मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा कोरोना काळातील 'सांगली पॅटर्न' - Sangli CEO Abhijeet Raut Fighting Corona With His Team | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा कोरोना काळातील 'सांगली पॅटर्न'

संपत मोरे
बुधवार, 1 एप्रिल 2020

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या पुढाकाराने कोरोनाच्या काळात काही विशेष उपक्रम सुरू केले आहेत

पुणे : ''समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून जॉईन होणारे डॉक्टर आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विनामोबदला स्वयंसेवक तत्त्वावर काम करत आहेत. एकूण 120 डॉक्टरांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यातील 20 डॉक्टर प्रतिबंधित इस्लामपूर मध्ये काम करत आहेत. इतर 100 डॉक्टर सांगली जिल्ह्यात काम करत आहेत. या डॉक्टरांनी पाच दिवसात पुण्या मुंबईवरून आलेल्या 20760 प्रवाशांची तपासणी केली आहे.हे डॉक्टर अजून शासकीय सेवेत रुजू झालेले नाहीत तरीही अडचणीच्या काळात प्रशासनासोबत आहेत." असे  सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्या पुढाकाराने कोरोनाच्या काळात काही विशेष उपक्रम सुरू केले आहेत. त्यांनी याबाबतची माहिती दिली. राऊत म्हणाले,"प्रशिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना आम्ही आवाहन केल्यावर आमच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिला.आणि त्यांनी कोरोनाच्या काळात जिल्ह्यात काम सुरू केले आहेत. हे डॉक्टर काही दिवसांनी शासकीय सेवेत समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून जॉईन होणार आहेत. त्यांनी अगोदरच संकटाच्या काळात प्रशासनाला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. या डॉक्टरांनी विनामोबदला काम करत त्यांची सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे"

जिल्ह्यातील खातेदारांना घरपोच पैसे पोहोच करण्याच्या उपक्रमाबाबत राऊत यांनी सांगितले, "लॉकडाऊन असल्याने लोकांना बाहेर पडणे शक्य नाही.त्यामुळे आम्ही इंडियन पोस्टल पेमेंट बँकेच्या माध्यमातून खातेदारांना पोस्टमनमार्फत घरी पैसे मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे. आधार कार्ड नंबर आणि बायोमेट्रिक च्या माध्यमातून खातेदारांना पोस्टमन घरात जाऊन दहा हजार पर्यंतची रक्कम देणार आहेत. लोकांनी आपल्या गावातील पोस्टमनशी संपर्क करायचा आहे."

"कोरोनोच्या काळात जिल्ह्यातील दिव्यांग लोकांना कसलीही अडचण आली तर आम्ही मदतकेंद्र सुरू केले आहे.आम्ही सतत दिव्यांग लोकांच्या संपर्कात आहोत. त्यांना कसलीही अडचण आली तर त्यांनी आम्हाला फोन करायचा आहे. त्या त्या गावातील प्रशासनाचे लोक जाऊन त्यांना भेटून त्यांची अडचण दूर करतील." असे राऊत म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख