जयंतरावांची तलवार म्यान, सांगली जिल्हापरिषदेत पुन्हा भाजप विजयी

....
जयंतरावांची तलवार म्यान, सांगली जिल्हापरिषदेत पुन्हा भाजप विजयी

सांगली : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवण्यासाठी उपसलेली तलवार म्यान केली आहे. त्यामुळे आता मिनी मंत्रालयात सत्ता कायम राखण्यात भाजप यशस्वी झाले आहे. अध्यक्षपदी म्हैसाळ येथील प्राजक्ता कोरे यांची तर उपाध्यक्षपदी बुधगाव येथील शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांची निवड झाली आहे. 

सांगली जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. येथील सत्तासमीकरणांत आकडेवारी मोठी रंजक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र आली तर बदल घडू शकतो, असे चित्र होते. त्यासाठी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हालचाली सुरु झाल्या होत्या, मात्र त्या फार पुढे गेल्या नाहीत. शिवसेनेकडून मुंबईतील नेत्यांनी फारसा रस दाखवला नाही. शिवसेनेतील घोरपडे, बाबर आणि नायकवडी या तीन गटांना आपल्याकडे वळवता येणार नाही, हे स्पष्ट झाले. त्याचवेळी भाजपचे नाराज खासदार संजयकाका पाटील यांनी आपले सदस्य भाजपच्या गोटात पाठवून दिल्याने महाविकास आघाडीची शेवटची आशा मावळली. त्यानंतर जयंतरावांनी तलवार मान्य केली. 
काल रात्री जयंतरावांनी शिवसेना आमदार अनिल बाबर यांना फोन केला. आपले काही जमणार नाही, तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता, असा थेट निरोप पाठवला. त्यानंतरही राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे सदस्य मात्र महाविकास आघाडीची ताकद दाखवूया, असा आग्रह धरून होते. त्यांनी सकाळी अनिल बाबर यांचे चिरंजीव आणि मावळते उपाध्यक्ष सुहास बाबर यांना गळ घातली. उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करा, असा आग्रह धरला. बाबर यांनी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. हे करायचेच होते तर आधी चर्चा व्हायला हव्या होत्या, आता अचानक असे होणार नाही, असे स्पष्ट बजावले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com