sambhajiraje invites ten ambassadors for delhi shivjayanti programme | Sarkarnama

10 देशांच्या राजदूतांना संभाजीराजेंचे निमंत्रण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

बीव्हीजी समुहाचे प्रमुख  हणमंतराव गायकवाड यांना यावर्षीच्या सोहळयामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या शिवजयंती सोहळयाच्या मुख्य कार्यक्रमात 10 देशांचे भारतातील राजदूत प्रमुख पाहुणे असणार आहेत, अशी माहिती खासदार संभाजी छत्रपती यांनी आज दिली.

बीव्हीजी समुहाचे प्रमुख तथा प्रसिध्द उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना यावर्षीच्या सोहळयामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

येथील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात 19 फेब्रुवारी 2020 रोजी कार्यक्रमांच्या आयोजनांसह शिवजयंती सोहळा साजरा होणार असून 10 देशांचे राजदूत या सोहळयाच्या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत स्थित पोलंड, बुल्गेरीया, स्पेन, रोमानिया, चीन, इजिप्त, कॅनडा, टयुनिशिया, सायप्रस आणि इस्त्रायल या दहा देशांच्या राजदूतांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यास होकार दर्शविला असल्याचे त्यांनी सांगीतले. पोलंड आणि बुल्गेरीयाचे राजदूत या सोहळयाला संबोधित करणार असून पोलंडचे राजदूत खास हिंदीतून संबोधन करतील असेही त्यांनी सांगितले. अजूनही काही राजदुतांकडून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत संमती मिळू शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या सोहळयात नाशिक येथील 200 वादकांचे ढोल पथक तसेच मराठा लाईट इन्फेट्रीचा पाईप बँड सहभागी होऊन आपली कला सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख