sangharsh yatra | Sarkarnama

शेतकरी बाजूला...गोरे बंधूंच्या संघर्षाची यात्रा!

उमेश बांबरे 
बुधवार, 26 एप्रिल 2017

आजपर्यंत कॉंग्रेस व आमदार जयकुमार गोरे यांनी माण तालुक्‍यात स्वार्थी भूमिका घेत राजकारण केल्याने येथील जनतेचा विकास रखडला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना अडकविणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे आम्हाला शक्‍य नाही. त्यामुळे संघर्ष यात्रेत आपण सहभागी होणार नाही. 
-शेखर गोरे (माण राष्ट्रवादीचे नेते) 

सातारा : माण तालुक्‍यात येणाऱ्या संघर्ष यात्रेत सहभागी न होण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे माण तालुक्‍यात संघर्ष यात्रेच्या निमित्ताने गोरे बंधूंचा संघर्ष पहायला मिळत आहे. यात्रेच्या निमित्ताने एकवटलेले दोन्ही कॉंग्रेसचे कार्यकर्ते माण तालुक्‍यात मात्र, स्वतंत्र राहणार आहेत. 

तिसऱ्या टप्प्यातील कर्जमुक्ती संघर्ष यात्रा गुरुवारी सातारा जिल्ह्यात येत आहे. यात्रेच्या निमित्ताने कधी नव्हे ते जिल्ह्यातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन कवाडे गट, युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या निर्धारातून निघालेल्या या संघर्ष यात्रेचा समारोप साताऱ्यात होणार आहे. यानिमित्ताने दिवसभर ही यात्रा जिल्ह्यातील विविध तालुक्‍यात फिरणार आहे. दहिवडी (ता. माण) येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेचे नियोजन दोन्ही कॉंग्रेसचे कार्यकर्ते मिळून करतील, असा अंदाज असतानाच मंगळवारी रात्री, राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे
यांनी आपण कर्जमाफीच्या बाजूने राहणार आहोत पण संघर्ष यात्रेत सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले. ज्या कॉंग्रेसने व आमदार जयकुमार गोरेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेला त्रास देत दबावाचे राजकारण केले. त्यांच्या व्यासपीठावर शेखर गोरे व त्यांचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसह कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत जाणार नाहीत, असे जाहीर केले आहे. यामुळे गोरे बंधूतील वाद संघर्ष यात्रेच्या निमित्ताने ही तात्पुरताही मिटू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. शेखर गोरेंच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांत अस्वस्थता वाढली आहे. संघर्ष यात्रेचा धडाकेबाज समारोपाच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीला शेखर गोरेंच्या या भूमिकेने धक्का बसला आहे. 

दरम्यान, संघर्ष यात्रेच्या नियोजनासाठी साताऱ्यात दोन्ही कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे दहिवडीतील जाहीर सभेला दोन्ही कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहिले पाहिजे. यातूनही कोणाला यायचेच नसेल तर तो त्यांचा प्रश्‍न आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यात्रेत सहभागी आहोत, असे
कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख