sandip tajane criticize prakash ambedkar | Sarkarnama

प्रकाश आंबेडकरांपासून मागासवर्गीय समाज सावध झालाय!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

देशातील बहुजनांच्या न्याय हक्‍कासाठी आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवून चळवळीच्या मजबुतीकरणाचे काम बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी केले. दुसरीकडे ऍड. प्रकाश आंबेडकरांनी विरोधकांचाच पाठिंबा घेवून समाजाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला.
- ऍड. संदीप ताजणे  

सोलापूर : ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून न्याय मिळेल,  असा विश्‍वास  मागासवर्गीय समाजाला वाटत होता. त्यामुळे सर्व समाजाने लोकसभा निवडणुकीत त्यांना मदत केली. मात्र, त्यांनी समाजाचा वापर फक्‍त राजकारणासाठी व स्वत:साठीच केला. आता त्यांच्यापासून समाज सावध झाला आहे, अशी टीका बसपाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. संदीप ताजणे यांनी केली.

बहूजन समाज पार्टीच्यावतीने सीएए व एनआरसी कायद्याविरोधात सोलापुरात आयोजित जिल्हा मेळाव्यात ऍड. ताजणे बोलत होते. या वेळी प्रदेश महासचिव श्रीशैल गायकवाड, प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे, अविनाश वानखेडे, संजय वाघमारे, अभिजित मनकर, जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोडे, शहराध्यक्ष देवाभाई उघडे, राहूल सरवदे, सुहास सुरवसे, नागनाथ दुपारगुडे, भालचंद्र कांबळे, बलभिम कांबळे आदी उपस्थित होते.

 

श्री. ताजणे म्हणाले, सीएए व एनआरसी कायद्याविरोधात सर्वप्रथम बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी आवाज उठविला. पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर सर्वांना जाग आली.

आता पश्‍चिम महाराष्ट्रासाठी स्वतंत्र प्रदेश संयोजक पद नियुक्‍त केले जाणार आहे. तर विदर्भ, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात केडर कॅम्पच्या माध्यमातून एक हजार प्रशिक्षक तयार करुन त्यांच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा आमदार राज्याच्या विधानसभेत दिसेल आणि सोलापूर महापालिकेतही नगरसेवक विजयी होतील, असा विश्‍वास ताजणे यांनी व्यक्‍त केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख