आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंवर नाराज?

धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या शपथेवेळीही संदीप क्षीरसागर बीडमध्येच होते. तर, जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रीयेपासूनही ते चार हात दुरच दिसले. त्यामुळे ते नक्की कुणावर नाराज आहेत, असा प्रश्न पडला आहे
Is Sandip Kshirsagar Unhappy With Dhananjay Munde
Is Sandip Kshirsagar Unhappy With Dhananjay Munde

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून गटबाजी आणि नाराजीचे चित्र बीड जिल्ह्यासाठी नवे नाही. परंतु, आता नवीन महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेच्या काळापासूनच जिल्ह्यातील नेत्यांमध्ये नाराजी दिसत आहे. प्रकाश सोळंके यांची नाराजी मंत्रीपदासाठी होती हे स्पष्ट झाले असले तरी आमदार संदीप क्षीरसागर यांची नाराजी नेमकी काय आणि कोणावर हे कळायला मार्ग नाही. 

अलिकडे महत्वाच्या घडामोडींपासून क्षीरसागर दूर असल्याने ते नाराज आहेत हे मात्र उघड आहे. १९९९ पासून स्थाननेनंतरच्या या २० वर्षांत १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. जिल्ह्यातही पक्षाची मोठी ताकद होती. परंतु, गटबाजी आणि नाराजी असे समिकरण नेहमीच पाहयला मिळाले. जिल्ह्यातील बड्या नेत्यांवर नाराजांच्या अडचणी थेट अजित पवार सोडवित. मागच्या वेळी सत्तेत नसलेल्या राष्ट्रवादीतही मोठी गटबाजी आणि नाराजी उफाळली. यात क्षीरसागर काका - पुतणे ही गटबाजी प्रमुख होती. यातून सुरुवातीला सुरेश धस, नंतर जयदत्त क्षीरसागर व निवडणुकीच्या तोंडावर नमिता मुंदडा पक्षातून बाहेर पडले. यातील धस - मुंदडा आमदार झाले. 

मात्र, पक्षातून बाहेर पडणाऱ्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरच तोफा डागल्या. संदीप क्षीरसागर यांना धनंजय मुंडेंकडून बळ मिळत होते असा आरोप जयदत्त क्षीरसागर यांचा होता. तसे दोघेही तरुण 'पुतणे' असल्याने त्यांच्यात जवळीकही सहाजिकच होती. आणि जयदत्त क्षीरसागर व धनंजय मुंडे हे ओबीसी नेते असल्याने क्षीरसागरांना शह म्हणून धनंजय मुंडेंकडून संदीप क्षीरसागर यांना राजकीय मदत करणेही सहाजिकच होते. परंतु, निवडणुकीनंतर भाजपचे अल्पजिवी सरकार स्थापन होण्याच्या घडमोडीपासून या दोघांमध्येच अंतर पडलेय का, अशी चर्चा होत आहे. कारण, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या सोबतीने सरकार स्थापन केले आणि शपथविधीतून बाहेर पडलेले संदीप क्षीरसागर थेट शरद पवारांजवळ आले. त्यांनी आपण शरद पवारांनाच साथ देणार असे पत्रकार परिषदेत जाहीरही केले. 

तर, याच वेळी धनंजय मुंडे मात्र नॉट रिचेबल होते. संदीप क्षीरसागर यांनी एकदम कुस बदलणे धनंजय मुंडेंना आवडले नसावे असा अंदाज आहे. तेव्हापासून दोघांमध्ये जरा अंतर पडल्याचे घडामोडींवरुन जाणवत आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या वेळीही संदीप क्षीरसागर बीडला नव्हते. दोघांमध्ये ऐवढे सख्य असताना संदीप क्षीरसागर यांची धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीला गैरहजेरी सर्वांच्याच लक्षात आली. त्यातच मागच्या आठवड्यात जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले. भाजपची सत्ता मोडून महाविकास आघाडी सत्तेवर आली. धनंजय मुंडेंसह प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, बाळासाहेब आजबे आदी नेते घडमोडींवर लक्ष ठेवून होते. 

मात्र, या प्रक्रीयेपासूनही संदीप क्षीरसागर चार हात दूरच होते. बीड पंचायत समितीमध्ये सत्तांतर केल्यानंतर स्वत: नाचून आनंद व्यक्त करणारे आमदार संदीप क्षीरसागर बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या आनंदापासून दूर का होते, याचेही कोडेच आहे. संदीप क्षीरसागर काहीसे नाराज असल्याचे आता लपून राहिलेले नाही. परंतु, त्यांच्या नाराजीचे नेमके कारण काय हे कळायला मार्ग नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com