sambhaji brigades shivjayanti festival | Sarkarnama

शिवजन्मोत्सवाची सुरवात संविधान वाचून होणार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणाऱ्यांना "शिव जयंती मना मनात...शिवजयंती घरा घरांत...' हे पुस्तक देऊन गौरविण्यात येणार आहे.

कोल्हापूर : शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच तारखेनुसार साजरी करावी, शाळा-महाविद्यालयातही शिवजयंती साजरी करण्याची सक्ती करावी, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव हुजरे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले. तसेच जिल्ह्यात संभाजी ब्रिगेड शिवजन्मोत्सवाची सुरवात भारतीय संविधान वाचून करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

पाटील म्हणाले, "दिंडनेर्ली येथे 19 फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता मिरवणूक आणि सायंकाळी सात वाजता इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड उपस्थित असणार आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील शिवाजी महाराजांची भूमिका करणारे अभिनेते शंतनू मोघे उपस्थित राहणार आहेत. हा मुख्य कार्यक्रम असणार आहे.'' 

अनेकांकडून पन्हाळागडावरून ज्योत आणली जाते. त्यामुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे सर्व मंडळांनी ध्वनी यंत्रणेला फाटा देऊन ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत, पाऊलखुणा आहेत, अशा ठिकाणाहून ज्योत आणावी, असेही आवाहन पाटील यांनी केले. 

तसेच तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणाऱ्यांना "शिव जयंती मना मनात...शिवजयंती घरा घरांत...' हे पुस्तक देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 16 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये होणार आहे. महापौर निलोफर आजरेकर यांचाही सत्कार होणार असून, त्यांच्याच हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. परिषदेस शिवाजी खोत, चेतन पाटील, बाबा महाडिक, अनिल म्हमाणे उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख