sanghrash yatra | Sarkarnama

संघर्ष यात्रेदरम्यानही अधिवेशनावर पकड ठेवण्याची विरोधकांची योजना

संजीव भागवत : सरकारनामा न्यूज ब्युरो
रविवार, 26 मार्च 2017

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी फडणवीस सरकारची कोंडी करण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या संघर्ष यात्रेला बुधवारी (29 मार्च) चंद्रपूर जिल्ह्यातून सुरवात होत आहे. या संघर्ष यात्रेत दोन्ही पक्षातील विधिमंडळ सदस्य सहभागी होणार असले तरी विधानपरिषदेत मात्र विरोधीपक्षाचे संख्याबळ कमी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी फडणवीस सरकारची कोंडी करण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या संघर्ष यात्रेला बुधवारी (29 मार्च) चंद्रपूर जिल्ह्यातून सुरवात होत आहे. या संघर्ष यात्रेत दोन्ही पक्षातील विधिमंडळ सदस्य सहभागी होणार असले तरी विधानपरिषदेत मात्र विरोधीपक्षाचे संख्याबळ कमी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

अधिवेशनावरची पकड कायम ठेवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. यासाठी विधान परिषदेतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य आणि त्यासोबतच विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह दोन्ही पक्षातील नेते, गटनेतेही आळीपाळीने या यात्रेत सहभागी होऊ शकतील असा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या या संघर्ष यात्रेची सुरवात ही चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्‍यातील पळसगाव येथून होणार आहे. या ठिकाणी करकाडे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन ही यात्रा पुढे चंद्रपूरकडे निघेल. चंद्रपूर येथे यात्रेतील प्रमुख नेते दुपारी पत्रकार परिषदेत संघर्ष यात्रेमागील भूमिका स्पष्ट करतील. पहिल्या दिवशी या यात्रेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र यादरम्यान, विधानपरिषदेत सत्ताधारी पक्षाला कोणत्याही स्थितीत मनमानीपणे अनेक विधेयके व कामकाज खेचून नेता येणार नाही, यासाठीची परिषदेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य उपस्थित असतीलच. 

या यात्रेदरम्यान होणाऱ्या जाहीर सभांमध्ये विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे कामकाजाच्या दिवशी मोजक्‍याच ठिकाणी आणि सुट्टीच्या दिवशी अनेक ठिकाणी सहभागी होणार आहेत. तर परिषदेतील कॉंग्रेसच्या नेत्यांनाही ठराविक दिवशीच या संघर्ष यात्रेत सहभाग असेल. मात्र या संघर्ष यात्रेत विधानसभेतील दोन्ही पक्षाचे नेते, आमदार सहभागी होणार आहेत. सत्ताधारी पक्षाला सभागृहात कामकाज रेटून नेण्याची कोणतीही संधी मिळू नये यासाठी प्रत्येक दिवशी विधानपरिषदेच्या कामकाजात सदस्यांनी उपस्थित राहण्याच्या सूचनाही संबंधित पक्ष प्रमुखांकडून देण्यात आल्या आहेत.

कॉंग्रेसकडून 29 मार्च ते 3 एपिलदरम्यानच्या यात्रेचा संपूर्ण कार्यक्रम तयार करून त्याची प्रत कॉंग्रेसच्या सदस्यांना शनिवारी देण्यात आली. तर त्याच कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही आपल्या नेत्यांसह विविध ठिकाणी कोणते नेते, आमदार सहभागी असतील याचीही यादी तयार करण्याचे काम सुरू आल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सांगण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख