हान

पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपने खऱ्या अर्थाने प्रवेश केला तो सांगलीतूनच. चार आमदार, एक खासदार अशी मोठी रसद भाजपला मिळाली आहे. सांगलीसह पश्‍चिम महाराष्ट्रातील नव्या भरतीच्या भरवशावरच भाजपचे राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याचे स्वप्न साकारू शकते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला जिल्ह्यात खमके नेतृत्व उरलेले नाही आणि जे आहे त्याच्या हाती पक्ष सावरणे एवढेच बाकी आहे. भाजपला रोखणे, हेच त्यांच्या पुढे मोठे आव्हान असेल.
सांगली जिल्हा : भाजपची घोडदौड रोखणे हेच आघाडीसमोरचे आव्हान

लोकसभा निवडणुकीत भाजपने दीड लाखाच्या मताधिक्‍याने हा गड कायम राखला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची येथील पुण्याई संपवली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही भाजपची घोडदौड रोखणे विरोधकांसाठी सोपे नाही. जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. त्यापैकी कॉंग्रेस, शिवसेना प्रत्येकी एक, राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन आणि भाजपकडे चार जागा आहेत. येथे अर्थातच भाजप आपली बेरीज वाढविण्यासाठी प्रयत्न करू शकते. 

जयंतरावांना घेरले 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याच जिल्ह्यातील आहेत. त्यांच्यापुढील आव्हाने वाढतच आहेत. त्यांच्या तंबूतील अनेकांची भाजपमध्ये जाण्यासाठी रांग लागली आहे. त्यांच्या मतदारसंघाला लागून असलेल्या सातारा जिल्ह्यातूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला खिंडार पडल्याने जयंतरावांसमोर सांगलीसह राज्यातील आव्हानेही आहेत. त्यामुळे विरोधकांनी त्यांना त्यांच्याच इस्लामपुरात वेढले आहे. त्यांना खिंडीत गाठणारे भाजपचे मंत्री सदाभाऊ खोत आणि त्यांचे सहकारी जयंतरावांना आव्हान देत आहेत. लोकसभेला राजू शेट्टींचा झालेला पराभव जयंत पाटील यांच्यासाठी धक्का आहे. 

शिराळ्यात भाजपला चिंता 
त्यांच्या शेजारच्या शिराळा मतदारसंघात त्यांचे कट्टर विरोधक भाजपचे शिवाजीराव नाईक गेल्या वेळी निवडून आले; पण या वेळी त्यांच्या संस्थाच अडचणीत आल्याने त्यांच्याविषयी भाजपला चिंता वाटते. येथे "राष्ट्रवादी'कडून मानसिंगराव नाईक; तर कॉंग्रेसकडून सत्यजित देशमुख इच्छुक आहेत. सत्यजित भाजपमध्ये गेल्यास कॉंग्रेस शून्यावर येईल. 

शिराळ्याप्रमाणे भाजपपुढे पेच आहे तो जतमध्ये. येथे विलासराव जगताप हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी विकासकामे केली असली तरी पक्षामधून त्यांना उमेदवार देऊ नका, असा सूर आहे. अर्थात, विलासरावांना डावलणे येथे भाजपला परवडणारे नाही. आघाडीत ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याची; पण कॉंग्रेसचे विक्रम सावंत यांनी येथे बंडखोरी केली होती. सावंतच या वेळी येथून भाजपला टक्‍कर देतील! 

युतीमध्येच पेच 
खानापूर येथे शिवसेनेने अनिल बाबर यांच्या रूपाने जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवसेनेचे खाते उघडले. बाबर यांनी टेंभू सिंचन योजनेतून अनेक गावांत पाणी आणले आहे. त्यांच्याविरोधात येथे सदाशिवराव पाटील आहेत. अर्थात, ते कॉंग्रेसवरच नाराज आहेत. पक्षाच्या मुलाखतीकडेही त्यांनी पाठ फिरवली होती. त्यांनाही भाजपप्रवेशाचे वेध लागले होते; पण ही जागा शिवसेनेकडे असल्याने ते आता "राष्ट्रवादी'त जाऊन लढणार, अशी चर्चा आहे. याशिवाय वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर याच मतदारसंघातून विधानसभेसाठी उतरल्यास येथे मोठी लढाई होऊ शकते. 

विश्वजित कदमांसमोर आव्हान 
पलूस-कडेगाव मतदारसंघ पतंगराव कदमांमुळे राज्यात चर्चेत राहिला आहे. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विश्‍वजित कदम आमदार झाले. तेच कॉंग्रेसकडून या वेळी मैदानात उतरतील. त्यांना पक्षाने कार्याध्यक्षही केले आहे. त्यांच्यासमोर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे मोठे आव्हान असेल. नुकत्याच आलेल्या महापुराने या मतदारसंघाचे मोठे नुकसान झाले. बोट उलटून 17 जण मृत्युमुखी पडले ते ब्रह्मनाळ याच मतदारसंघात आहे. महापूर येथे निवडणुकीतील मोठा मुद्दा असेल. हा एकमेव गड राखणे विश्‍वजित यांच्यासमोर मोठे आव्हान असेल. 

तासगावातही चुरस 
कवठेमहांकाळ-तासगाव मतदारसंघ आर. आर. आबांमुळे राज्याला परिचित. आबा नाहीत, याची झळ "राष्ट्रवादी'ला प्रत्येक क्षणी बसत आहे. येथे त्यांच्या बालेकिल्ल्यातूनच खासदार संजय पाटील दुसऱ्यांदा प्रचंड मताधिक्‍याने निवडून आले. येथे आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनाच "राष्ट्रवादी'कडून उमेदवारी मिळेल. युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे आहे; पण त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे अजितराव घोरपडे हे भाजपकडून मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे. 

मिरजेत हॅटट्रिकची तयारी 
मिरज हा राखीव मतदारसंघ आहे. येथे भाजपचे सुरेश खाडे हे सलग दोनदा निवडून आलेत. त्यांनी हॅटट्रिकची तयारी सुरू केली आहे. वंचित आघाडी येथे कोणाला संधी देणार, याबाबतही अजून स्पष्ट चित्र नाही; पण खाडेंना आता समाजकल्याण मंत्रीही केले आहे, त्याचा फायदा होऊ शकतो. 

गाडगीळांना पक्षांतर्गत विरोध 
सांगली शहर विधानसभा मतदारसंघ गेल्या वळी भाजपकडे आला. मदन पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभूत करून संघशाखेतून थेट भाजपमध्ये आलेल्या सुधीर गाडगीळ यांनी येथे "कमळ' फुलवले. महापालिकेतही त्यांनी "कमळ' फुलवले. त्यांच्यासमोर पक्षांतर्गत विरोधकांचेच आव्हान असेल. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई यांनाच उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज आहे; पण कॉंग्रेसने जर घराणेशाही नको, असे ठरवले तर कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा विचार होऊ शकतो.

याशिवाय लोकसभेला कॉंग्रेसमधून स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार झालेले विशाल पाटील हेही येथे उमेदवारीसाठी दावेदार होऊ शकतात. महापुराने सांगलीची बाजारपेठ उद्‌ध्वस्त झाली. सांगली, मिरज, पलूस आणि वाळवा या मतदारसंघांत महापुराचा मोठा फटका बसला. मदत आणि पुनर्वसनाचा मुद्दा येथे कळीचा ठरण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com