Sangli : Both congress keen to control standing committee | Sarkarnama

सांगली : दोन्ही कॉंग्रेसचा डोळा स्थायी समितीवर 

जयसिंग कुंभार 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

ठवडाभरात स्थायी समितीच्या निवडी आहेत. महापालिकेची तिजोरी ताब्यात ठेवण्यासाठी भाजपमधील काही प्रबळ दावेदार आहेत. त्याचवेळी तोडीस तोड संख्याबळ असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडूनही तिजोरी ताब्यात ठेवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. 

सांगली : सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौरांची निवड येत्या 20 ऑगस्टला आहे. महिला ओबीसी प्रवर्गासाठीचे पहिल्या अडीच वर्षासाठी आरक्षण असून या पदासाठी भाजपमध्ये आठ इच्छुक आहेत.

त्याच दिवशी उपमहापौर निवड होईल. त्यानंतर आठवडाभरात स्थायी समितीच्या निवडी आहेत. महापालिकेची तिजोरी ताब्यात ठेवण्यासाठी भाजपमधील काही प्रबळ दावेदार आहेत. त्याचवेळी तोडीस तोड संख्याबळ असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडूनही तिजोरी ताब्यात ठेवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. 

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने 78 सदस्यांच्या सभागृहात 41 सदस्यांचे बहुमत प्राप्त केले आहे. कुपवाडचे अपक्ष गजानन मगदूम यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे 42 सदस्यांच्या बळावर महापौर उपमहापौर पदासाठी भाजपला कोणतीही अडचण नाही. मात्र इच्छुकांची मोठी संख्या पाहता नाराजी अटळ आहे.

या नाराजीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून डोळा ठेवून हालचाली सुरु झाल्या आहेत. महापौर उपमहापौर निवडणूक आघाडीकडून लढवली जाईलच. मात्र 20 ऑगस्टनंतर होणाऱ्या स्थायी समिती सदस्य निवडींसाठी काही चमत्कार करता येईल का यासाठी कॉंग्रेसमधील एक गट सरसावला आहे.

 गेल्या टर्ममध्ये बहुमतात असलेल्या कॉंग्रेसला राष्ट्रवादीने असाच दणका देऊन सभापतीपदी संगीता हारगे यांनी निवड केली होती. त्यावेळी कॉंग्रेसमधील शेखर माने व इद्रीस नायकवडी या गटाने गमजा केल्या होत्या. अशा गमजांची सवय असलेली अनेक मंडळी आता भाजपमध्ये जाऊन स्थिरावली आहेत. त्यांची ही खोड पक्षांतरांने थोडीच जाणार आहे?. अतिमहत्वाकांक्षीची मोठी फौज भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे दर सव्वा वर्षांनी महापौरपद बदलाचा प्रयोग करणेही भाजपसाठी धाडसाचे ठरेल. 

पुढचे वर्ष भाजपसाठी खूपच महत्वाचे आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेचा उपयोग करून महापालिकेसाठी भरीव निधी आणून "करुन दाखवले' असे सांगत ते आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सामोरे जायचे असा सांगली-मिरजेतील आमदारांचा इरादा आहे. त्यासाठी महापालिकेतील सत्ता योग्य कारणी लागावी आणि कोणत्याही अडथळ्यांविना ती राबवली जाणे गरजेचे आहे.

यदाकदाचित राज्यातील सत्तांतर झालेच तर मात्र अडीच वर्षानंतरचा महापौर पुन्हा भाजपला करणे दिव्य ठरेल. कारण राज्य आणि केंद्रातील सत्तेवर डोळा ठेवूनच दोन्ही कॉंग्रेसमधील अनेकांनी भाजपचा आसरा घेतला आहेत. सत्तेचा गोंदच त्यांना एकत्र ठेवू शकतो. त्यामुळे भाजपपुढे महापालिकेतील सत्ता राबवणे आव्हानात्मक असेल हे नक्की. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख