चंद्रकांतदादा, सांगलीकरांचा इशारा समजून घ्या !

ऐनवेळी ठराव घुसडून जागांवर डल्ला मारण्याचे सोनेरी टोळीचे उद्योग भाजपच्या सत्तेतही राजरोसपणे होऊ लागलेत. अर्थात, टोळीतील काही भिडू आपल्याकडे आल्यावर दुसरे काय होणार?
Chandrakantdada Patil in Sangli
Chandrakantdada Patil in Sangli

चंद्रकांतदांना
सांगलीकरांचा नमस्कार!

आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष... सांगलीत विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशापयाशीच जबाबदारीही आपलीच! यापूर्वी जिल्हा परिषद, महापालिका या संस्था मिळविल्या, खासदारकीही टिकवली... सांगलीतील आपल्या पक्षाचा यशाचा हा आलेख सतत चढता राहिला, मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यातील दोन जागा कमी झाल्या आणि भाजपचा येथील विजयचा वारू दोन्ही कॉंग्रेसनी रोखला, ही वस्तुस्थिती आपण मान्यच कराल. 

संघटनेच्या अंतर्गंत बदलासाठी होणाऱ्या बैठकीसाठी आज (शुक्रवारी) आपण सांगलीत दाखल झाला आहात. त्यामुळे सांगलीकरांच्यावतीने आपल्याला हा अनावृत्त पत्राचा प्रपंच केला. यापूर्वी देखील याच सदरातून सांगलीकरांची भाजपच्या कारभाराबद्दलची नाराजी खास करून पूर्णवेळ पालकमंत्री नसणे वगैर... तसेच महापुरात ढिसाळ कामगिरीबद्दल... आम्ही मत वक्‍त केलं होतंच! 

प्रथमता आपले अभिनंदन! आपण निवडणुकीसाठी थेट कोथरुड गाठलं आणि माध्यमांनी प्रचंड चुरस रंगवत उत्सुकता वाढविलेल्या या नवख्या मतदारसंघातही आपण दमदार विजय मिळविला.

दादा, सांगलीबद्दल गेली पाच वर्षे आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी येथील पक्ष संघटना वाढीसाठी खूप मेहनत घेतली. काही महत्त्वाची विकासकामे लक्षवेधी ठरली. पण अधिक तर आपला वेळ आयारामांना पायघड्या घालण्यासाठीच गेला, अशी टीका विरोधकांकडून होत असते. आता संघटना वाढीसाठी अन्य पक्षातील मोहरे आपल्याकडे घेणे ही चाणाक्‍यनीती आहे. त्यासाठीही कौशल्य लागते, त्याचा वापर आपण खुबीने केला, हे असं म्हणु या.

 पण जो येईल त्याला पक्षात घेण्याचे धोरण जनतेला रुचले का? याचाही विचार सांगलीतील पक्षाच्या अपयशाबद्दल चिंतन करताना जरूर करा. भाजपमधील जुने बाजूला पडत आहेत आणि नवे लाभार्थी ठरत आहेत, याचा कोठेतरी पक्ष संघटनेवरदेखील परिणाम होत आहे का, याचे उत्तर शोधा. मुद्याच बोलायचं तर सांगलीतून आपले दोन आमदार वजा झाले. उरले दोन. जनतेनं पुन्हा आपल्या झोळीत टाकले आहेत. अर्थात कोल्हापूर तर भाजपचे नामोनिषाणही राहिले नाही. त्यातुलनेत सांगलीकरांनी महापालिका क्षेत्रातील आपले दोन्ही आमदार कायम ठेवलेत. मताधिक्‍य घटले त्याचे काय? 

मात्र तर ज्या दुष्काळी जतमधून भाजपचा या जिल्ह्यात प्रवेश झाला, ती जागाच पक्षाने गमावणे हा भाजपसाठी मोठा इशारा आहे. येथे विलासराव जगताप आणि भाजपमधील असंतोषाची वेळीच दखल घेतली असती तर असे घडले असते का? शिराळ्यातील लोकांच्या नाराजीलाही भाजपने नजरअंदाज केले. 

जतमध्ये तर संजयकाकांनी पक्षाच्या उमेदवाराचे काम केले नाही, असा आरोप झाला. अजितराव घोरपडेंसह पक्षातील नाराजांना जगतापांनी समजूत काढून संजयकाकांच्या मागे उभे केले, पण तेच काकांसाठी दूत ठरलेले जगताप संजयकाकांवर प्रचंड नाराज का आहेत? कोणी कॉंग्रेसवाल्यांनी नाही तर खुद्द जगातापानी संजयकाकांची ही शेवटची खासदारकी म्हणून जाहिर केले आहे.

 पक्षातर्गंत हा असंतोष विकोपाला गेल्याचे दिसू लागले आहे. ऐन निवडणुकीत घोरपडे, संग्रामसिंह देशमुख, निशिकांत पाटील या लढाऊ नेत्यांना पक्षाने कट्ट्यावर बसवले. कडेगावची निवडणूक म्हणजे तर नुरा कुस्तीच झाली. त्यामुळे भाजप संघटनात्मक वाढीलाही या काही निर्णयाने फटका बसला असे आपल्याला वाटत नाही काय? 

तासगाव-कवठेमहांकाळ, कडेगाव आणि इस्लामपूर या सर्व ठिकाणी भाजपकडेच तुल्यबळ असे उमेदवार होते. या जागा भाजपच लढेल, असे वातावरण होते. शिवसेनेची खानापूर वगळता अन्यत्र ताकद नाही. जागावाटपात या जागा सेनेला सोडून आपल्या पक्षाने आत्मघात केला, असाच मेसेज गेला. दुसऱ्या बाजूला भाजपने वातावरण असे निर्माण केले की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी संपले आहेत, पण या पक्षांनी प्रतिकुल स्थितीतही तग धरून आपले गेलेले दोन्ही गड पुन्हा मिळवले आहेत! 

या निवडणुक प्रचारातदेखील काश्‍मिरसह देशपातळीवर मुद्यांची आणि शरद पवारांवर नाहक टीकेचीच चर्चा झाली, पण आपल्याच पक्षाने येथे विकास काय केला त्यावर हवी तेवढी चर्चाही झाली नाही. आपल्या पक्षाची केंद्रात, राज्यात सत्ता आहे. त्यामुळे अमुक एक विकास झाला, हे ताकदीने मांडले गेले नाही.

 उदाहरणच द्यायचे तर सांगली जिल्ह्यातून चार नवे महामार्ग जात आहेत, त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. बऱ्याच कालावधीनंतर रेल्वे कात टाकू लागली आहे. दुष्काळी भागातील सिंचन योजनांनी वेग घेतलाय, याचा प्रचारात सेनेच्या अनिल बाबर यांनी वगळता भाजपने कोठेच फोकस ठेवून उपयोग का केला नाही, हे कोडेच आहे! 

सध्या गेले महिनाभर महाराष्ट्र सर्वच पक्षातील सत्तेचा खेळ पाहतो आहे. बहुमत मिळूनही भाजप-सेना मिळून सरकार बनवू शकले नाहीत. त्यामुळे भाजपने जी आश्‍वासने दिली खास करून महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्याचे घोषणा तर तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अर्थात या सर्वांसाठी राज्य सरकार बरेचसे केंद्र व अन्य राज्यांवर अवलंबून आहे. 

उदा. कर्नाटकांत भाजपचे सरकार आहे, या निवडणुकीत जतला पाणी देण्याचा मुद्दा खूप गाजला आता राज्यात भाजपचे सरकार नसल्याने असे अनेक प्रश्‍न पुन्हा लटकतील, याबाबत पक्षाचे धोरण काय असणार, याची काळजी दुष्काळी भागातील आपल्या संघटनेलाही सतावत आहे. 

दादा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, एकेकाळी दोन्ही कॉंग्रेसच्या सत्तेला वैतागलेल्या सांगलीकरांनी तुम्हाला जिल्हा परिषद दिली, महापालिका दिली...पण या ठिकाणी आपली सत्ता येवूनही बराच काळ लोटला, पण अजूनही या संस्थांचा कारभार काही बदललाय असे लोकांना वाटत नाही. 

आपण महापालिकेचा चेहरा मोहरा बदलू असे सांगत होता. त्याचे काय होणार? सांगलीची ड्रेनेज योजना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराने बरबटली होती, मात्र हिच भ्रष्टाचाराची घाण साफ करण्याऐवजी आपल्याही येथील चेल्यांनी पुन्हा तिला मंजूरी देवून पुन्हा सोनेरी टोळीचेच अवशेष जपले आहेत. याबद्दल सांगलीकरात प्रचंड चिड आहे.

ऐनवेळी ठराव घुसडून जागांवर डल्ला मारण्याचे सोनेरी टोळीचे उद्योग भाजपच्या सत्तेतही राजरोसपणे होऊ लागलेत. अर्थात, टोळीतील काही भिडू आपल्याकडे आल्यावर दुसरे काय होणार? दादा भाजपकडून असा कारभार आपल्याला अपेक्षित असणार नाही? आता आपल्या संघटनात्मक बदलासाठी बैठक होते आहे तर तेथे पक्षाच्या कामगिरीवर चर्चा करा. 

पार्टी विथ डिफ्रन्स म्हणून आपल्याला सांगलीकरांनी जनादेश दिला, पण त्याचबरोबर येथे पक्षासाठी धोक्‍याची घंटाही विधानसभेला वाजली आहे. ज्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या भानगडी वेशीवर टांगू म्हणून तुम्ही येथे सत्तेत आला, पाच वर्षात त्यापैकी काहीच गोष्टी जनतेला येथे पहायला मिळाल्या नाहीत, खासकरून सहकारातील भानगडींची फाईल कोठे गायब झाली, असे अनेक प्रश्‍न आपल्या सत्तेतच अनुत्तरीत आणि मौनात राहिले! 

आपल्या पक्ष संघटनेत विधानसभेच्या काळात अभूतपूर्व अशी मेगा भरती झाली, पण ती होत असताना अनेकांनी सत्ता नसताना पक्ष जीवंत ठेवला, असे कायकर्ते आहेत. त्यांच्यावर अन्याय होतोय, असा सूर आता उमटू लागला आहे. कदाचित भाजपमधील कडक शिस्तीमुळे आपल्यापर्यंत ही खदखद किती व्यक्‍त होते माहित नाही, पण विधानसभा निवडणुकीत दोन जागांची वजाबाकी आणि घटलेले मताधिक्‍य यामुळे अंतर्गंत गटबाजीचा धोका वाढतोय.

एकूणच यापूर्वी शून्य असलेल्या भाजपला चार आमदार, एक खासदार एवढे भरभरून देवून सांगलीकरांना साधे मंत्रिपदही लवकर दिले गेले नाही. विकासाच्या पातळीवरही सांगलीसारखे शहर अजून मागेच राहिले आहे. त्यामुळे सांगलीने दिलेला जनादेश समजून घेण्यात आपले नेते कमी पडले काय, यावरच आत्मपरीक्षण जरूर करा, असाच सांगलीकरांचा संदेश आहे. 

आणखी एक, राज्यात सत्तांतर समोर दिसते आहे. अनेक लोक भाजप सोडून नव्या जहाजात उड्या घेतील. आयाराम आता गयाराम व्हायला लागले तर त्यांना थांबवू नका, अशी मूळ भाजपवाल्यांची धारणा आहे. ती समजून घेतला तरी पुरेसे आहे.

आपली
सांगलीकर जनता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com