दादांच्या सांगलीत कॉंग्रेस नसणे यापेक्षा दुर्दैव ते काय, प्रतीकराव ! 

प्रतीक पाटील हे भाजपमध्ये जातील किंवा नाही. माहित नाही. सांगली लोकसभा मतदारसंघ झाल्यापासून आजपर्यंत येथे कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होत आला आहे. अपवाद 2014 चा आहे. मात्र या वेळी येथे कॉंग्रेस नसेल असे बोलले जात आहे. येथे कॉंग्रेसचे नसणे हे कॉंग्रेसचेच दुर्दैव म्हणायचे का, प्रतीकराव !
दादांच्या सांगलीत कॉंग्रेस नसणे यापेक्षा दुर्दैव ते काय, प्रतीकराव ! 

"जर देशाचा विकास करायचा असेल, तर खेड्याकडे चला' असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. खरंतर या महात्म्याचा हा संदेश महाराष्ट्राने आत्मसात केला. पन्नाससाठ वर्षांपूर्वीची खेडी आज आठवली तर त्यांचा चेहरा कसा होता आणि आज तिच खेडी कशी आहेत, याचा विचार केल्यास खूप मोठे स्थित्यंतर झाले, असे म्हणावे लागेल. खेड्यांचा, गावांचा चेहरामोहराच पार बदलून गेला. छोटी छोटी गावंही शहरं बनली. 

गावांचे स्थित्यंतर जर कशामुळे झाले असेल तर ते सहकारामुळे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत कॉंग्रेसने राज्याला रथीमहारथी मुख्यमंत्री दिले. तसेच या सर्व मुख्यमंत्र्यांना दूरदृष्टी होती. राज्याचा विकासासाठी सहकार तत्त्वावर साखर कारखाने सुरू झाले. त्याबरोबरच शाळा, महाविद्यालये, खासगी बॅंका, पाणी संस्था, सहकारी सोसायट्या आल्या. 

सहकार क्षेत्रामुळे गावखेड्यांचा विकास होऊ लागला. साखर कारखानदारीने गावखेड्यांतील माणसाचे जीवनमानच बदलले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात सहकारचे जे जाळे विणले गेले, त्यामुळे आपले राज्य देशात नेहमीच प्रथम क्रमांकावर राहिले. शेतकऱ्यांचा पहिला कारखाना उभा करणारे विठ्ठलराव विखे-पाटील, वसंतदादांसारखे सहकारमहर्षी म्हणून नावारूपाला आले नाही तर शेतकरी, कष्टकरी, पायरीवरील शेवटच्या माणसाचा आधार बनले. 

पदावर असो किंवा नसो; दादा नेहमीच गोरगरिबांचे अश्रू पुसत आले. सहकाराच्या माध्यमातून याच दादांनी किती माणसं राजकारणात आणि सहकारात उभी केली, याला मोजदाद नाही. भेटायला गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावरील फाटका सदरा पाहून या माणसाचे हृदय भरून आले. स्वत:च्या अंगावरील सदरा त्या फाटक्‍या शेतकऱ्याच्या अंगावर टाकून स्वत: बंडीवर बसणाऱ्या दादांना महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. 

दादा राजकारणात होते. त्यांच्या पद्धतीने त्यांनी राजकारण केले. जसे त्यांना मित्र होते तसे शत्रूही होते. ते प्रत्येक राजकीय नेत्यांबाबत घडत असते. दादांनी मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल अशी मानाची पदे भूषविली. विरोधकांशी लढतानाच स्वपक्षाबरोबरही संघर्ष करण्यास मागेपुढे पाहिले नाही; पण कॉंग्रेस हा त्याचा आत्मा होता. महाराष्ट्राचे राजकारण करतानाच आपल्या मातृभूमी सांगलीचा त्यांना कधी विसर पडला नाही. सांगली हे नाव त्यांनी शिखरावर नेले. जिल्ह्याचा विकास हाच त्यांचा ध्यास होता. 

आज त्याच दादा घराण्याची राज्यात चर्चा सुरू आहे. दादांचे नातू आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी कॉंग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. भांडण सुरू आहे ते खासदारकीच्या तिकिटावरून. येथील जागा "स्वाभिमानी'ला देण्यास या घराण्याचा विरोध आहे आणि तो अगदी बरोबर आहे. कॉंग्रेसकडेच ही जागा राहिली पाहिजे, ही प्रतीक यांची भूमिका समर्थनिय आहे. कॉंग्रेसश्रेष्ठी दादा घराण्याचे ऐकत नाही, असा सूरही यानिमित्ताने निघत आहे. 

