Sandip Jagtap Appointed State President of Swabhimani Shetkari Sanghatana | Sarkarnama

आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतृत्व करणार कवीमनाचे संदीप जगताप

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

शिर्डी येथे या संघटनेच्या राज्यकार्यकारणीची बैठक झाली. बैठकीत सर्व जिल्हा व राज्याच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा नाशिक येथील प्रसिद्ध ग्रामीण कवी संदीप जगताप यांच्या खांद्यावर दिली

नाशिक  : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांचे खांदेपालट झाले आहे. शिर्डी येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदी नाशिकचे कवी आणि व्यवस्थेवर आक्रमक आसुड ओढणारे संदीप जगताप यांची निवड करण्यात आली.

शिर्डी येथे या संघटनेच्या राज्यकार्यकारणीची बैठक झाली. बैठकीत सर्व जिल्हा व राज्याच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा नाशिक येथील प्रसिद्ध ग्रामीण कवी संदीप जगताप यांच्या खांद्यावर दिली.  

चिंचखेड हे दिंडोरी तालुक्यातील एक छोटंसं गाव.या गावात अतिशय सामान्य कुटुंबात संदीप जगताप यांचा जन्म झाला. शेती करत शिक्षण घेतलं.व त्याच शेती मातीच्या दुःखाच्या कविताही लिहल्या. भुईभोग या पहिल्याच कवितासंग्रहाला आठ राज्यपुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी राज्याच्या विविध भागात व्याख्याने दिली आहेत. कवी, वक्ता म्हणून राज्यभर त्यांची ख्याती आहे.

मात्र, केवळ कविता लिहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून त्यांनी ऐतिहासिक शेतकरी संपात हिरहिरीनं भाग घेतला. त्याच काळात राजू शेट्टी यांच्याशी त्याचा संबध आला. शेतकरी संपा नंतर त्याने स्वाभिमानीत प्रवेश केला. 

नाशिकचे जिल्हाध्यक्ष, पुढे प्रदेश प्रवक्ता या जवाबदाऱ्या त्याने यशस्वीपणे पार पाडल्या. म्हणून संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदाची जवाबदारी पुढील दोन वर्षासाठी संदीप जगतापच्या खांद्यावर आली. त्याबद्दल त्याचे सगळ्याच घटकातून अभिनंदन केले जात आहे.

माझ्या सारख्या अतिशय सामान्य माणसावर राजू शेट्टी साहेबांनी ही मोठी जवाबदारी दिली त्याचं मनावर मोठं दडपण आहे. राज्याच्या सगळ्याच विभागात स्वाभिमानीची पाळंमुळं खोल रुजली आहे.वेगवेगळ्या ठिकाणचे  शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांना संघटीत करून त्यांचा दबाव गट वाढवणे असे दुहेरी काम करावे लागेल. आगामी दोन वर्षात कुटुंबावर तुळशीपत्र ठेऊन मी क्षण अन क्षण या कामासाठी झोकून देईन - संदीप जगताप, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख