Sangita Thombre says it is election stunt | Sarkarnama

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून बदनामीचे षडयंत्र : संगीता ठोंबरे

सरकारनामा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019


यापूर्वीही या सुतगिरणी  प्रकरणी केलेल्या तक्रारी न्यायालयाने फेटाळल्या. या आदेशाविरुद्ध देखील आपण वरिष्ठ न्यायालयात दाद मागू, आपला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. असे संगीता ठोंबरे म्हणाल्या.

केज : काही व्यक्तींना हाताशी धरुन निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे असे  भाजप आमदार संगीता ठोंबरे म्हणाल्या.  बुधवारी न्यायालयाने फौजदारी खटला दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला वरीष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

तालुक्यातील लहुरी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीच्या आमदार ठोंबरे या मुख्य प्रवर्तक आहेत. तर, त्यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे अध्यक्ष आहेत. या सुतगिरणीच्या संचालक म्हणून नेमताना बनावट स्वाक्षऱ्या केल्याच्या गणपती कांबळे यांच्या तक्रारीवरुन ठोंबरे दाम्पत्याविरुद्ध फसवणूकीसह अन्य कलमांखाली गुन्हे नोंदवून चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

यावर आमदार संगीता ठोंबरे यांनी आपले मत व्यक्त केले. मागासवर्गीय सूतगिरणी असल्यामुळे गणपती कांबळे यांनी  जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे त्यांचे सभासदत्व कायद्याने रद्द झाले. त्यामुळे याचा त्यांच्या मनात राग होता. आपल्याला विरोध करण्यासाठी राजकीय विरोधकांशी हातमिळवणी करून व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचेही ठोंबरे म्हणाल्या.

 न्यायालयात अपूर्ण माहिती सादर केल्याने न्यायालयाने माझ्यावर खाजगी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित केल्याचेही त्या म्हणाल्या. यापूर्वीही सूतगिरणी विरोधात अनेक तक्रारी झाल्या. परंतु, त्या फेटाळल्या आहेत.

वस्त्रोद्योग आयुक्तांच्या अहवालात सूतगिरणीत कसल्याही प्रकारचे आर्थिक व इतर गैरव्यवहार झाली नसल्याचे नमूद केले आहे. या आदेशाला आपण वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असून न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही आमदार संगीता ठोंबरे म्हणाल्या.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख