संभाजीराजेंचा तावडेंना आणखी एक टोला

पूरबाधितांना मदत देऊन राज्यभरातील सामान्य जनतेने नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. याचा अभ्यास मंत्र्यांनी करावा.
संभाजीराजेंचा तावडेंना आणखी एक टोला

कोल्हापूर : लोकनियुक्त मंत्र्यांनी हातात कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा घेऊन प्रत्यक्ष लोकांत जाऊन काम करावे, असा आणखी एक टोला खासदार संभाजीराजे यांनी मंत्री विनोद तावडे यांना ट्विटद्वारे लगावला आहे. 

कोल्हापूर, सांगलीत महापुराने झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभुमीवर पूरग्रस्तांना मदत म्हणून श्री. तावडे यांनी आपल्या मुंबईतील बोरिवली मतदार संघात हातात डबे घेऊन मदतफेरीचे आयोजन केले होते. याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर खासदार संभाजीराजे यांनी स्वाभिमानी कोल्हापुरच्या जनतेला कुणाची भीक नको, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना भीक मागण्याची वेळ यावी हे दुर्दैवी असल्याची टीका ट्‌विटद्वारे केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना श्री. तावडे यांनीही संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. बोरिवलीतील रिक्षाचालक, फेरीवाले, सामान्य नागरीकांनी पूरग्रस्तांसाठी जमा केलेला निधी पूरग्रस्तांसाठी देण्याची तयारी दाखवली असताना संभाजीराजे यांना ती भीक का वाटावी ? असा सवाल श्री. तावडे यांनी करत संभाजीराजे हे राष्ट्रवादीच्या आडून भाजपावरच टीका करत असल्याचा टोला लगावला होता. 

श्री. तावडे यांच्या या टिकेला पुन्हा संभाजीराजे यांनीही ट्‌विटद्वारे प्रत्युतर देताना पूरग्रस्तांसाठी कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा हातात घेऊन फिरा आणि प्रत्यक्ष लोकांच्या मदतीला या असा सल्ला श्री. तावडे यांना दिला आहे. 

खासदार संभाजीराजे यांनी केलेले ट्‌विट असे- छत्रपती घराण्याच्यावतीने एक सल्ला, लोकनियुक्त मंत्र्यांनी हातात कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा हातात घेऊन फिरावे आणि प्रत्यक्ष लोकांत जाऊन मदत पोहचवावी. कोल्हापूर, सांगली तसेच संपूर्ण महाराष्ट्रवासियांची ही स्पष्ट भावना आहे. पूरबाधितांना मदत देऊन राज्यभरातील सामान्य जनतेने नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. याचा अभ्यास मंत्र्यांनी करावा.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com