प्रतीक यांनी त्यामुळेच राजीनामा दिला आहे. खरेतर सांगलीच्या दादा घराण्याचे कट्टर विरोधक कोण आहेत हे का सांगलीकरांना माहीत नाही का? ते प्रतीक, विशाल यांनाही माहीत नाही का? दादा घराणे संपविण्यास जिल्ह्यातील कोणता नेता आघाडी होता आणि आजही आहे, हेही त्यांना माहीत नाही, असे समजण्याचे कारण नाही. 

दादा यांच्यापश्‍चात विष्णुअण्णा पाटील, दादांचे पूत्र प्रकाश पाटील पुढे मदन पाटील, प्रतीक पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील हे वारसा चालवित आहेत. सांगलीच्या राजकारणाकडे एक दृष्टिक्षेप टाकल्यास असे लक्षात येते की आज सांगली जवळजवळ भाजपमय झाली आहे. ज्या जिल्ह्यात भाजपचा साधा सरपंच निवडून येणे शक्‍य नव्हते त्याच दादांच्या सांगलीत आज भाजपचा एक खासदार, आठपैकी पाच आमदार आहेत. आता तर प्रतीक यांनाच मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी भाजपत येण्याचे आवाहन केले आहे. 

साखर कारखान्याच्या चेअरमनपासून ते आमदार, खासदारकीबरोबरच मंत्रिपदही तुमच्याकडेच होते. दादांच्या पश्‍चातही कॉंग्रेसने तुमच्यावर विश्वास ठेवला. तुम्हाला विरोध करणाऱ्यांचा कधी विचार केला नाही, हे आज प्रतीक विसता आहेत. 

2014 नंतर देशातील आणि महाराष्ट्रातील कॉंग्रेसवर मोठे संकट आले होते. या संकटात कॉंग्रेससाठी छातीचा कोट करून लढायला हवे होते. प्रतीक हे केंद्रीय मंत्री होते. त्यांची खरेतर राज्यस्तरावर पक्षात काम करायला हवे होते. आज निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसविरोधात जो आवाज बुलंद करतात तसा आवाज किंवा कडाडून विरोध भाजपला केला असता तर पक्ष स्वत: त्यांच्या मागे तिकीट घ्या म्हणून मागे लागला असता. खरेतर लढण्याची तुमच्यात ताकद होती. त्या ताकदीचा उपयोग ना सांगली जिल्ह्यासाठी, ना राज्यासाठी, ना कॉंग्रेससाठी झाला. असे खेदाने म्हणावे लागेल. आज प्रतीकच नव्हे तर सर्वच कॉंग्रेस पुढाऱ्यांच्या पोरांबाबत कमी अधिक असेच म्हणता येईल. 

महाराष्ट्रातील नेत्यांच्या पोरांनी कॉंग्रेससाठी गेल्या साडेचार वर्षांत कधी लाठ्याकाठ्या खाल्या असे चित्र पाहण्यास मिळाले नाही. थोडा अन्याय झाला की बंडाची भाषा केली जाते. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांना तिकीट नाकारल्यानंतर ते गिरीश बापटांना भेटले. मी तुमचाच प्रचार करणार, असे ते म्हणाले. हे कौतुक भाजपवाले छाती फुगवून सांगतात आणि दुसरीकडे मात्र दादा घराण्यांवर अन्याय झाला म्हणून प्रतीकना भाजपमध्ये येण्याचे आवाहन करतात, याला काय म्हणावे. खरेतर कोणी कोणाला संपवित नसतो. आपण स्वत:ही काही गोष्टीला जबाबदार असतो. त्यामुळे दुसऱ्यांच्या नावाने बोट मोडण्यात काय अर्थ आहे, दादा ! 

येथे शेवटचा मुद्दा असा आहे, की भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी चाळीस वर्षे भाजपसाठी कष्ट घेतले. त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. ते नाराजी व्यक्त करतात पण, त्यांनी कधी पक्ष सोडण्याची भाषा केली नाही. प्रतीकराव, आपण तर दादा घराण्यांचे वारसदार आहात. त्यामुळे खडसे आणि शिरोळेंचा आदर्श आपण डोळ्यांसमोर ठेवायला हवा होता. पक्ष काय सोडता. 

तुम्ही कॉंग्रेसमध्ये राहाल किंवा नाही; पण पक्षाचे तिकीट मिळो किंवा न मिळो. मी कॉंग्रेसचा कार्यकर्ता आहे, दादांचा नातू आहे, ती डगमगणार नाही. मी रडणार नाही तर लढणार आहे, अशी डरकाळी कॉंग्रेससाठी फोडायला हवी होती. तसे मात्र झाले नाही. दादांच्या सांगलीत कॉंग्रेसचा उमेदवार असणार नाही. तर येथे स्वाभिमानीच्या तिकीटावर त्यांचे बंधू विशाल हे निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. तसे झाले तर पक्षासाठी मोठे दु:ख कुठले असू शकते, प्रतीकराव ! 
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com