सांगलीत 'कमळ' फुलले पण मताधिक्‍य निम्म्याने घटले

मताधिक्‍य केवळ 6939 इतकेच म्हणजे गेल्यावेळेपेक्षा निम्म्याने घटणे हे भाजपसाठी सुचिन्ह नाही. अखेरच्या टप्प्यात चुरस निर्माण झाली. मात्र, सुधीर गाडगीळ यांच्या "मिस्टर क्‍लीन' प्रतिमेने मतदारांनी त्यांच्याच पारड्यात विजयाचे दान टाकले.
Sudhir_Gadgil
Sudhir_Gadgil

सांगली : सांगली मतदार संघ तसा भाजपच्या दृष्टीने पूर्ण "सेफ' मतदार संघ होता. त्यामुळे आमदार गाडगीळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे मताधिक्‍य कितीने वाढणार यात भाजपचे नेते मश्‍गूल झाले होते . 


सांगली विधानसभा मतदार संघात कमळाने अखेर  हॅट्ट्रिक साधली. 2009 मध्ये संभाजी पवार यांच्या माध्यमातून सुरू झालेली भाजपच्या विजयाची परंपरा सुधीर गाडगीळ यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून सुरू ठेवली.

मात्र त्यांचे मताधिक्‍य केवळ 6939 इतकेच म्हणजे गेल्यावेळेपेक्षा निम्म्याने घटणे हे भाजपसाठी सुचिन्ह नाही. अखेरच्या टप्प्यात चुरस निर्माण झाली. मात्र, सुधीर गाडगीळ यांच्या "मिस्टर क्‍लीन' प्रतिमेने मतदारांनी त्यांच्याच पारड्यात विजयाचे दान टाकले.


 आमदार सुधीर गाडगीळ यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा घेऊन जनतेसमोर जाण्याचा निर्णय घेतला. पण, महापुराच्या काळात त्यांनी पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. शिवाय महापालिकेत भाजपची सत्ता असताना गेल्या दीड वर्षात कोणतेही ठळक काम झाले नाही. तरीही शहरातील मतदारांनी गाडगीळांवर पुन्हा विश्‍वास टाकला आहे.


कॉंग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून पृथ्वीराज पाटील यांची ओळख होती. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष स्व. गुलाबराव पाटील यांचे ते पुत्र आहेत हे नव्या पिढीच्या गावीही नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ते नवखेच होते. शहरात जी काही कॉंग्रेस जिवंत दिसते ती त्यांच्यामुळे हे नाकारता येत नाही. त्यातच ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराच्या काळात त्यांनी पूरग्रस्तांसाठी स्वत:च्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पुनर्वसन आणि मदतही केली. नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला. हे कार्य त्यांच्या पथ्यावर पडले.


भाजपकडे निवडणुकीची यंत्रणा होती. त्यात ऐनवेळी जाहीरपणे संभाजी पवार व त्यांची टिम भाजपच्या मदतीला धावली, हे भाजपसाठी फायद्याचे ठरले. उलट कॉंग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारात राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरचे कुणी नेते आले नाहीत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांची एखादी सभा झाली तेवढीच. 


त्या व्यतिरिक्त दादा घराण्यातील वसंतदादांचे नातू विशाल पाटील आणि मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी काही सभा घेतल्या. तरीही कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकजुटीने प्रयत्न केले. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली. मराठा आरक्षणावरून शेवटच्या टप्प्यात दोन्हीबाजूंनी राजकारण झाले. गाडगीळ व संजयकाका यांचा सत्कार करण्यात आला, तर कॉंग्रेसकडून आरक्षणाबाबत सरकारने फसवणूक केल्याचा आरोप झाला. या मुद्द्यावर अंडरकरंट चांगला झालेला त्यामुळे भाजपचे मताधिक्‍य घटलेले दिसते.

कॉंग्रेसचा उत्साह वाढेल
शेवटच्या टप्प्यात चुरस निर्माण झाल्याने सुधीर गाडगीळ यांचा विजयही संघर्षपूर्ण असणार याची चुणूक पहिल्याच फेरीत आली. या निकालाने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढेल अशी आशा आहे. सांगलीतही भाजपला तुल्यबळ आव्हान देता येऊ शकते हा विश्‍वास या निकालाने त्यांना आला असेल. मात्र त्याचा कितपत फायदा कॉंग्रेसजन उठवतात हे काळ ठरवेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com