sambhaji pawar criticise mp sanjay patil | Sarkarnama

संजय पाटील नावाच्या उंटाने भाजपचा तंबू उचललाय : संभाजी पवार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 जानेवारी 2019

उंटाला तंबूत घेतले तर काय होते, याची आठवण मी भाजपला करून दिली होती.

सांगली : खासदार संजय पाटील काय आहे, हे आता भाजपला कळाले असेल. मी साडेचार वर्षांपूर्वी सांगितले होते. त्यांना ते कळायला उशीर झाला, असा टोला माजी आमदार संभाजी पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना लगावला. 

चार वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या श्री. पवार यांनी पुन्हा एकदा मैदानात उडी घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी त्यांनी हक्काच्या मिरज पश्‍चिम भागात कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु केल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

सध्याच्या भाजपमधील अंतर्गत नाराजीबद्दल विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी खासदार पाटील यांच्याविषयीचे विधान केले. 

ते म्हणाले, "जुन्या नेत्यांना दूरदृष्टी असते. त्यांनी सांगितलेले कळायला वेळ लागतो. मी साडेचार वर्षांपूर्वी सांगितले होते, ते आता भाजपला कळाले असेल. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणे माझा पिंड आहे. सध्या खूप भ्रष्टाचार माजला आहे. त्याविरुद्ध लढण्याची कुणाच्यात धमक नाही. त्यामुळे मी पुन्हा ती बांधणी होते का, हे पाहतोय. दहा-पंधरा गावांतून फिरलो, तुम्ही पुन्हा मैदानात या, असे लोक सांगताहेत. माझ्यासाठी सर्व दरवाजे रिकामे आहेत. मी कुस्तीला कधीही तयार आहे. आखाडा कुठला येतोय पाहुया. खरे तर राजकीय भूमिकेसाठी काही काळ वेळ हवा आहे. एक महिनाभरानंतर सारे चित्र स्पष्ट होईल. जिल्ह्यातील जुन्या लोकांशी भेटून सर्वमत आजमावत आहे. आता तब्बेत खणखणीत आहे, बजबजपुरीच्या विरोधात लढावेच लागेल.''  

संभाजी पवार म्हणाले, "उंटाला तंबूत घेतले तर काय होते, याची आठवण मी भाजपला करून दिली होती. आता तेच झाले. उंटाने तंबू उचललाय. हजारो कोटी रुपयांचे आकडे सांगून विकास झाल्याचे भासवले जात आहे. वास्तवात, सारा आभास आहे. ना महापालिकेत काही चांगले घडलेय, ना जिल्ह्यात.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख