sangharsha yatara | Sarkarnama

संघर्ष यात्रेमुळे फक्‍त कार्यकर्त्यांची मरगळ झटकली ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

दोन्ही कॉंग्रेसचे नेते या यात्रेच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले, त्यातून कार्यकर्ताही एकवटला, त्यांच्यातील मरगळ झटकण्याचे काम ही यात्रा करत असल्याचे दिसत असले तरी ही ताकद विधानसभेपर्यंत कायम ठेवण्याचे मोठे आव्हान दोन्ही कॉंग्रेससमोर आहे. नेते हे आव्हान कसे पेलणार यावर विधानसभेचा निकाल अवलंबून आहे. 

कोल्हापूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतीसंबंधीच्या विषयांवर दोन्ही कॉंग्रेससह विरोधकांनी सुरू केलेल्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा कोल्हापुरातून सुरू झाला. यात्रेदरम्यान कोल्हापुरातील तिन्हीही सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. या यात्रेच्या निमित्ताने दोन्ही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मरगळही झटकली गेली. 

राज्यात सलग 15 वर्षे कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते. या काळात विकासाची अनेक कामे झाली. पण निवडणुकीच्या प्रचारात ही कामेच जनतेपर्यंत पोचवण्यात हे लोक कमी पडले. त्यात लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही मोदी लाट आली आणि त्यात दोन्ही कॉंग्रेसची धुळधाण झाली. दोन्ही कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रात कमी संख्येने आमदार निवडून आले. कोल्हापूर तर कॉंग्रेससाठी हुकमी जिल्हा पण या जिल्ह्यातही कॉंग्रेसचा एकही आमदार विजयी झाला नाही. 

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. दोन्ही कॉंग्रेसने पुढाकार घेऊन सरकारविरोधात संघर्ष यात्रा सुरू केली. राज्यभर या संघर्ष यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असले तरी हे वातावरण अजून दोन वर्षे टिकवून ठेवणे मोठे आव्हान आहे. मतदारांची "मेमरी' ही "शॉर्ट' असते याचा अभ्यास करून दोन्ही कॉंग्रेसने नियोजन करण्याची गरज आहे. कर्जमाफी व शेती प्रश्‍नावरून शेतकरी एकवटला आहे हे यात्रेला कोल्हापुरात मिळालेल्या प्रतिसादावरून दिसत आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख