sambhaji nilangekar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

निलंगेकरांकडे आणखी महत्त्वाची खाती शक्‍य ?

महेश पांचाळ
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

येत्या महिन्याभरात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्‍यता आहे. त्यावेळी अनेक महत्त्वाची खाते जबाबदार मंत्र्यांकडे देताना मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्र्यांची काही खाती बदलण्यात येणार असून, संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे कामगार, कौशल्य विकास विभागासह ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते दिले जाणार असल्याचे समजते.

मुंबई : माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची कर्मभूमी असलेल्या लातूर शहरात आता भाजपचे कमळ फुलले असून, लातूर महापालिकेतील कॉंग्रेसचा परंपरागत गड ढासळल्याने देशमुखी गढीला धक्‍का बसला आहे. राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असलेल्या संभाजी पाटील - निलंगेकर यांची पत वाढली असून,  मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी त्यांच्याकडे आणखी महत्त्वाची खाती दिली जाण्याची शक्‍यता आहे. 

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा नातू म्हणून राजकारणात सुरुवातीला ओळख असली तरी, भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या संभाजी पाटील निलंगेकर यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली होती. या संधीचा फायदा घेत लातूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी संभाजी पाटील यांनी खूप मेहनत घेतल्याचे दिसून आले आहे.

लातूर महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता होती. 2012 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचा एकही नगरसेवक नसताना, भाजपची एकहाती सत्ता आणण्याचे काम लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी करून दाखवले आहे. लातूर शहर आणि जिल्ह्यावर वर्चस्व असलेल्या कॉंग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

लातूर महापालिकेच्या 70 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला 38 जागा, कॉंग्रेसला 31 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. कॉंग्रेसच्या या पराभवामुळे अमित देशमुख यांच्या नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आणण्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना यश मिळाले आहे. 

येत्या महिन्याभरात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्‍यता आहे. त्यावेळी अनेक महत्त्वाची खाते जबाबदार मंत्र्यांकडे देताना मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्र्यांची काही खाती बदलण्यात येणार असून, संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे कामगार, कौशल्य विकास विभागासह ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते दिले जाणार असल्याचे समजते. लातूर जिल्ह्याकडे पाहताना, लातूर जिल्हा आणि शहरी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अनेक वर्षे प्रलंबित आहे.

लातूर महापालिकेची सत्ता कॉंग्रेसच्या ताब्यात असताना, नागरी समस्या सोडविण्यात अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसला अपयश आल्याचा आरोप केला जात होता. आता लातूर शहरात कमळ फुलल्यामुळे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची राज्याच्या राजकारणात पत वाढली आहे. लातूर महापालिका भाजपच्या ताब्यात यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारीक लक्ष ठेवून होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख